Monday, July 20, 2020

गोठणावरची चिंच




     गेल्या मे महिन्यातील एक सकाळ. पहाटे पहाटे मी माझी स्कूटर बाहेर काढली.इतक्यात माझे शेजारचे काका  म्हणाले, "सर, आज सकाळी सकाळीच दौरा कुठं चालललाय?"

 "गावाकडं  चाललोय, जरा अर्जंट औषधं पोच करून  येतो  ." मी म्हणालो.

 लॉकडाऊन असल्यानं एसटी सेवा   बंद. त्यामुळं  गावाकडच्या आजारी लोकांचं खुपच हाल सुरु होते.त्याना तालुक्याला यायला जमत नव्हतं.  अर्ध्या तासात मी गावात  पोहचलो. गावात  प्रवेशद्वारालाच सात आठ आडवे बांबू टाकून रस्ता बंद केला होता. मी माझी स्कूटर वळवून गावा बाहेरून असणा-या तळ्याकडंच्या रस्त्याने जायला निघालो. बसथांब्यावर कोणीही नव्हतं.  फक्त ऊभं होतं ते चिंचेचं  झाड.अगदी शांत...... मी घरी पोहचलो. बाहेरूनच औषधाची पिशवी दिली व लगेच परत निघालो.पण जाताना....ते चिंचेचे झाड पुन्हा खुणावत राहिले. 

   प्रत्येक खेडेगावात  एखादा ओढा,एखादे तळे ,एखादे देऊळ असतं तसचं एखादं आठवणीत राहणारं झाड असत. असच हे चिंचेच झाड.  आम्हा सर्वांना त्या झाडाची 'गोठणावरची चिंच' म्हणूनच ओळख. हे झाड म्हणजे माझ्या हसुरसासगिरी गावचा बसचा  थांबाच. या झाडाच्या परिसरात,  गावठाणीच्या जागेत रस्त्याच्या आजुबाजूला ऊभी अजून दोन -तीन चिंचेची झाडं . पण,हे झाड मोठे दिमाखदार . मोठे डेरेदार खोड,खोडावर ऊंच ऊंच फुगवट्याआलेल्या, विस्तीर्ण अशा फांद्या पसरलेल्या, त्यामुळं  सावलीने   नेहमीच रस्ता गाठलेला.. प्रवाशांचे हे छत्रच. बुंध्याजवळ आजुबाजूला दगड  पसरलेले -जे प्रवाशाना  गाडी येईपर्यंत  बुड  टेकायला मिळायचे.आता त्या झाडापुढे नवीन निवारा झाल्याने हल्ली लोक तिथेच बसतात. त्यावेळी या झाडाखाली  गावातील चारपाच मुलं  तिथं खेळत असायची.जवळून वाहणा-या ओढ्या काठी म्हसरं  चरत असायची. तोपर्यंत गुराख्याच्या प्रवाशांच्या बरोबर  निवांत गप्पा चालायच्या.सा-यांचा जणू तो आसराच!

     शाळेतल्या मुलाना तर हे झाड सदैव आठवणीत  राहणारं.  गुरुजी  जेंव्हा मराठीत' बसस्थानकांवरील एक तास' या विषयावर  निबंधलेखन सांगत. तेंव्हा  आम्हाला  हमखास डोळयासमोर  हेच झाड दिसायचे.शाळेतल्या गणितातली  बेरीज वजाबाकी शिकतानाचे चिंचोके बहुतेकदा याचं  झाडाकडून  मिळालेले.  जेव्हा झाडाला नवीन पालवी  फुटायची  तेंव्हा हिरवी -हिरवी  लहान पाने , टोकाची लालसर नाजूक  आंबट पाने   मुलाना आवडायची. भातुकलीच्या खेळात लिंबाचे पान, मीठ, तिखट व ही चिंचेची पाने  दगडावर खरडून  तयार केलेली स्वादिष्ट चटणी अधिक मजा आणायची. चैत्रातल्या बहरानंतर येणा-या गाभुळलेल्या चिंचा  म्हणजे गरिबांचा खजुरच. गोड पिकलेल्या चिंचा  पाहून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटायचं .  

