Monday, July 20, 2020

गोठणावरची चिंच




     गेल्या मे महिन्यातील एक सकाळ. पहाटे पहाटे मी माझी स्कूटर बाहेर काढली.इतक्यात माझे शेजारचे काका  म्हणाले, "सर, आज सकाळी सकाळीच दौरा कुठं चालललाय?"

 "गावाकडं  चाललोय, जरा अर्जंट औषधं पोच करून  येतो  ." मी म्हणालो.

 लॉकडाऊन असल्यानं एसटी सेवा   बंद. त्यामुळं  गावाकडच्या आजारी लोकांचं खुपच हाल सुरु होते.त्याना तालुक्याला यायला जमत नव्हतं.  अर्ध्या तासात मी गावात  पोहचलो. गावात  प्रवेशद्वारालाच सात आठ आडवे बांबू टाकून रस्ता बंद केला होता. मी माझी स्कूटर वळवून गावा बाहेरून असणा-या तळ्याकडंच्या रस्त्याने जायला निघालो. बसथांब्यावर कोणीही नव्हतं.  फक्त ऊभं होतं ते चिंचेचं  झाड.अगदी शांत...... मी घरी पोहचलो. बाहेरूनच औषधाची पिशवी दिली व लगेच परत निघालो.पण जाताना....ते चिंचेचे झाड पुन्हा खुणावत राहिले. 

   प्रत्येक खेडेगावात  एखादा ओढा,एखादे तळे ,एखादे देऊळ असतं तसचं एखादं आठवणीत राहणारं झाड असत. असच हे चिंचेच झाड.  आम्हा सर्वांना त्या झाडाची 'गोठणावरची चिंच' म्हणूनच ओळख. हे झाड म्हणजे माझ्या हसुरसासगिरी गावचा बसचा  थांबाच. या झाडाच्या परिसरात,  गावठाणीच्या जागेत रस्त्याच्या आजुबाजूला ऊभी अजून दोन -तीन चिंचेची झाडं . पण,हे झाड मोठे दिमाखदार . मोठे डेरेदार खोड,खोडावर ऊंच ऊंच फुगवट्याआलेल्या, विस्तीर्ण अशा फांद्या पसरलेल्या, त्यामुळं  सावलीने   नेहमीच रस्ता गाठलेला.. प्रवाशांचे हे छत्रच. बुंध्याजवळ आजुबाजूला दगड  पसरलेले -जे प्रवाशाना  गाडी येईपर्यंत  बुड  टेकायला मिळायचे.आता त्या झाडापुढे नवीन निवारा झाल्याने हल्ली लोक तिथेच बसतात. त्यावेळी या झाडाखाली  गावातील चारपाच मुलं  तिथं खेळत असायची.जवळून वाहणा-या ओढ्या काठी म्हसरं  चरत असायची. तोपर्यंत गुराख्याच्या प्रवाशांच्या बरोबर  निवांत गप्पा चालायच्या.सा-यांचा जणू तो आसराच!

     शाळेतल्या मुलाना तर हे झाड सदैव आठवणीत  राहणारं.  गुरुजी  जेंव्हा मराठीत' बसस्थानकांवरील एक तास' या विषयावर  निबंधलेखन सांगत. तेंव्हा  आम्हाला  हमखास डोळयासमोर  हेच झाड दिसायचे.शाळेतल्या गणितातली  बेरीज वजाबाकी शिकतानाचे चिंचोके बहुतेकदा याचं  झाडाकडून  मिळालेले.  जेव्हा झाडाला नवीन पालवी  फुटायची  तेंव्हा हिरवी -हिरवी  लहान पाने , टोकाची लालसर नाजूक  आंबट पाने   मुलाना आवडायची. भातुकलीच्या खेळात लिंबाचे पान, मीठ, तिखट व ही चिंचेची पाने  दगडावर खरडून  तयार केलेली स्वादिष्ट चटणी अधिक मजा आणायची. चैत्रातल्या बहरानंतर येणा-या गाभुळलेल्या चिंचा  म्हणजे गरिबांचा खजुरच. गोड पिकलेल्या चिंचा  पाहून सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटायचं .  

