Monday, August 17, 2020

शिकवणी

 शिकवणी


   नुकताच माझा  बारावीचा निकाल लागला होता.  तालुक्यात कला शाखेत  मी प्रथम आल्याचं  समजलं.  त्यामुळे मी खूश होतो. पण  कॉलेज मात्र दु:खी होतं . बोर्डात अवघ्या दोन गुणांनी मी यादीतून हुकल्यांमुळं . ज्या ध्येयाने मी कला शाखा निवडली होती ते  ध्येय पूर्ण होणार होते. शिक्षक होण्यासाठीचा मार्ग सुकर झाला. प्राथमिक शाळेतील 'माग  भीक पण  मास्तरकी शिक .' हा  सुविचार प्रत्यक्ष जगायची वेळ  आता आली  होती.   डीएड़ कोर्सला माझा गारगोटी,जि.कोल्हापूर   येथे मौनी विद्यापीठात प्रवेश निश्चित झाला. अवघ्या नव्वद रुपयात प्रवेश पूर्ण झाला. पण  त्यावेळी वसतीगृहाच्या  वर्षभराच्या प्रवेशासह हजार रुपयापर्यंतचा खर्चही भरण्यासाठी नातेवाईकांच्याकडून आईने  पैसे मागून घेतलेले.  


      कॉलेज सुरु झालं. प्रत्येक प्राध्यापक आमची वर्गात ओळख करुन घ्यायचे. त्यात  प्रा. यादव सर  प्रत्येक तुकडीतील विद्यार्थ्याच्या कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची माहिती विचारायचे. मी माझी परिस्थिती सांगितली. त्यानी मला गणित विषयाचे प्रा.शिंदे सराना भेटायला सांगितले. पहिल्यांदा लाजवट  स्वभावामुळं  एखाद्या मोठया व्यक्ती समोर जायला भिती वाटायची.  पण  आता लाजुन कसं  भागणार? आता शिकायचं, शिकवायचं म्हटलं तर धाडस करावं  लागणारच! 

 प्राध्यापकांच्या पुढं  जाताना घाबरणारी  आम्ही मित्र मंडळी  एकमेकांना साथीला घेऊन जात होतो.   शिंदे सराना  ऑफीसात भेटलो. सरानी  संध्याकाळी घरी येण्यास सांगितले. मी व माझ्या खोलीत राहणारा मित्र सरांच्या घरी गेलो. ते गारगोटीतच भक्ते कॉलनीत  राहत होते. 

त्यानी मला विचारलं,

 " हे बघ.  तू   शिकवणी सुरु कर. इथच कॉलनीत  बापटांच्या घरी त्यांच्या मुलाना शिकव.  तुला मिळणा-या फी मधून तुझा खर्च भागायला मदत होईल."


     मी लगेच होकार दिला.


     तशी इथल्या डीएड़ कॉलेजला येणा-या व वसतीगृहात राहणा-या बहुतेक  विद्यार्थ्याची घरगुती शिकवणी  घेण्याची परंपराच! ग्रामीण भागातीलच विद्यार्थी इथे येत.त्यामुळे बहुतांशी शेतकरी कुटुंबातीलच ही मुलं  शिक्षक होण्याच स्वप्न उराशी बाळगून  ती शिकवणी घेऊन पूर्ण करत. एका तुकडीचे विद्यार्थी  आपल्या शिकवण्या येणा-या तुकडीतील  विद्यार्थ्याना जोडून देत.  कॉलेजच्या अभ्यासाबरोबर प्रत्यक्ष शिकवण्याचा अनुभव मिळत असे. त्यामुळे हे वस्तीगृहात राहणारे,  शिकवणी घेणारे , स्वावलंबी जगणारी मुले  कॉलेजात नेहमी टॉप राहत.


 त्यानी मला  कॉलनीतील त्या  बापटांच्या घरी घेऊन गेले.  माझी व  बापट काकींची ,त्यांचा मुलगा मंदारची  ओळख करुन दिली.  


ते बापट  काकीना  म्हणाले, "हा विद्यार्थी कॉलेजमधला प्रवेश घेतलेला   टॉपर  विद्यार्थी आहे. तुमच्या मंदारला चांगले शिकवेल.' 


काकीनीही आपल्या मुलांसोबत शेजारच्या 

 मंदारच्या  वर्गातील दोन मित्रानाही  क्लासला येण्यास सांगितले. 

दुस-या  दिवशी बापटांचा मंदार, कोतमिरेंचा सुरज, पाटलांचा संग्राम (आम्ही सर्व त्याला 'बबलू' म्हणूनच ओळखत)  या तिघांना घेऊन शिकवणीचा श्रीगणेशा  झाला.  मुलानीच क्लासचे नाव  'यशोदीप' ठेवले. मंदारच्या घरच्या माडीवर एका खोलीत वर्ग भरला.  यापूर्वी इथेच दुसरे वर्ग  चालायचे. ज्ञानदीप क्लास. त्यामुळे मंदारने  'यशोदीप 'नाव  सुचवले.  हे तिघेही विद्यार्थी पाचवीला होते. विद्यार्थी हा शिक्षकांसाठी देवच असतो . ते माझ्या समोर त्रिमूर्तीच होते, अगदी दत्तासारखे!