     गावातील बहुतेकजणांच्या पहिल्या प्रवासाची सुरुवात याच  ठिकाणावरून झाली. तालुक्याला -हिंग्लजला जायचं  असो वा बुधवारच्या हलकर्णीचा बाजार. झाड माणसानी गजबजायचं. हल्ली गावात  दुचाकी,चारचाकी वाहने आली. तशी गर्दी दुर्मीळच! आता  शाळेला व कॉलेजला शिकणारी मुलंचं  जास्तकरुन असतात. पण  काहीही असो, प्रत्येक घरच्या मुंबईला जाणा-या  गावकरी  मंडळींच्या प्रवासाची सुरुवात या झाडाने पाहिली आहे. आपला मुलगा नोकरीसाठी मुंबईला जाणार म्हटल्यावर कुटुंबातील सारी एसटीत बसवायला यायची. खालून गाडी  येईपर्यंत पोराला चार  खबरदारीच्या गोष्टी सांगणारा बाप.... मुलाला एसटीत बसवून  एसटी निघेपर्यंत काळजीपोटी पदराने डोळयातली  आसवं पुसत एका हाताने निरोप देणारी आई..... हे सर्व झाडाने अनुभवलंय.   सासरी निघालेल्या  गावच्या लेकीना  गाव सोडताना आलेला  हुंदका व   माय-लेकींचा विरहयोग पाहून   झाडही गहिवरलंय. गावात  कुणाच्याही  घरी येणा-या पाहुण्याला  एसटीत बसवायला  माणसं  यायची. एखाद्या वेळी एसटीला  गर्दी असेल तर..गाडीला उशीर झाला  तर... पाहुण्याला एसटी मिळेपर्यंत   घरच्या सुख दु:खाच्या गोष्टी  व्हायच्या.  त्या सर्व गोष्टीचे साक्षीदार हे झाड आहे.  

     श्रावण महिन्यात नागपंचमीला याचा डौल काय वेगळाच! गावात  तीन-चार  ठिकाणी पाळणे  बांधलेले असायचे.  मोठया माणसांपासून छोट्यांपर्यंत  पाळणा म्हटलं तर आनंद व्हायचा. मोठी माणसं या झाडाला पाळणा  बांधून  ऊंच झोके घ्यायची. आई बाळाला मांडीवर  बसून, हाताचा पाळणा  करुन जशी खेळवायची अगदी तसंच  इथं  वाटायचं.

     इथल्या चिंचेने जशी जुन्या काळातील  पितळेची भांडी चमकवली तशीच गावक-यांचे आयुष्य चमकवणा-या प्रवासाची सुरुवात याच्याच छायेत झाली. हे   केवळ एक चिंचेचे झाड नाही  तर   शेकडो वर्षाच्या गावच्या इतिहासाची ते एक साक्षीदार आहे. गावातली बदलती परिस्थिती त्याने  जवळून पाहिली आहे.  झाडा समोरच  रस्त्याच्या पलिकडे असणारी गावची पंचायतीची इमारत... तिथे झालेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक  समारंभ 'याची देही याची  डोळा'  या झाडाने अनुभवलंय.  गावचे  शहीद जवान, त्यांचे स्मारक , त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारे प्रवेशद्वार ..हे सर्व काही पाहताना या चिंचेचाही अभिमानाने ऊर भरुन आलाय. गावच्या पर्यावरण जाणीव जागृती करणा-या तरुणपोरानाही, पंचायतीलाही आज या वृक्षसंपदेचं महत्व समजलय.कांही  ठिकाणी  अशा  रोपट्यांची लागवडही केली.  त्यातील कांही जगतील,मोठी होतीलही. पण..  सा-याच गावक-यांच्या  मनात कायम आठवणीचे पाणी सुटत राहील ते या चिंचेच्या झाडाचेच! गावच्या इतिहासाची साक्ष देणारे .. ही तितिळिका पाहताच .. काश्मिरमधील चिनार वृक्षाचे कौतुक करणा-या गदिमांच्या  या ओळी सहज  माझ्या ओठावर येतात..

" हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी"

-श्रीकृपा
 

कौतुकाची थाप



"अरे दिन्या तुझ्या सायबांनं सुट्टी दिली की नाय? " रमेश  म्हणाला.

"अरं, रजा मंजूर केली पण...लॉकडाऊनमुळं निम्मा पगारच कापला. 
माझा तर सायब लईच खडूस, एक महिना झालं.एक तर काम  बंद. गावी यायला रजा मागत होतो.पण...रजाच देत नव्हता. जेव्हा कोरोना परिसरात घुसला.तेव्हाच रजा दिली." दिन्या म्हणाला.

लॉकडाऊनमुळे  गावी आलेल्या चाकरमान्यांच्या माझ्या शेजारच्या घरातील खळयात   गप्पा  चालू होत्या. सोबत टाईमपासला त्यांचा पत्त्यांचा खेळ  चालू . प्रत्येकजण आपल्या  ऑफीसातील नोकरीच्या ठिकाणी  बॉस , सुपरवायझर, साहेब  कसे आहेत याबद्दल बोलत होता. दिन्या तर साहेबांची कशी' साहेबगिरी' असते ते  हातातील पत्ता जोरात आपटत... मनातील राग काढत.. सांगत होता.

दिन्या म्हणाला, "माझी नेहमी जनरल ड्यूटी असते.वेळ सकाळी दहा ते  सायंकाळी सहा वाजेपर्यंत. पण..काम  पूर्ण करण्यासाठी नेहमी अर्धा एक तास  साहेब थांबवायचाच.  कधीतरी तोंडावर कौतुक... लेखी तर कधीच  उत्तम शेरा नाही .. आणि   वर्षाला पगारवाढही  जेमतेम .  आता तर लॉकडाऊन. वैतागलो आणि आलो निघून गावाकडं. "

 दिन्या आपल्या परिवारासह गावाकड़ं आला आहे . बायको व दोन लहान मुलांसह त्याने गावाकडंच रहायचं ठरवलं. गावी आल्यावरही त्याने शेतीची कामे सुरु केली. तसा तो कष्टाळू.गावी आल्यावरही त्याने महिनाभरात  जम बसवला आहे.

