Monday, August 17, 2020

आनंददायी शिक्षण

 आनंददायी शिक्षण


         आज शनिवार .  घड्याळात सकाळचे आठ वाजले होते.  माझ्या शाळेने लॉकडाऊन काळात या शैक्षणिक वर्षात ' #गुरु आपल्या दारी' उपक्रम सुरु केला आहे. मी आज आठवडा भेटीत  #टिलीमिली कार्यक्रमाचा लाभ किती विद्यार्थी घेत आहेत हे पाहण्यासाठी  विद्यार्थ्यांकडे जायचे ठरवले. हेआनंददायी शिक्षण  खरोखरच  मुलापर्यंत पोहचते का? त्याना काय अडचणी तर नाही  ना?हे जाणून  घ्यायचे ठरवले.


        गेल्या आठवड्यात भेट दिली होती तेंव्हा वेगळे चित्र होते.    प्रत्येक विद्यार्थी स्वतःची एक जिवंत कहाणी घेऊन जगत असतो. याचा अनुभव  त्यावेळी आला. कोण विद्यार्थी आपली घरकामं उरकत होता.कोणाच्या घरी आजी आजारी होती तर कोणाला वडीलांच्या व्यसनामुळे   मुलाना शैक्षणिक वातावरण मिळत नव्हते. 

 कोणाजवळ घरी टी व्हीची सोय नव्हती तर कोणाचा डिशचा रिचार्ज  संपला होता.  या सर्व  गोष्टी विद्यार्थी मला बिनधास्त सांगत होते. या सर्व परिस्थीतीतही मुलाना समजून घेऊन , मानसिक आधार देऊन अभ्यासाला प्रवृत्त करायचे म्हणजे एक आव्हानच!  त्यासाठी  मी व   माझ्या सहका-यानी पालकांशी संवाद साधला. आपल्याकडे ऑनलाईन शिक्षण नेटवर्क नसल्याने मिळत नाही तरी दुरदर्शनचा लाभ घ्या अशी विनवणी केली. जुलैच्या वीस  तारखेपासून  कार्यक्रम सुरु होत आहे.याची माहिती दिली. समस्याबाबत   पालकांशी संवाद साधला.


 "आपण इतर वेळी मनोरंजनसाठी डिश  रिचार्ज करतोच ना! आज लॉकडाऊन मध्ये मुलांचं शिक्षण सुरु ठेवण्यास  रिचार्ज करुया."


 "कोणा शेजारील विद्यार्थ्याकडे टी  व्ही नसेल तर त्याला अर्धा तास कार्यक्रम पहायला देऊया."


"शासन आपल्यास घरी बसून मोफत शिक्षण देत आहे .त्याचा लाभ घेऊया"


     प्रत्येक पालक भेटीत  त्याना मार्गदर्शन केले. आज सामाजिक बांधिलकी जपत काही पालक शेजारच्या मुलांसाठी आपला टिव्ही सुरु करतात. 


  मला  दारात पाहताच सहावीत शिकणा-या हर्षंन च्या काकी  म्हणाल्या, "कालच्या कार्यक्रमात व्याकरण शिकवत होते. ते आमच्या बाबूने वहीत लिहलय .

 शेजारचा मकरंदही आमच्या इथंच  कार्यक्रम बघतो." 


 पाचवीतील  ईशाच्या  शेजारची आजी म्हणाली, "गुरूजी ,मी  काल सकाळी जेवण तयार करत करत कार्यक्रम पाहीला.दोन मुलाना घेऊन त्या बाई खूप समजाऊन शिकवित होत्या." असे  ऐकून टीली मिली अगदी काकी आजीपर्यंत घराघरात पोहचल्याची प्रचिती आली. 


    आज विद्यार्थी  हा कार्यक्रम पाहून आनंदीत आहेत.  शाळा बंद असली तरी शिक्षण चालू झाल्याने या टिली मिली ने आमची चिल्ली पिल्ली  नक्कीच सुखावलेत.  त्या कार्यक्रमाची आवड, त्यातून मिळणारा आनंद  भेटीत  मला मुलांच्या चेह-यावर  दिसून आला.  कार्यक्रम पाहून आपसुकच मुले गुणगुणू लागली आहेत .


 " आकाशातील जमले तारे ...टिली मिली टीली मिली

  अभ्यासाला जमले सारे.....टिली मिली टीली मिली"


  खरचं, शिक्षण  आनंददायी वाटलं  तरच जगणं नक्कीच आनंददायी वाटेल  यात यत्किंचितही शंका नाही बरं का!


- श्रीकांत पाटील

skplanj@gmail.com

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...