Monday, July 20, 2020

कौतुकाची थाप



"अरे दिन्या तुझ्या सायबांनं सुट्टी दिली की नाय? " रमेश  म्हणाला.

"अरं, रजा मंजूर केली पण...लॉकडाऊनमुळं निम्मा पगारच कापला. 
माझा तर सायब लईच खडूस, एक महिना झालं.एक तर काम  बंद. गावी यायला रजा मागत होतो.पण...रजाच देत नव्हता. जेव्हा कोरोना परिसरात घुसला.तेव्हाच रजा दिली." दिन्या म्हणाला.

लॉकडाऊनमुळे  गावी आलेल्या चाकरमान्यांच्या माझ्या शेजारच्या घरातील खळयात   गप्पा  चालू होत्या. सोबत टाईमपासला त्यांचा पत्त्यांचा खेळ  चालू . प्रत्येकजण आपल्या  ऑफीसातील नोकरीच्या ठिकाणी  बॉस , सुपरवायझर, साहेब  कसे आहेत याबद्दल बोलत होता. दिन्या तर साहेबांची कशी' साहेबगिरी' असते ते  हातातील पत्ता जोरात आपटत... मनातील राग काढत.. सांगत होता.

दिन्या म्हणाला, "माझी नेहमी जनरल ड्यूटी असते.वेळ सकाळी दहा ते  सायंकाळी सहा वाजेपर्यंत. पण..काम  पूर्ण करण्यासाठी नेहमी अर्धा एक तास  साहेब थांबवायचाच.  कधीतरी तोंडावर कौतुक... लेखी तर कधीच  उत्तम शेरा नाही .. आणि   वर्षाला पगारवाढही  जेमतेम .  आता तर लॉकडाऊन. वैतागलो आणि आलो निघून गावाकडं. "

 दिन्या आपल्या परिवारासह गावाकड़ं आला आहे . बायको व दोन लहान मुलांसह त्याने गावाकडंच रहायचं ठरवलं. गावी आल्यावरही त्याने शेतीची कामे सुरु केली. तसा तो कष्टाळू.गावी आल्यावरही त्याने महिनाभरात  जम बसवला आहे.

    काम करणा-या   प्रत्येकालाच कौतुकाचे दोन शब्द  अपेक्षित असतात. शाबासकीची थाप मिळताच कामात  हुरुप येतो. त्यात लेखी प्रशस्तीपत्र मिळालचं तर काम अगदी  जोशातच!  दिन्याच्या कंपनीतला साहेबही आपल्याला  बढती कशी मिळेल यासाठी धडपडत होता. काम वेळेवर  किंबहुना कधीकधी वेळेपूर्वीच पूर्ण करायचा... हे सर्व केवळ त्याच्या  वरिष्ठांच्या कौतुकाच्या प्रशस्तिपत्रकासाठीच! पण..हे सर्व ज्यांच्यामदतीने  करतो त्या हाताखालच्या लोकांमुळेच ना! हे त्याला कधी समजणार ?

     माझ्या एका विमा एजंट मित्राने मला त्यांच्या सेमिनारला  राजापूरला  नेले होते.कंपनीची माणसं सूट बूटात वावरत होती. प्रत्येकजण  आपला बिझनेस  कसा चालू आहे याची  माहिती सांगत होता. जास्त बिझनेस टार्गेट  पूर्ण केलेल्या एजंट, अधिकारी लोकांचे सत्कार चालू होते.  
 शेवटी त्यांची विभागाची मुख्य व्यक्ती मार्गदर्शनात म्हणाली, "आपला बिझनेस वाढवायचा असेल तर  प्रथम सिनीयर्सनी ज्युनियर लोकाना सांभाळले पाहिजे, त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. एवढंच नाही,  तर  'आपण  त्यांचे साहेब आहोत' असे न मानता,  त्याच्याकडूनच  चहा न पिता ,त्याला खूश करावं.मी साहेब, त्याच्याजवळ मी कसं जाऊ? असं कधीच वागू नये.  "