    काम करणा-या   प्रत्येकालाच कौतुकाचे दोन शब्द  अपेक्षित असतात. शाबासकीची थाप मिळताच कामात  हुरुप येतो. त्यात लेखी प्रशस्तीपत्र मिळालचं तर काम अगदी  जोशातच!  दिन्याच्या कंपनीतला साहेबही आपल्याला  बढती कशी मिळेल यासाठी धडपडत होता. काम वेळेवर  किंबहुना कधीकधी वेळेपूर्वीच पूर्ण करायचा... हे सर्व केवळ त्याच्या  वरिष्ठांच्या कौतुकाच्या प्रशस्तिपत्रकासाठीच! पण..हे सर्व ज्यांच्यामदतीने  करतो त्या हाताखालच्या लोकांमुळेच ना! हे त्याला कधी समजणार ?

     माझ्या एका विमा एजंट मित्राने मला त्यांच्या सेमिनारला  राजापूरला  नेले होते.कंपनीची माणसं सूट बूटात वावरत होती. प्रत्येकजण  आपला बिझनेस  कसा चालू आहे याची  माहिती सांगत होता. जास्त बिझनेस टार्गेट  पूर्ण केलेल्या एजंट, अधिकारी लोकांचे सत्कार चालू होते.  
 शेवटी त्यांची विभागाची मुख्य व्यक्ती मार्गदर्शनात म्हणाली, "आपला बिझनेस वाढवायचा असेल तर  प्रथम सिनीयर्सनी ज्युनियर लोकाना सांभाळले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. एवढंच नाही,  तर  'आपण  त्यांचे साहेब आहोत' असे न मानता,  त्याच्याकडूनच  चहा न पिता ,त्याला खूश करावं.मी साहेब, त्याच्याजवळ मी कसं जाऊ? असं कधीच वागू नये.  "

       कोणत्याही क्षेत्रात काम   यशस्वीपणे पूर्ण व्हायचे असेल तर  हे त्या मार्गदर्शकांचे  तत्व अंगिकारलं  पाहिजे.  तर आपली कामे लवकर होतील. कौतुकाची थाप देत वरिष्ठानी  आपल्या हाताखालील लोकाना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या विभागप्रमुखाचे भाषण ऐकताना मला क्षणभर  वाटले ,आपल्या सरकारी सेवेत हे दिवस कधी येणार? सरकारी सेवेत तर हा समझदारपणा दुर्मीळच .  
आपल्या इथं  जागतिक पातळीवर कौतुक होतं मग स्थानिकपातळीवर  जागे होतात.याचं एक  उत्तम उदाहरणं  माझ्या वाचनातलं. कल्याण सुंदरम एक ग्रंथपाल.35वर्षे सेवा .सर्व पगार दुस-यासाठी. या बुद्धीमान व्यक्तीने आयुष्यभर साध्यापद्धतीने राहत  आपली  सर्व संपत्ती गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्यसेवेस  दान  केली.यांच्या कार्याची दखल भारतातल्या कोणत्याच सरकारने घेतली नाही,  पण  अमेरिका व  युनोने मात्र  त्याना 'मँन ऑफ़ द  मिलेनिअम'  ही उपाधी देऊन याची  दखल घेतली.    अमेरिकेतील एका संस्थेने त्याना पुरस्कार देऊन केली.त्या बक्षिसाची 30 कोटी रक्कमही त्यानी आपल्या समाजकार्यासाठी वाहिली.  पण  हे भारतीयाना कधी कळणार? आपल्या लोकांच आपण कौतुक करायचं! 

       विद्यार्थी जीवनात तर  फक्त 'शाब्बास! ' असे जरी कोणी कौतुकाची थाप पाठीवर मारली तर जग जिंकल्यासारखे वाटे.  मी डीएड ला असताना आमचे सराव पाठ असत. निरिक्षक म्हणून असणारी प्राध्यापक मंडळी पाठाच्या शेवटी शेरा मारत. समाधानकारक..चांगला..उत्कृष्ट ..अत्युत्कृष्ट  आदी. कांही निरीक्षकांचे शेरे ठरलेलेच असायचे. त्यांची लेखणी काय  'समाधानकारक' च्या वर उमटायची नाही.  माझे मित्र नाराज व्हायचे. निरिक्षक बाईला उद्देशून  वैतागून म्हणायचे, कितीही चांगला पाठ झाला  तरी  या  बाईंचं 'समाधान 'काय  सुटत नाही.   या उलट कांही प्राध्यापक  पाठाची  सुरुवात  झाल्याबरोबरच  पहिल्या पाच मिनिटात शेरे  द्यायचे.आणि   आम्हा विद्यार्थ्यांना म्हणायचे, "शाब्बास! अरे,  तुम्ही मुळातच हुशार. तुम्हाला सांगायची काय गरजच नाही. " पाठ उत्तम व्हायचा.मग तेही कधी पुढच्या पाठाना फिरकत नसत. नवोदित, शिकाऊ , उत्साही यांच कौतुक कसं करायचं, त्याना प्रेरणा कशी द्यायची  हे त्यानी जाणलं होतं.

