Monday, August 17, 2020

रेंजच्या शोधात

 रेंजच्या शोधात 

           

      संध्याकाळी   मी नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला निघालो . ग्रामपंचायत जवळ पोहचलो. तिथे  कट्ट्यावर मुलांची  गर्दी दिसली.  गावच्या एखाद्या सभेलाही एवढी  लोकांची उपस्थिती नसते तितकी मुलांची गर्दी !


 मी गर्दी पाहून म्हणालो, "अरे , सभा भरली की काय तुमची? 


"गुरूजी रेंजच्या शोधात आलो.  खुप कंटाळा येतो हो घरी बसून" मुले हसत हसत म्हणाली.


कांही मुले भिंतीला टेकून  हातात मोबाईल घेऊन बोलत बसली होती.कोणी कॉल करत होते. कोणी मान खुपसून मोबाईलमधील व्हिडिओ पाहत  होते. कांही गेम खेळत  होती. कांही गुराखीही त्यांच्यासोबत बोलत होती. कांही  गुराखीही आपला साधा मोबाईल घेऊन संवाद साधत होती.


        लॉकडाऊनमुळे  बहुतेकसे लोक गावी आले आहेत.त्यामुळे गावातील बहुतेकशी बंद घरेही सध्या  उघडली  आहेत.घराला घरपण आले.माणसानाही फारच सुखावह वाटू लागले. त्यात पावसाळ्यात गावचे वातावरण  तर खुपच  सुंदर! पण   ज्या मुलाना  मोबाईलचे व्यसन जडले आहे. त्याना त्याच्याशिवाय गावाकडे करमतच नाही. त्यामुळे ही मुले रेंजच्या शोधात फिरत असताना दिसतात. शहरात घरातून बाहेरही न पडणारी ही मुले रेंजच्या शोधात ऊंच ठिकाणे शोधू लागली.  तरुणांचा कधी टेकडीवर तर कधी ऊंच इमारतीवर  तर मुक्कामच! . कानात इयरफोनच्या गुंड्या घातलेल्या  व डोळे स्क्रीन वर खिळलेले. कॉलेज बंद. कंपन्या बंद.मग करणार काय?हा प्रश्न समोर  त्यांच्यासमोर उभा. कांहीचे कामकाज तर  घरातूनच.त्यामुळे तेही रेंजच्या शोधातच!  त्यानी आपला लैपटॉप घेऊन चक्क निवांत रानातील ऊंच जागा  शोधलेली!


   गावात  पूर्वी बीएसएनएलचे नेटवर्कच होते. त्यामुळे आता बहुतेकजणांकडं याचं कंपनीची सुविधा असणारे ,पण  ती सध्या बंदच.  सध्या जिओ चे नेटवर्क.त्यामुळे सगळे अगदी "जिओ जिवस्य जीवनम "म्हणत   एकमेकाला डाटा देतात.  ऊंच टेकडीवर , कट्ट्यावर बसून' एकमेका सहाय्य करु 'असे म्हणत  हॉट स्पॉट  ने प्रत्येकजण जोडलेला.मोबाईलची रेंज मिळावी यासाठी झाडावर, उंच भिंतीवर, गावाच्या शिवारावर, उंच टेकडीवर लोक फिरत असल्याचे दृश्य जेवढे मजेशीर, तेवढेच संतापजनक आहे. तंत्रज्ञान प्रगत होत असले तरी  गावांमध्ये माकड उड्यांचा हा प्रयोग चालूच असतो.


      रेंजच्या शोधात बरीच मुले येतात. फावल्या वेळात मोबाईलवरचे खेळ सुरु करतात. अगदी लुडो,काररेस , बबल शुटर, टेम्पल्ड रन, कंडी क्रश  ते पब्जी पर्यंत. एकीकडे कोरोना विरुध्द युद्ध करताना दिसणारे योद्धे असताना दुसरीकडे   निवांत वेळ घालवणारे हे पब्जी योद्धे पाहताना कीव येते.  अशा वेळेचा सदुपयोग त्यानी करायला हवाच!. गावातील शेती कसायला मदत करावी. फावल्या वेळेत आपले छंद  जोपसावेत जे आपल्या प्रगतीस हातभार लावतील.  


  सध्या  गावात  आम्ही वाचनकट्ट्या मार्फत घरपोच पुस्तकेही द्यायला सुरुवात केली आहे.  पुस्तकासारखे मित्रच नाहीत. आपला एकटेपणा ती नक्कीच घालवतात. आभासी जगात  वावरण्यापेक्षा वास्तव जीवन कधी जगायला शिकणार?    मोकळ्या हवेत फिरायला हवं, व्यायाम करायला हवा, गावच्या स्वच्छ हवेतील प्राणवायू  प्रत्येकास जगण्यास नवीन प्राण देईल. 


     मुळात सध्या सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते वास्तव नाही, याचे भान बाळगणे गरजेचे आहे.  वास्तव आयुष्य खूप वेगळे आणि चांगले आहे. केवळ आभासी लाइक्स आणि फेव्हरिट म्हणजे आयुष्य असा गैरसमज करून घेतला तर पुढे प्रत्यक्ष आयुष्यात नैराश्याला सामोरे जावे लागेल. ते टाळण्यासाठी वेळीच समजून घेऊया, हा आभास आहे, वास्तव नाही!


      सोशल मीडिया म्हणजे खरे तर आभासी जग. पण त्यालाच वास्तव समजण्याचा झालेला घोटाळा आता अनेकांना मानसिक विकारांच्या दिशेने खेचून नेतो आहे. ‘‘उसके लाइक्स मेरे लाइक्ससे ज्यादा कैसे?’’ या प्रश्नाने केवळ तरुणाईचीच नव्हे तर त्याहीपेक्षा मोठय़ा असलेल्या पिढीची झोप उडवलेली दिसते. खरे तर फेसबुक किंवा इतर कोणत्याही सोशल नेटवर्किंग साइटस्वर मिळणारे लाइक्स असतील किंवा फेव्हरिट्स; त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात कोणताही फारसा फरक पडणार नसला तरीही मानसिक अस्वास्थ्याच्या दिशेने प्रवास सुरू झालेल्यांची आणि निद्रानाशाला सामोरे जावे लागलेल्यांचीही वाढलेली संख्या या इशाऱ्यांच्या घंटा वेळीच समजून घ्यायला हव्यात.  या आभासी आनंदात  आपण रेंजच्या शोधात बाहेर पड़लोच  तर   आपले  जीवन 'आउट ऑफ़ कवरेज'  कधी होईल हे समजणार नाही.म्हणून वेळीच जागे होऊया.


-श्रीकांत  पाटील 

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...