# गुरु आपल्या दारी ..
जिथं नेटवर्क नाही अशा वाडी- वस्तीवरील मुलांच ऑनलाईन शिक्षण बंद . तिथे मुलांच शिक्षण ऑफ़ राहून कसे चालेल?म्हणून आम्ही सुरु केला आहे उपक्रम 'गुरु आपल्या दारी' ...थेट विद्यार्थ्याना घरीच जाऊन मार्गदर्शन.अवांतर वाचन पुस्तकेही घरपोच . यात महाविद्यालयीन विद्यार्थिनीही आपल्या भावंडांना शिकण्यास मदत करत आहेत.
शिकणं ही माणसाची नैसर्गिक प्रेरणा आहे. ती जपली आणि तिचा वापर करण्यासाठी लागणारं वातावरण निर्माण केलं तर प्रत्येक मुलं स्वत:हून शिकतं . हे आम्हाला या उपक्रमातून समजलं. आज मुलाना मुक्तपणे खेळू देत, त्यांच्या आवडीनिवडी जोपासू देत, मनोरंजनासाठी जी दुरदर्शनसंचासारखी साधनं वापरली जातात ती मुक्तपणे हाताळू देत .... पत्ते,सापशिडी, कैरम, बुद्धिबळ असे बैठे खेळ घरीच खेळत ....कधी आईला स्वयंपाकघरात मदत करायची तर कधी बाबांबरोबर नदीवर बैल धुवायला जात, पाण्यात मजा करण्याचा अनुभव घेत. असं सर्वकाही चालू ठेवत .. कोणतेही बंधन न पाळता, नवीन गोष्टी शिकण्यासाठी मुलांना त्यांना हवं ते शिकण्यासाठी मदत करणारे गुरूच आपल्या दारी येऊन ज्ञान देऊ लागल्याने, मुलांना शिक्षण आपलसं वाटू लागलं.
मुलांचे एकटेपण तर आता केंव्हाच निघून गेले आहे. सोबत दुरदर्शन वरील सह्याद्री वाहिनीचे 'गली गली सिम सिम', 'टिली मिली' या कार्यकर्मामुळे मुलांचे आनंददायी शिक्षणही सुरुच ! प्रत्येक भेटीत त्यांच्या चेह-यावर दिसणारा आनंद न्याराच! जेंव्हा शिक्षण आनंददायी वाटेल तेंव्हा जगणंच आनंददायी होईल याचीच ही प्रचिती!
पूर्वी गुरुकुल परंपरा होती. खेडेगावात विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र असायचे.गुरूच्या सहवासाने मुले घडायची. शिक्षक त्या गावाचे शहाणपण होते.अगदी 'पिंजरा' चित्रपटातील पूर्वार्धातील मास्तरांसारखे!आज या संकट काळात वाडीवस्तीवरील मुलांच्या शिक्षणासाठी गरज आहे शिक्षणव्यवस्थेतील प्रत्येकाने मनातून गुरूजी होण्याची! प्रत्येक गुरुच्या समर्पणाची!
ज्ञानाच्या या महासागरात प्रत्येक विद्यार्थ्याची जीवन नौका गुरुशिवाय मार्गक्रमण करुच शकत नाही. म्हणूनच गुरूचं स्थान अनन्य साधारण आहे.म्हणूनच आजच्या या संकटकालीन परीस्थितीत विद्यार्थ्याला जगण्याचं बळ देऊया. शिक्षणाची गंगा त्याच्या दारी पोहचवूया.
श्री.श्रीकांत कृष्णा पाटील
skplanj@gmail.com

No comments:
Post a Comment