   प्रत्येकालाच स्वत:च्या  उत्तम कामाच्या कौतुकाची  नेहमी अपेक्षा असते. घरात आई नवनवीन पदार्थ बनवते तेंव्हा तुम्हीच विचार करा. कोण कोण   बरं  तिचं कौतुक करत? किंवा एखाद्याकडे पाहुणे म्हणून जेवायला  गेल्यावर   आपण किती कौतुकाचे शब्द काढतो... जर आपण चांगला अभिप्राय दिला तर तेवढेच त्यानाही समाधान वाटते.पण  आपण चुकाच काढल्या तर...पुन्हा ते कधी तुम्हाला बोलवणारच नाहीत ना!

खरचं , मुळात प्रत्येकाकडे एक  व्यापक दृष्टीकोन  हवा. प्रत्येकातील  चांगले पहायचा!  आजच्या धकाधकीच्या युगात ताणतणाव जास्तच वाढत आहे.  आरोग्य बिघडत चाललय.  अशा परिस्थीतीत आपण कसा उत्साह दाखवतो  त्यावर आपले व्यक्तिमत्व सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या काळात  तर दुस-याचं कौतुक कराच; पण  स्वत:साठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी  एक कौतुकाची थाप जरुर द्या बरं का !

  - श्रीकृपा 

Wednesday, July 8, 2020

गुरु आपल्या दारी

गुरु आपल्या दारी


          आज गुरुपौर्णिमा.प्रथमत:सर्वाना वंदन.
 सध्या कोरोनाच्या महामारीमुळे  सर्वत्र शाळा  बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला चालू आहे. पण, जिथं नेटवर्क नाही  अशा वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांचं काय? त्याना प्रत्यक्ष गुरुशिवाय कोण  मार्ग दाखवणार? आपल्या आयुष्याला  योग्य वळण लावायचे असेल,योग्य संस्कार करायचे असतील तर गुरूच्या सान्निध्याशिवाय सर्व काही अशक्यच! म्हणूनच म्हंटलं जातं.  

   आयुष्याचा पथ हा दुर्गम, अवघड डोंगर वाट 
         गुरुविण कोण  दाखविल वाट 
          या अंधारी दिशा न कळती 
            नसे आसरा,नसे शिदोरी
कंठ दाटण्या आला भरुनी लोचन काठोकाठ
          गुरुविण कोण दाखविल वाट.

      गेल्या महिन्यात  विद्यार्थ्याना पुस्तकं घरी पोहचली. नव्या पुस्तकांचा गंध  घेत मुलानी स्व-अभ्यास सुरु केला. दरम्यान मुलांच्या अभ्यासाविषयी माझ्या  सहका-यां मार्फत विद्यार्थी भेटी  घेतल्या.  अभ्यासाबरोबर कोरोना बाबत कोणती काळजी घ्यायची हेही विद्यार्थ्यापर्यंत पोहचले.  शाळा बंद असल्या तरी शिक्षण चालू राहिलं. ब-याच दिवसानी आपली गुरुजन मंडळी दिसल्यावर त्यानाही आनंद झाला.  

   आजची भेट विद्यार्थ्याना थोडी अनपेक्षितच.  गुरुपौर्णिमेदिवशी गुरूच आपल्या दारी आल्यावर  ते ही अवाक् झाले.    कोण शेजारच्या मित्रा समवेत खेळत होतं ,कोण  घरी टिव्ही पहात  होतं, कोणी घरकाम करत होतं तर कोणी शेतात लावणी करायला गेलं होतं.  थोड्या वेळातच कांही विद्यार्थ्यानी आपला आठवड़यातील अभ्यास दाखवला. तर  कांहीनी  आपण गोष्टीची कोणती पुस्तके वाचली याबाबत गप्पा मारल्या.   आपल्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या मित्रांबरोबर कांहींजण  अभ्यास करत असल्याचे दिसले. मुंबईहून आलेली कांही सुशिक्षीत मंडळी  आपल्या मुलांसोबत या विद्यार्थ्यांचाही अभ्यास घेत असल्याचे समजले. त्यामुळे  समाधान वाटले.