    मंदार एक हुशार विद्यार्थी. नेहमी टापटीप रहायचा.जसा  शिस्तीने रहायचा तसाच अभ्यासातही ! मांडीवर आधाराला पँड  घेऊन  नेहमी सुबक लेखन करायचा. कविता गायन उत्तमच. पाठांतर  अगदी एकपाठी.  बहुतेकदा त्याचा  अभ्यास पूर्ण असायचा.  हिच त्याची अभ्यासू वृती  त्याला आज अभियंता बनण्यास मोलाची ठरली.


   दुसरा  विद्यार्थी सुरज  कोतमिरे. खेळत बसला की अभ्यास विसरायचा.  कधी कधी क्लासला मी वर्गात पोहचल्यावर  माडीच्या पायरीवर धापऽऽ ...  धापऽऽ पाय  टाकत  धावत पोहचायचा. हातात  पुस्तके घेऊन ऊशीर झाल्याच्या अपराधी भावनेने डूलत शिकवणी वर्गात प्रवेश मागायचा.  अभ्यास तपासताना डोके खाजवत  घरचा अभ्यास विसरल्याची कबुली द्यायचा.


        पाटलांचा बबल्या म्हणजेच संग्राम म्हणजे गुबगुबीत गालाचा विद्यार्थी. मी  त्याचे  इंग्रजी शब्द पाठांतर घेत असे.  शब्द पाठ नसतील तर मला सुर काढत  म्हणायचा, "सर, शब्द पाठ झाले नाहीत हो...."  सुरज व बबलूचे अक्षर थोडे वळणदार  नव्हते.   पुढे ते सरावाने सुधारलेही.आजही संग्रामची  भेट झाली तर तो इंग्रजी शब्द पाठ करण्याची शिकवलेली पध्दत  आठवणीने सांगतो. "Geo...gra....phy..जिऑग्राफी म्हणजे भूगोल. " ही पध्दत  अभियंता होताना उपयुक्त ठरल्याचे आजही प्रत्येक भेटीत सांगतो.  


         शिकवणी सुरु करुन महिना संपला. दिवाळी सणाची हिवाळी सुट्टी सुरु झाली. मला गावी जाण्यापूर्वी   शिकवणीचे नव्वद रु.मिळाले. ही माझ्या आयुष्यातील शिक्षक म्हणून पहिली कमाई !  पहिला गुरूदक्षिणाच म्हणा ना!  सुट्टीनंतर माझे कॉलेज सुरु झाले.  वसतिगृहातील माझ्या सिनीयर्स  मित्राना मी मिळालेल्या फी बाबत म्हणालो. त्यावेळी एखाद्या कुटुंबातील दोन भावंडांची   शिकवणी घेण्यासाठी दोनशे रुपये मिळायचे. मित्रानी मला दुसरी शिकवणी बघू म्हणून सांगितले.  


     इकडे यशोदीप शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांचा सहामाहीचा निकाल लागला होता. तिघेही प्रगतीपथावर होते. मंदार वर्गात टॉपर होता. सुरज , बबलूचेही परीक्षेत गुण  वाढले होते.    

     मी तिकडे शिकवणीला न गेल्याने एक दिवस मला प्रा.शिंदे सरानी स्टाफरुममध्ये बोलावले व म्हणाले, "श्रीकांत ,तू बापटांचा  इथं क्लासला शिकवायला गेला का नाहीस? "  

      मी त्याना माझ्या सिनीयर्सच्या सांगण्यानुसार , माझ्या पहिल्या कमाईची माहिती सांगितली व नवीन शिकवणीच्या शोधात आहे, असे म्हणालो. त्याना बापट काकींनी मुलांच्या प्रगतीबाबत माहिती दिली होती. काकींनी  मला बोलावले . मी घरी गेलो. पालक खूश होते. मी न सांगताच त्यानी फी दुप्पट देण्याचे सांगितले. मुलांच्या यशाला त्यानी प्राधान्य दिले व माझ्या शिकण्यास हातभारही.त्यानी कोणतेही भाडे न घेता मला त्या माडीवरच्या खोलीत अधिक वर्ग सुरु करण्यास परवानगी दिली.


   हळुहळू  अधिकचे वर्ग सुरु केले. सकाळी कॉलनीतील शिकवणीचे  वर्ग.  संध्याकाळी घरी जाऊन शिकवणीचे दोन वर्ग. असे सुरु झाले. घरी जाऊन घेण्याच्या शिकवणीतला एक वर्ग गणेश लोहार या सिनीयर मित्राने जोडून दिला होता.  या  शिकवणीत हराळे  कुटुंबातील  सपना   व अक्षय   ही दोन  भावंडे  होती. त्यांचे वडील बांधकाम विभागातील अधिकारी.  दोन्हीही चुणचुणीत हुशार मुलं.  सपना  अगदी धाडसी तर अक्षय  लाजत बोलणारा .दोघेही अभ्यासात हुशार.सपना विविध स्पर्धा, उन्हाळी शिबिरे  मध्ये सहभागी व्हायची. एका उन्हाळी शिबिरातले तीने घोडेस्वारी, खेळ, पोहणे याचे  अनुभव सुट्टीनंतर आनंदाने सांगितले.   आज सपनाने वकिली व्यवसायात व अक्षय सी ए म्हणून  स्वत: चा व्यवसाय कोल्हापुरात सुरु केल्याचे  समजले. मुलाना योग्य वेळी पालक व शिक्षक यांचा आधार  भेटला तर ती अगदी झाडावरच्या वेलीगत  सरसर आयुष्याच्या वृक्षावर  चढतात.


