Wednesday, August 26, 2020

मांडावरचं झाड

 मांडावरचं झाड  


       दहा-बारा  वर्षापूर्वीची गोष्ट. रात्रीचे जेवण आटोपले होते. शतपावलीसाठी अंगणात  मी फे-या मारत होतो. इतक्यात शेजारच्या दादाने साद घातली , "गुरुजींनु जेवण झालं काय?  आज मांडावर बायांची गाणी आहेत. बघायला येता काय?"


मी म्हणालो,  "बायांची गाणी  म्हणजे काय असतं  हो. अहो लावणी वगैरे आहे की काय?"


"अहो  तसं नाय.तिथे मांडावर  बायांच्या अंगात देवी येते. अंगात झाड भरते.म्हादा  गाणी गातो.तुम्हाला माहीत नसलं तर बघायला तरी चला." दादा म्हणाला.


"मी कधी पाहिलं  नाही  बघू थोडा वेळ झोप येताच परत येऊ. "असं म्हणून  मी हातात  छोटी टॉर्च घेऊन  दादा सोबत निघालो. तो पर्यंत ढोलकीचा व टाळांचा आवाज  घुमू लागला होता. 


       आम्ही शिरीच्या घरा जवळ पोहचलो. प-याच्या पलिकडं  बावडी होती.  तिथं बावडीजवळ मांड  पुजला होता. नारळ, केळी,  पानाचा विडा, हळदी- कुंकू  असं मांडलं होतं. जवळच समई जळत होती. अगरबत्ती, धुपचा सुगंध दरवळत होता. आम्ही प-याच्या अलिकडेच थांबून हे पाहत होतो. माझ्यासोबत आठ दहा माणस  होती. पलीकडं बरीचशी माणसं मांडाच्या भोवती बसली होती. मांडावर  बुवा आपलं मंत्र तंत्र म्हणत होता. म्हादानं  आपलं हिरवं  मफलर मानेभोवती नेहमीप्रमाणे गुंडाळलेलं , डोक्यावर गांधी टोपी. लांब बाह्याच्ं  शर्ट. दोन्ही हातोप्याची  बटणं  नेहमी खुलीच. असा पेहराव करुन आपल्या आवाजात गाणी गात  होता. धरकरी  मंडळी मागून साथ देत होती. ढोलकी व टाळ यांचा आवाज घुमत होता. एक दोन बायकांच्या अंगात झाड भरलं  होतं. प्रत्येक जण  आपली गा-हाणी  देवीपुढे  मांडत होता. कोण आपल्या घरातल्या माणसाचं आजारपण सांगत होता तर कोण  आपल्या गुरांची रोगराई मांड़त होता.यावर उपाय म्हणून काय, किती उपवास, पुजा अर्चा  करायची याचा  उलगडा देवीकडून  होत  होता. मध्येच म्हादा आणि  त्याची भजनकरी मंडळी ढोलकी व टाळ यांच्या तालात  पुन्हा गाणी गात  होती. ढोलकीचा  ठेका जसा चढंल तसा बायांच्या अंगात देवी नाचायला जोर यायचा. असं सर्व मनोरंजन  चालू होतं. शेवटी बुवा सगळं पिशवीत भरुन विडा घेऊन जायचा. बाराच्या आत सगळा कार्यक्रमआटोपायचा . मी  थोडा वेळ कार्यक्रम पाहिला व  दुस-या  दिवशी सकाळची शाळा . लवकर उठून कामावर जायचं  होतं म्हणून घरची वाट  पकडली.


    घरी आलो पण  झोप लागत नव्हती.   खरं तर  अंगात येणं  मी माझ्या बालपणीच पाहिलं  होतं . आमच्या भागात पूर्वी पासून देवदासी प्रथा चालत होती. कायद्याने त्यावर पूढे बंदीही आली. प्रत्येकाच्या घरी यल्लमा देवीची  पुजा केली जायची. रेणुका मातेचे गावात  एक मंदिर . दरवर्षी गावातून भाविक कर्नाटकात सौंदत्तिला जातात. दर पोर्णिमा किंवा मंगळवार  शुक्रवारी देवीची पुजा केली जायची. कांही बायकांच्या अंगात या वारी भरायचं. कौल लावला जायचा. देवीचा अंगारा लावून  प्रत्येकाला पाळणूकीचा सल्ला दिला जायचा. हे सर्व बालपणीच पाहीलं  होतं. श्रद्धा असावी पण  ती अंध नसावी हे शिकत आलो. मीही आई  बरोबर दोनतीन वेळा  सौंदतीला गेलो होतो. तिथं असणारं  सारं चित्र माझ्या समोर आज ऊभं राहिलं होतं.


    त्या रात्री   मी माझी मनाची व्यथा  'मांडावरचं झाड'  कवितेतून कागदावर  मांडली.


ढोलकीवरती थाप पडते,हातातले टाळ वाजू लागतात

मांडावरच्या बायांमध्ये देवी आता नाचू लागतात


लोक म्हणतात, झाड भरलं, झाड भरलं

देवी आता भविष्य नक्कीच सांगेल सगलं 


कोणी तरी मांडासमोर येतो, नारळ नी पैसा ठेवतो

पाया पडून  त्या झाडाला, उद्याचं  भविष्य मागतो


वर्षामागून वर्ष सरतात,विज्ञान युगात माणसं चालतात तरीही ही माणसं, या झाडावरचं  विश्वास  का ठेवतात?


समूळ उपटा ही झाडे, विज्ञानावर ठेवा विश्वास 

तरच नव्या दमाने घेऊ आपण ,नव्या युगातील श्वास


      

         आज  आधुनिक युगात या गोष्टीवरचा  विश्वास कमी झाला  आहे.  अंगात येणे हा एक मानसिक आजार आहे हे पटायला लागलं  आहे.  बहुतेकदा अंगात येण्याच्या घटना अशिक्षित, समाजविरहित राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांच्याबाबतीत घडतात. या व्यक्ती सतत एकच विचार करीत असतात. यामुळे भावनिक व अंधश्रद्धाळू विचार त्यांच्या मनात येतात.  व्यक्ती भ्रमिष्ट होते याला मनोरुग्ण अवस्था म्हणतात. याला न्यूरॉसिस संबोधले जाते. अनेकदा अंगात आलेल्या व्यक्तींची ओटी भरली किंवा प्रसाद देत कपाळी कुंकू लावल्यास ते नॉर्मल होतात. हा सर्व प्रकार त्यांच्या मानसिक भ्रमामुळे घडतो. हे विज्ञानाने सिद्ध केले आहे.अशा व्यक्तींवर संमोहन, मेडिटेशन द्वारे  मानसोपचारतज्ज्ञ  उपचार करत  आहेत. असं झाड आता क्वचीतच पहायला मिळते हेच समाजप्रबोधनाचे यश आहे.आता ही झाडे नष्ट होतील व नवविचारांची, पर्यावरण रक्षण  करणारी झाडे दिसतील हिच अपेक्षा! 





(फोटो: गूगल स्त्रोत )

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...