     सध्याचा काळ  कठीण आहे. मुलांसाठी तर जास्त काळजीचा. वर्तमानपत्रात विद्यार्थ्यांच्या नैराश्यामुळे  वाईट घटनांच्या बातम्या वाचल्यावर तर  मन अधिकच अस्वस्थ होतं.   आपल्याला खेळायला पुरेसे सवंगडी नाहीत,  कामात व्यस्त असल्याने आपल्यासोबत वेळ  द्यायला आपले आई-बाबा नाहीत.बाहेर  जावं तर कोरोनाची भीती. अशा वेळी  गुरूचं आपल्या  घरी काही क्षण आले तर.. कोणाला आनंद होणार नाही!   म्हणूनच आजच्या भेटीचे प्रयोजन केले होते. मुलांच्या मनातलं एकटेपण निघून जाईल हाच एक ऊद्देश. संकट काळात बळ देणारे हात हवेत. धीर देणारे श्वास हवेत. म्हणूनच कुसुमाग्रज यांच्या ' कणा ' या कवितेतील विद्यार्थी गुरुला म्हणतो .

'पैसे नकोत  सर , जरा एकटेपणा  वाटला -
मोडून पडला संसार तरी, मोडला नाही  कणा
पाठीवरती हात ठेवून  नुसते लढ म्हणा.'

       ज्ञानाच्या  या महासागरात  आपली जीवन नौका  गुरुशिवाय  मार्गक्रमण करुच शकत नाही. म्हणूनच गुरूचं स्थान अनन्यसाधारण आहे.आपलं आयुष्य आपल्यालाच जगावं लागतं , कितीही संकटे आली  तर त्यावर मात  आपणच करावी लागते.  यावेळी गुरूने दिलेली शिकवणच अशी आव्हाने  पेलायला  बळ देते. अशा बळ देणा-या माझ्या  प्रत्येक गुरुला आजच्या या गुरुपौर्णिमेनिमीत्त त्रिवार वंदन!!!

- श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com

Monday, July 6, 2020

पुनश्च: हरिओम

पुनश्च: हरिओम   

           जून  महिना संपला. 'निसर्गा'चा रौद्र अवतार पाहिला.कोकण किनारपट्टीवरील जनजीवन विस्कळीत झाले. अगोदरच कोरोनाची महामारी आणि  त्यात वादळ.दुष्काळात तेरावा महिना.तरीही बळीराजाने  पुनश्च: हरिओम म्हणत  नव्या दमाने सुरुवात केली. मृगाच्या अगोदरच ओहोळ, नद्या दुथडी भरुन वाहू लागले होते. कोकणातील भातलावणीला जोर आला.  मध्येच लहरी पाऊस गायब झाला पण, यंदा शेती कसल्याशिवाय पर्याय नव्हता. हातच्या पोटावरचे चाकरमान्यांचे कामधंदे बंद झाले आहेत. त्यामुळे त्यानी गाव गाठलं.सर्वांच पोट भरायचं तर शेतीशिवाय पर्याय नाही म्हणून चाकरमान्यांनीही कंबर कसली. कित्येक वर्षानी त्यानी हातात पुन्हा नांगर धरला. चिखलणी  करु लागला. शेतीच्या कामाची मोडलेली सवय अंगात बानवायला पुन्हा सुरुवात केली. परिस्थिती माणसाला बदलायला लावते.किंबहुना परिस्थितीप्रमाणे आपणही बदललं  पाहिजे. तर अणि तरच आलेल्या संकटावर मात  करु शकतो.
        आमचंही शैक्षणिक वर्ष सुरु झालं. पण  शाळा प्रत्यक्ष सुरु झाल्या  नाहीत. शाळेत  मुलं नाहीत त्यामुळं  देव नसलेल्या मंदिरात मन लागलं  नाही. माणसाला काम  हे पाहिजेच.कामात व्यस्त असणारं  मन जर एकाकी पडलं तर...रिकामे मन सैतानाचे घर  अशी अवस्था होते. या महामारीने जग किती वर्षे पाठीमागे जाईल  यावर तज्ज्ञ माणसं समाज माध्यमातून भाष्य करत आहेत, पण काहीही असो मला मात्र वीस एक वर्ष पाठी गेल्या सारखं  वाटलं. परिस्थितीही तशीच आहे. माझ्या नोकरीच्या काळातील दिवस आठवले. स्वावलंबनाचे धडे घेऊन  नोकरीच्या ठिकाणी हजर झालो होतो.स्वत:चा स्वयंपाका पासून ते धुणीभांडी करण्यापर्यंत सर्वकाही काम  करत असे. दोनाचे चार हात झाल्यावर थोडा हाताना या कामातून विराम मिळालेला.  सध्या मात्र कुटुंब गावी असल्याने  नोकरीच्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा पुनश्च हरिओम म्हणत श्रीगणेशा करावा लागला.  