   सपनाच्या घरा शेजारील रसिका  व लता  या मुलीही नंतर भक्तीकॉलनीत  यशोदीप क्लासला येऊ लागल्या. 

पुढे पुढे शिकवणी वर्ग वाढत गेले.  सिनीयर्स मित्र हरीश गुरवने  मला लाड कुटुंबातील श्रद्धा व अभिजीत चा घरगुती शिकवणी वर्ग जोडून दिला.  गारगोटीच्या सरोजिनी कॉलनीतील प्राचार्य मा. गो. माळी  सरांच्या नातवंडाना शिकवण्याचा योगही आला. घरगुती शिकवणीला  स्वप्निल व अजिंक्य ही दोन विद्यार्थ्यांचे खुपच गुरुप्रेम मिळाले.  त्यांच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्रातील  प्रवेशद्वारावरील 'येथे विद्यार्थी हा देव आहे.' हे वाक्य  जीवनात दिशा देऊन गेले.


    सकाळी तीनं शिकवण्या  व कॉलेज सुटल्यावर दोन  शिकवण्या असत. संपूर्ण दिवस कामाने खचाखच भरलेला! सकाळी साडे सहा ते साडे नऊ भक्ते कॉलनीतले वर्ग, अकरा ते पाच कॉलेज,  सायंकाळी  साडेपाच ते साडे सात-आठ  पर्यंत  घरगुती शिकवणी.

असे बिझी वेळापत्रक. या शिकवणीच्या ठिकाणीच आमचे बहुतेक सण  साजरे व्हायचे. सणाला भोजनाला नेहमी आमंत्रण  असायचे. ते केवळ फी मिळवण्याचे ठिकाण नव्हते ते आमचं कुटुंब होतं.  शिक्षक प्रशिक्षण घेत घेत हा प्रत्यक्ष शिकवणीचा  अनुभवच  कॉलेजात मला टॉपमध्ये येण्यास मदतीचा ठरला . तसेच जीवनाला चांगले वळण देणाराही.


   दोन हजार साली  डीएड़ पूर्ण झाले.  तरीही जवळच्या कर्मवीर हिरे  कॉलेजात प्रवेश घेऊन पुढचे पदवीचे शिक्षण सुरु केले.सोबत शिकवणीचे वर्ग सुरुच. एफ.वाय.बी ए चे एक वर्ष पूर्ण केले.  आता यशोदीपमधील मंदार, सुरज , संग्राम ही मुलं  आठवीच्या वर्गात पोहचली होती. सहामाही झाली. दिवाळीनंतर  मला डिसेंबर महिन्यात रत्नागिरी जि.प. नोकरीचा कॉल आला.  आता ही आमची कौटुंबिक शिकवणी बंद होणार होती.  हे  पाचही शिकवणीचे कुटुंब खुपच निराश होते.  


  नोकरीवर जाण्यापूर्वी मी विद्यार्थ्याच्या घरी  भेटायला गेलो.  हातात  पेढे होते. मनात खुशी होती नोकरी भेटल्याची..पण  दुसरीकडे या जीवनाला अनुभवाची शिदोरी देणारी शिकवणी चा  वियोग होता. विद्यार्थ्यंच्या चेह-यावर  निराशा दिसत होती.  त्या दिवशी भेटलेल्या पालकानी ऋण व्यक्त केले. माझे अभिनंदन केले.मला नोकरीसाठी शुभेच्छा दिल्या. अजूनही ते विद्यार्थी माझ्या'  'माझे गुरुकुल ' या वाट्स अप गृपच्या माध्यमातून संपर्कात असतात. अशा  शिष्यांशिवाय  माझे गुरुकुल पूर्ण होणे अशक्यच!

     

      शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे.पण सध्या शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात क्लासचा धंदा सुरू केला आहे . राजकारणी आणि संबंधितांनी या धंद्यात आपले पक्के पाय रोवले आहेत.  शाळा प्रवेशापासून प्रत्येक पायरीवर धन गोळा केलं  जात  आहे. शिकविणे कमी, पण राजकारण जास्त . यांना सरकारचे शिक्षण खातेही काहीही करीत नाही. त्यामुळे चालकांचे बळ अधिक वाढले आहे. म्हणून  आज गरज आहे ती  शिकवणीतून  गुरु- शिष्य नातं  घट्ट होण्याची. या पेशातील  धंद्याचे रुप जाण्याची! 


-श्रीकांत पाटील


No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...