     गावातील बहुतेकजणांच्या पहिल्या प्रवासाची सुरुवात याच  ठिकाणावरून झाली. तालुक्याला -हिंग्लजला जायचं  असो वा बुधवारच्या हलकर्णीचा बाजार. झाड माणसानी गजबजायचं. हल्ली गावात  दुचाकी,चारचाकी वाहने आली. तशी गर्दी दुर्मीळच! आता  शाळेला व कॉलेजला शिकणारी मुलंचं  जास्तकरुन असतात. पण  काहीही असो, प्रत्येक घरच्या मुंबईला जाणा-या  गावकरी  मंडळींच्या प्रवासाची सुरुवात या झाडाने पाहिली आहे. आपला मुलगा नोकरीसाठी मुंबईला जाणार म्हटल्यावर कुटुंबातील सारी एसटीत बसवायला यायची. खालून गाडी  येईपर्यंत पोराला चार  खबरदारीच्या गोष्टी सांगणारा बाप.... मुलाला एसटीत बसवून  एसटी निघेपर्यंत काळजीपोटी पदराने डोळयातली  आसवं पुसत एका हाताने निरोप देणारी आई..... हे सर्व झाडाने अनुभवलंय.   सासरी निघालेल्या  गावच्या लेकीना  गाव सोडताना आलेला  हुंदका व   माय-लेकींचा विरहयोग पाहून   झाडही गहिवरलंय. गावात  कुणाच्याही  घरी येणा-या पाहुण्याला  एसटीत बसवायला  माणसं  यायची. एखाद्या वेळी एसटीला  गर्दी असेल तर..गाडीला उशीर झाला  तर... पाहुण्याला एसटी मिळेपर्यंत   घरच्या सुख दु:खाच्या गोष्टी  व्हायच्या.  त्या सर्व गोष्टीचे साक्षीदार हे झाड आहे.  

     श्रावण महिन्यात नागपंचमीला याचा डौल काय वेगळाच! गावात  तीन-चार  ठिकाणी पाळणे  बांधलेले असायचे.  मोठया माणसांपासून छोट्यांपर्यंत  पाळणा म्हटलं तर आनंद व्हायचा. मोठी माणसं या झाडाला पाळणा  बांधून  ऊंच झोके घ्यायची. आई बाळाला मांडीवर  बसून, हाताचा पाळणा  करुन जशी खेळवायची अगदी तसंच  इथं  वाटायचं.

     इथल्या चिंचेने जशी जुन्या काळातील  पितळेची भांडी चमकवली तशीच गावक-यांचे आयुष्य चमकवणा-या प्रवासाची सुरुवात याच्याच छायेत झाली. हे   केवळ एक चिंचेचे झाड नाही  तर   शेकडो वर्षाच्या गावच्या इतिहासाची ते एक साक्षीदार आहे. गावातली बदलती परिस्थिती त्याने  जवळून पाहिली आहे.  झाडा समोरच  रस्त्याच्या पलिकडे असणारी गावची पंचायतीची इमारत... तिथे झालेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक  समारंभ 'याची देही याची  डोळा'  या झाडाने अनुभवलंय.  गावचे  शहीद जवान, त्यांचे स्मारक , त्यांच्या बलिदानाची आठवण करुन देणारे प्रवेशद्वार ..हे सर्व काही पाहताना या चिंचेचाही अभिमानाने ऊर भरुन आलाय. गावच्या पर्यावरण जाणीव जागृती करणा-या तरुणपोरानाही, पंचायतीलाही आज या वृक्षसंपदेचं महत्व समजलय.कांही  ठिकाणी  अशा  रोपट्यांची लागवडही केली.  त्यातील कांही जगतील,मोठी होतीलही. पण..  सा-याच गावक-यांच्या  मनात कायम आठवणीचे पाणी सुटत राहील ते या चिंचेच्या झाडाचेच! गावच्या इतिहासाची साक्ष देणारे .. ही तितिळिका पाहताच .. काश्मिरमधील चिनार वृक्षाचे कौतुक करणा-या गदिमांच्या  या ओळी सहज  माझ्या ओठावर येतात..

" हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षापरी"

-श्रीकृपा
 

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...