    आयुष्यातील सर्वांत महत्वाची कला म्हणजे पोट भरण्याची कला अर्थात स्वयंपाककला जमली पाहिजे.केवळ पुस्तकी शिक्षण काय कामाचे? खरंतर याचे सर्व शिक्षण मला  घरातूनच मिळाले होते. आई शेतमजुरी वरुन घरात येईपर्यंत  चुलीवर भात  शिजायचा. वसतिगृहात असताना भात- भाजी पासून चपाती -भाकरी भाजण्यापर्यंत सर्व काही शिकलो.   कोरोनामुळे सध्या खानावळी बंद.त्यात खेडे गावात एखाद्याकडे  रहायचं म्हटलं तरी  सर्वानाच अवघडल्या सारखं.   माझे जवळचे दोघे -तिघे मित्र स्वयंपाक न करता येत असल्याने  जेवणाचे हाल कसे होतात ते सांगतात. परवा मुंबईत  अत्यावश्यक सेवेमुळे  अडकलेले माझे एक नातेवाईक तर  पैसे असून जेवण   वेळेवर भेटत नाही  असे म्हणाले.एकीकडे ऑनलाईन शिक्षणाचा मारा ऐकताना  खरचं   असे पुस्तकी शिक्षण  पोट भरायला अशा परिस्थीतीत  उपयोगी आहे का? असे वाटतं .  खरे शिक्षण तेच जे  जीवन जगायला शिकवतं .म्हणून जीवनाची  कौशल्ये  आत्मसात करायला हवीच. 

         निसर्ग तोच आहे पण माणसाचं जीवन आता शहरी झालं आहे.शहरातल्या सवयी त्याला लागल्या.माझ्या शेजारी सहा-सात चाकरमान्यांचे कुटुंब आले. त्याना चौदा दिवस दुस-या घरात क्वारंटाईन  केले  . त्यात चार  लहान शाळकरी मुलेही. त्याना वाटलं आता  गावी आल्यावर  नदीवर मनसोक्त उड्या मारायला मिळतील. शेतात चिखलणीत बैलांना हाकायला मिळेल,पण  या सर्वांच्या मध्ये कोरोनाची भिंत ऊभी होती. 
एक दोन दिवसांनंतर मुलं म्हणाली , "गुरूजी आम्हाला कंटाळा आला आहे.  गावी नेटवर्क नसल्याने मोबाईलवरचाही टाईमपास बंद. आता चौदा दिवस संपायचे कधी? "  मी म्हणालो आपणास हे दिवस पाळावेच लागतील.  तुम्ही  पुस्तकांना सोबती बनवा.  माझ्याकडे वाचनकट्ट्याची कांही पुस्तके आहेत .ती तुम्हाला देईन." त्यानी "वाह!बरं  झाले " असे म्हणत मला त्यांच्या आवडी सांगितल्या. त्यांच्या वयोगटानुसार मीही लगेच पुस्तके दिली. 

        इकडे गावकरी लोकांच्या मनात तर कोरोनाची भयंकर भीती. ते  चाकरमन्या पासून नेहमीच दुर थांबत. अगदी गुराखीही गुरांसोबत जाताना मास्क  घालू लागला.गुरं मात्र  विना मुसक्ं, मन पसंद निसर्गात हुंदडत  होती. पावसात अंघोळ करत होती. हिरवा लुसलुशीत चारा मन पसंद खात  होती. पण या महामारीने मात्र  माणसाच्या  मुसक्या आवळल्या. शेवटी या सर्वांवर मात  करत, निसर्गाची साद ऐकत,पर्यावरणाचे रक्षण करत  माणसाला पुन्हा' पुनश्च: हरिओम' म्हणत सुरुवात करायलाच हवी ना! 

-श्रीकांत पाटील 
skplanj@gmail.com 


आई...हैप्पी फादर्स डे

आई....हैप्पी फादर्स डे.

  नमस्कार वाचकहो, कदाचित  लेखाचे नाव  वाचून  तुम्हाला  काय तरी चुकल्या सारखं वाटलं असेल, पण  तसं नाही.माझ्या  जीवनात आजही शीर्षक तेच आहे.   आज 21 जून  .योग दिवस. जून महिन्याचा तिसरा रविवार. त्यातच  योगायोग फादर्स डे. सकाळी सकाळी' सकाळ' पेपर मधील फादर्स डे ची माहिती वाचून   माझ्या दोन मुलीनी  फोन करुन या दिवसाच्या शुभेच्छा मला दिल्या. 

     फादर.....कुणाचे बाबा,कुणाचे पप्पा तर,कुणाचे डैड. या सृष्टीचा निर्माता भगवंत जरी असला तरी आपल्या सृष्टीचा  निर्माता म्हणजे आपले आई- बाबा. प्रत्येक सजिवसृष्टीला बाप हा असतोच.सजीवाला निसर्गतः लाभलेली अमूल्य देणगी म्हणजे प्रजननक्षमता.कांही सजीव आपल्या पिलाना जन्म देतात.आपल्या वंशजाला जगात सोडून जातात. पक्षी आपल्या पिलाना भरारी घेण्याची ताकद पंखात येईपर्यंत मोठे करतात.स्वतःच्या पायावर  चालायला,ऊभं करायला हेच जन्मदाते बळ देतात.   मनुष्य जन्मात मात्र केवळ जन्म देऊन सोडत नाहीत.आपल्या मुलाना मोठं करायचं स्वप्न उराशी ठेवून ते झटतात.ते स्वप्न पूर्ण करुन तेच खरे 'बापमाणूस' ठरतात पण,  प्रत्येकाला असा 'बापमाणूस' भेटेलच असे नाही. प्रत्येकाच्या जीवन रथाला आई -बाबा ही दोन चाकं मिळतील अशी नाही. कांहीना जन्मापासून पोरकपण सोसावं लागतं. कांही जन्मापासून अनाथ होतात. कुणाचा बाप आयुष्याची साथ सोडतो तर कुणाची आई. अन्ं सुरु होतो जीवनसंघर्ष .