       कोणत्याही क्षेत्रात काम   यशस्वीपणे पूर्ण व्हायचे असेल तर  हे त्या मार्गदर्शकांचे  तत्व अंगिकारलं  पाहिजे.  तर आपली कामे लवकर होतील. कौतुकाची थाप देत वरिष्ठानी  आपल्या हाताखालील लोकाना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्या विभागप्रमुखाचे भाषण ऐकताना मला क्षणभर  वाटले ,आपल्या सरकारी सेवेत हे दिवस कधी येणार? सरकारी सेवेत तर हा समझदारपणा दुर्मीळच .  
आपल्या इथं  जागतिक पातळीवर कौतुक होतं मग स्थानिकपातळीवर  जागे होतात.याचं एक  उत्तम उदाहरणं  माझ्या वाचनातलं. कल्याण सुंदरम एक ग्रंथपाल.35वर्षे सेवा .सर्व पगार दुस-यासाठी. या बुद्धीमान व्यक्तीने आयुष्यभर साध्यापद्धतीने राहत  आपली  सर्व संपत्ती गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्यसेवेस  दान  केली.यांच्या कार्याची दखल भारतातल्या कोणत्याच सरकारने घेतली नाही,  पण  अमेरिका व  युनोने मात्र  त्याना 'मँन ऑफ़ द  मिलेनिअम'  ही उपाधी देऊन याची  दखल घेतली.    अमेरिकेतील एका संस्थेने त्याना पुरस्कार देऊन केली.त्या बक्षिसाची 30 कोटी रक्कमही त्यानी आपल्या समाजकार्यासाठी वाहिली.  पण  हे भारतीयाना कधी कळणार? आपल्या लोकांच आपण कौतुक करायचं! 

       विद्यार्थी जीवनात तर  फक्त 'शाब्बास! ' असे जरी कोणी कौतुकाची थाप पाठीवर मारली तर जग जिंकल्यासारखे वाटे.  मी डीएड ला असताना आमचे सराव पाठ असत. निरिक्षक म्हणून असणारी प्राध्यापक मंडळी पाठाच्या शेवटी शेरा मारत. समाधानकारक..चांगला..उत्कृष्ट ..अत्युत्कृष्ट  आदी. कांही निरीक्षकांचे शेरे ठरलेलेच असायचे. त्यांची लेखणी काय  'समाधानकारक' च्या वर उमटायची नाही.  माझे मित्र नाराज व्हायचे. निरिक्षक बाईला उद्देशून  वैतागून म्हणायचे, कितीही चांगला पाठ झाला  तरी  या  बाईंचं 'समाधान 'काय  सुटत नाही.   या उलट कांही प्राध्यापक  पाठाची  सुरुवात  झाल्याबरोबरच  पहिल्या पाच मिनिटात शेरे  द्यायचे.आणि   आम्हा विद्यार्थ्यांना म्हणायचे, "शाब्बास! अरे,  तुम्ही मुळातच हुशार. तुम्हाला सांगायची काय गरजच नाही. " पाठ उत्तम व्हायचा.मग तेही कधी पुढच्या पाठाना फिरकत नसत. नवोदित, शिकाऊ , उत्साही यांच कौतुक कसं करायचं, त्याना प्रेरणा कशी द्यायची  हे त्यानी जाणलं होतं.

   प्रत्येकालाच स्वत:च्या  उत्तम कामाच्या कौतुकाची  नेहमी अपेक्षा असते. घरात आई नवनवीन पदार्थ बनवते तेंव्हा तुम्हीच विचार करा. कोण कोण   बरं  तिचं कौतुक करत? किंवा एखाद्याकडे पाहुणे म्हणून जेवायला  गेल्यावर   आपण किती कौतुकाचे शब्द काढतो... जर आपण चांगला अभिप्राय दिला तर तेवढेच त्यानाही समाधान वाटते.पण  आपण चुकाच काढल्या तर...पुन्हा ते कधी तुम्हाला बोलवणारच नाहीत ना!

खरचं , मुळात प्रत्येकाकडे एक  व्यापक दृष्टीकोन  हवा. प्रत्येकातील  चांगले पहायचा!  आजच्या धकाधकीच्या युगात ताणतणाव जास्तच वाढत आहे.  आरोग्य बिघडत चाललय.  अशा परिस्थीतीत आपण कसा उत्साह दाखवतो  त्यावर आपले व्यक्तिमत्व सकारात्मक राहण्यास मदत होते. त्यामुळे सध्या लॉकडाऊनच्या काळात  तर दुस-याचं कौतुक कराच; पण  स्वत:साठी, सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी  एक कौतुकाची थाप जरुर द्या बरं का !

  - श्रीकृपा 

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...