त्यादिवशी सकाळी सकाळी सहा वाजता अंगणातील गेटचा आवाज झाला. मी बाहेर फिरायला जाण्याच्या तयारीत होतो. हळूच मी बाहेर खिडकीतून डोकावून पाहिले. म्हादां दारात हजर!
मी आश्चर्याने म्हणालो, "ओ कदमांनु , लवकर. आज काय काम काढलं?"
"काय नाय तुमच्याकडचं काम व्हतं. जरा माझ्या पेन्शिनीचं काय तरी बघा." म्हादा लगबगीने म्हणाला.
मी म्हटलं , " दोन फोटो तेवढं काढून ठेवा. तुमच्या त्या काल भेटलेल्या माणसाकडं देऊया"
म्हादां... मी राहत असलेल्या शाळेच्या गावातील म्हणजे केळवलीतील(ता.लांजा, जि.रत्नागिरी) एक सत्तरीतला माणूस. महादेव कदम असं त्यांचं नाव. पण... बहुतांशी लोकांची त्याना " म्हादां ऽऽऽ " अशीच हाक . माझी मात्र त्याना आडनावावरुन म्हणजेच "कदमांनु ऽऽऽऽ " अशीच हाक . कुठल्याही कार्यक्रमाला, सभेला, बैठकीला बाहेर पडताना म्हादांच्या गळ्यात एक हिरवं-तपकिरी मफलर नेहमी गुंडाळलेल्ं, हातात एखादी तंबाखू पानाची पिशवी अडकवलेली .... डोक्यावर पांढरी गांधी टोपी... अंगात स्वेटर व त्यावर एक शर्ट घालून बटण न अडकवता शर्टचे दोन्ही हातोपे मोकळे सोडलेले... फुल्ल पँट असाच पेहराव. तोंड नेहमी पान सुपारीनं रंगलेले.
म्हादांची आणि माझी ओळख मी शाळेत हजर झालेल्या दिवसापासूनच. त्यावेळी ते ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहत होते. कदाचित राजकारण हा त्यांचा आवडीचा भाग नसावा. पण वॉर्डमधून ऊभं केलेलं त्यामुळं निवडून आला असावा. पण त्यांच्या वाडीत ज्येष्ट माणसापैकी एक. शाळेच्या व्हरांड्यात बैठकीला नेहमीच हजर. बैठक गावच्या कामाची असो अथवा शाळेच्या कामाची. तो नेहमी पुढं .
म्हादांला नमन, शाहिरी, जाखडी, यांची विशेष आवड. बायांची गाणी गाण्यात तर एक नंबरच!पूर्वीपासून त्यांचं वाडीत कोकणी कला सादर करण्याचं, जपण्याचं काम चालूच. माझ्या शाळेत दरवर्षी झेंडावंदनच्या दिवशी म्हादांचं भाषण हमखास!सभेच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, एखादं पारंपारिक नमन मधील गीत व्हायचं. बहुतेक रचना त्यांच्या मुखोद्गत. शाळेत काय कार्यक्रम असेल तर म्हादां पहिला हजरच! श्री सत्यनारायण पुजेच्या कार्यक्रमात तर सर्व पुजेची, प्रसादाची तोच व्यवस्था करी. कोणतंही सार्वजनिक काम आवडीने करायचं हे म्हादांकडूनच शिकावं . आजही गुरं राखणं , भातशेतीकाम म्हादांचं संसारकाम चालूच असतं. पावसाळ्यात घरा शेजारी पर्याला अऊर आलाच 'इन ' घेऊन म्हादां चढणीचे मासे पकडायला हजर..!
खेकडी पकडायला ओढ्यात बांध घालून 'गरावणं ' टाकलेलं . 'खोइन ' लावलेली. म्हादांला या सगळ्याची आवड.
वाडीतील सार्वजनिक कामात म्हादांशिवाय पान हलत नाही. ज्येष्ट माणसं श्रेष्ठ असतात. ती अनुभवानं समृध्द असतात. त्यांचा अनुभव नेहमीच पुढच्या पिढीला उपयोगी पडत असतो. त्यांचा आपण तरूण पिढीनं आदर करायला हवा. बदलत्या काळाबरोबरच्या गोष्टी जुन्या लोकाना समजावून सांगून नवे बदल स्विकारायला हवेत.तेही अशा मोठया माणसांना न दुखावता !
यंदा शिमगोत्सवात मला त्यांच्या कलेची विशेष झलक पहायला मिळाली. प्रत्येकाच्या अंगणात पालखी गेल्यावर गाण व्हायचं. म्हादाच्या हातात डफ, सोबत पाच - सहा धरकरी त्यापैकी एकाच्या हातात चौंडक, दुस-याच्या गळ्यात ढ़ोलकी व इतरांच्या हातात टाळ असायचे. डफ़ावर थाप टाकताच म्हादांला जोश यायचा.मग गाणं म्हादांच्या अंगात संचारायचं अगदी अंगात भरल्यासारख! ही गायनाची नशा काय औरच! या सत्तरीच्या वयातही तो उत्साह तरुणांना लाजवणाराच होता.
खरंच, माणसाला एखादा छंद, सर्व कांही दुःख विसरायला लावतो. त्यातून स्वतः आनंद घेण्याबरोबर दुस-यालाही देता येतो. म्हादांचंही तसंचं होतं. शिमगोत्सवात म्हादांला एक माणूस भेटायला आला. त्याच्याजवळ आपल्या कलेबाबत सांगितलं. त्या माणसाने आपण शासनाकडून मिळणा-या शाहिरी मानधनबाबत प्रस्ताव करण्यासाठी प्रयत्न करुया असं सांगितलं. म्हादांकडं ही शाहिरी कला अंगभूत आहे. वाडीतील मधुकर पंदेरे सारखी कलाकार माणसं शाहिरी क्षेत्रात घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज मधुबुवांना कला क्षेत्रातील महाराष्ट्र भुषण कलागौरव पुरस्कार मिळाला आहे. हीच कलेची परंपरा तुषार मधुकर पंदेरे ही चालवत आहे. तुषारबुवांची विविध जाखडीची गाणी तर सर्वाना मंत्रमुग्ध करतात.त्यांची कांही जाखडीची डबलबारीही चित्रीत केली आहेत.
म्हादां आपल्या कलेच्या सुरुवातीचा काळ सांगताना म्हणतो, "आम्ही त्याकाळी नमन , जाखडीचे कार्यक्रम कंदिलाच्या प्रकाशात करायचो. चालत जायचं , गणपतीत, शिमग्यात कार्यक्रमाच्या सुपारी मिळत. त्यावेळी जास्त पैसं मिळत नसंत.पण.. आम्ही लोक आवडीने कार्यक्रम करायचो."
आज म्हादांच्या या कलेबाबत त्या काळातील कार्यक्रमाचं काहीही लिखित व चित्रफित उपलब्ध नाही. अजूनही ती कला , त्यावेळची गाणी त्याना मुखोद्गत आहेत. शासनाने अशा कलाकारांसाठी मानधन योजना सुरु केली आहे. पण म्हादांकडं पुरेसं रेकॉर्ड नसल्यानं अजूनही मानधनाविना तो वंचितच आहे. म्हादांला भविष्यात ते मिळेल हिच अपेक्षा!
-श्रीकांत पाटील

No comments:
Post a Comment