      तसं तर माझ्या आयुष्यात माझ्या नावातल्या जागेपुरताच कायमच बाप राहिला.आज माझ्या मुलीनी शुभेच्छा दिल्यानंतरच मला आठवण झाली ती माझ्या बापाची. माझं वय लहान .जेमतेम महिना दीडमहिन्याचं.बाप घरातून संसाराकडे पाठ फिरवून  निघून गेला तो आजपर्यंत  फिरकलाच नाही. आज आठवण झाली ती ही माझ्यातील बाप जागा झाल्याने. माझ्याआयुष्यात बापाची जबाबदारी आईनेच पेलल्याने माझ्या आईने कधीच बापाची उणीव भासू दिली नाही.  माझ्या आईने लग्नानंतरचा  त्यांच्या जोड़ीचा एक फोटो ठेवला होता. त्यामधील बापाचे पुसटसे चित्र मला  माझ्या डोळ्यासमोर दिसते.पण  आज माझ्या जीवनात बाबा म्हटलं  की समोर आईच ऊभी राहते. माझी आई हेच माझे बाबा.  

     त्या काळात  लग्न लवकर व्हायची. आईच्या पदरात आम्ही दोन मुलं.माझी मोठी बहिण आणि मी. एक चाक मध्येच  धावपट्टी सोडून गेलं तर आसरा  शेवटी माहेरच्या वाटेचाच.  माझ्या आईनेही तेच केलं. तीने आपल्या आईच्या साथीने आम्हा मुलाना मोठं केलं. 

  बापाची आठवण यायची तेंव्हा आई भावाच्या मदतीने शोधाशोध करायची.पण  कुठेच पत्ता लागायचा नाही. कधी तरी आईला भावाकडून शोध लागल्याची बातमी यायची ,पण  कोणी तरी शोध घेत असल्याचा सुगावा लागताच तिथून तो  पळ  काढलेला असायचा.

बापाच्या आठवणीने रडणारी आई मी पाहिली...

एवढी मेहनत करूनही मी माझ्या लेकरांना काही देऊ शकत नाही असं म्हणून स्वतः ला दोष देणारी आई मी पाहिली....

आमचं वय वाढत गेलं, शिक्षणात आर्थिक खर्च वाढू लागला. तसं बाप बेपत्ता असल्याचा सरपंचाचा दाखला घ्यायची गरज लागली.बाप नसल्याने काय होतं हे  जाणवायला लागलं.
पण, त्याचं वयात आपली आई काय सहन करत आहे हे ही कळायला लागलं आणि हट्ट कमी होऊ लागले. आपल्या अभ्यासावर लक्ष्य केंद्रित केल.
कोणीही न सांगता आलेलं हे शहाणपण याची कोणत्या पुस्तकात शिकवण दिली गेली नाही.
माझ्या त्या वयात मी माझ्या आईला” बाप” होताना पाहिलंय.
“मुलं कोवळी असतात, ओल्या मातीची असतात हे असंच असतं” हे व. पुं च वाक्य अगदी खरं ठरलं माझ्या बाबतीत तरी.
जगायचं असतं हे त्यांना काहीच न कळलेल्या वयात कळालेलं
“तुझा आदर्श कोण?” असा प्रश्न विचारला की मी माझ्या आईचं नाव घेतो ..ज्यांची आत्मचरित्र लिहिली गेली ज्यांनी देशासाठी काहीतरी केलं..त्यांचा त्याग इ. गोष्टी जरी खऱ्या असल्या तरी माझ्या आईने माझ्यासाठी स्वतःच्या संसारासाठी केलेला त्याग मी पाहिलाय.
मी साक्षीदार आहे त्या प्रत्येक क्षणाचा…आणि मला अभिमान आहे अशा स्त्रीच्या सानिध्यात मी वाढलो,मोठा झालो. शिक्षक म्हणून अनेक मुलाना घडवताना  आईकडून मिळालेले पालकत्वाचे संस्कार  मला निश्चित 'बापमाणूस 'बनवतील. माझ्या वर्तमानासाठी कष्ट करणारीही तीच …
आणि माझ्या भविष्याचा आरसाही तीच आहे.या विश्वाचे दर्शन, या मातीचा स्पर्श, या निसर्गाचा सहवास, या समाजाचा परिचय, माझा आनंद, माझे सुख, माझे संपुर्ण जीवन या सगळ्याला अर्थ तेव्हाच येतो, जेव्हा मी अशा  आईच्या पोटी जन्म घेतल्याची जाणिव होते.  माझ्या बाबारुपी आईशिवाय  मी शून्यच, माझं अस्तित्व शून्य, माझी ओळखही शून्यच……...म्हणूनच  माझी मदर हिच माझे फादर.  आई... हैप्पी फादर्स डे .

-श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com

थोडं थांबणं शिकायला हवं



थोडं थांबणं  शिकायला हवं 

       सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचं आणि तंत्रज्ञानाचं युग आहे . गतीची भयंकर सक्ती असलेला काळ म्हणूनही हा काळ ओळखला जातो. ‘थांबला तो संपला’ हा नियम बनवून प्रत्येकजण  अगदी  सुसाट धावत सुटलाय. कुणाला कुणाशी बोलायलासुद्धा वेळ नाही. कोण कुणासाठी  थांबत नाही. प्रत्येकालाच वेळ किमती आहे, पण दुसऱ्यासाठी थोडं थांबलं पाहिजे.  कधी कधी  ते आपल्यासाठीही  फायदेशीर असतं.  पण, आज ही परिस्थिती दिसत नाही . कोणालाच  दुसऱ्यासाठी थांबायला  वेळ नाही  आणि स्वतःसाठीही  थोडं  थांबणं  जमत नाही. वाहतुकीचे नियम न पाळता,  थोडा वेळही न थांबता ,बेफाट वेगाने वाहने चालवून  रस्त्यावरती अपघात होताना आपण पाहतो. कानाला इअरफोन आणि हातात मोबाईल घेतलेला आजचा माणूस जगाशी कनेक्ट असेलही, मात्र आपल्या माणसांपासून तो दुरावला आहे. भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सभोवताली उभे राहत आहेत .तरीही या हृदयाची त्या हृदयाला रेंज मिळेनाशी झाली आहे.  संवादाच्या रेंज पासून माणसं आऊट ऑफ कव्हरेज होत आहेत म्हणूनच   थोडं थांबणं शिकायला हवं.

    आज प्रत्येक जण आपले काम लवकरात लवकर झाले पाहिजे .याच्यासाठी धडपडत असतो. बसस्थानक, रेल्वेस्थानक , बँक ,सरकारी कार्यालय अशा ठिकाणी आज आपण रांग पाहिली तर प्रत्येक जण आपले काम लवकर होण्यासाठी ढकलाढकली  करत असतो. प्रत्येकालाच काम ही महत्त्वाचे असते आणि वेळही नसतो. पण आपण शिस्तीमध्ये सर्व कामं केली पाहिजेत .काळ कितीही धावत सुटला तरी जीवनातील शिस्त आपण जपली पाहीजे. विकसित देशांमध्ये असणारी शिस्त पाहता आपण फारच मागे आहोत.
      
      जीवनाचे मार्गक्रमण करत असताना कधी कधी कळत नकळत वाईट सवयी लागत असतात. कधी कधी आपण त्यांच्या पूर्ण आहारी जातो. पण कुठे थांबायचं हे आपल्याला समजले पाहिजे . सुरुवातीला गंमत म्हणून  सुरू केलेली मजा जीवनामध्ये  कधी सजा देऊन जाते हे कळणार सुद्धा नाही . आपल्या ध्येयपूर्तीसाठी जीवननौका कुठे थांबवायची  आणि  यशाचा किनारा कसा गाठायचा हे ज्याला  समजतं  तोच जीवनात यशस्वी  होतो .आज काल आपण वर्तमानपत्रांमध्ये नापास होण्याच्या भीतीने किंवा  कमी गुण प्राप्त झाल्याने निराशेपोटी विद्यार्थी आत्महत्या होत असलेल्या बातम्या वाचतो. आपण स्वतःपासून आणि इतरांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो कि, वेळोवेळी आपला मनोभंग होतो. त्यामुळे वास्तवाचं भान ठेवून अवास्तव अपेक्षा ठेवणं थांबवलं पाहिजे.ते अपेक्षांचं ओझं मुलांच्यावर लादणं थांबलं पाहिजे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी लॉटरी, जुगार यांच्या मोहात अडकून अनेक जण कर्जबाजारी झाले आणि आपलं आयुष्य उध्वस्त केलं. श्रीमंत होण्याचा मोह थांबला पाहिजे हे त्यांना कळलच नाही.

    आपण आपलं आयुष्य मार्गक्रमण करताना थोडं थांबून तपासले पाहिजे.'जे जीवन किंवा आयुष्य तपासून पाहिले जात नाही, ते जगण्याच्या लायकीचे नाही, 'असं सॉक्रेटिसचे एक वचन आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची चिकित्सा केली पाहिजे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉईंट, मायनस पॉईंट जाणून घेतले पाहिजे .आपल्या आयुष्याचा मार्ग  चालला पाहिजे.  योग्य वेळी योग्य ठिकाणी थोडं थांबायला हवं हे मात्र शिकलं पाहिजेच!

 -श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...