Friday, September 18, 2020

निशाच्या शिक्षणाची गोष्ट



               दोन वर्षा पूर्वीची  गोष्ट.  सोमवारचा दिवस होता. आठवडा सुट्टीनंतर शाळा  भरली होती. सकाळी शाळेची परिसर सफाई झाली.साडेदहा वाजता परिपाठासाठी घंटा वाजली. मुले सभागृहात जमा झाली. प्रार्थना सुरु होती. कांही मुले उशीरा आल्याने सभागृहाच्या मागच्या दरवाजाने येऊन बसली. तिसरीतील निशालाही आज उशीर झाला  होता. आठवड्यातील किमान दोन -तीन  दिवस  तीला शाळेत यायला उशीर व्हायचाच.  प्रार्थना संपताच मी व माझे सहकारी शिक्षकांनी उशीरा येणा-या मुलाना त्यांच्या कारणांची  विचारपूस केली.  


  "गुरुजीनू,आज आयनं भाकरी लवकर भाजली नाय.म्हणून उशीर झाला " सातवीतला गणेश म्हणाला.


   "गुरुजीनु, मी फाट्यावर दवाखान्यात आजीच्या  सोबत गेलते. " पाचवीतली सायली म्हणाली.


प्रत्येकाची कारणं वेगवेगळी होती. तिसरीतील निशा मात्र रडवेला चेहरा करुन उभी होती. 


मी  तीला  धीर देत विचारलं  , "निशा तुला नेहमी उशीर का होतो?"


      "म..म..माझी वेणी  घालायला कोण  नव्हतं  गुरजी. शेजारची काकी  दररोज  माझी वेणी घालतीया .आज ती कापडं धुवायला प-यावर गेली होती.  तीला आज वेळ  लागला. "  थोडं घाबरत  घाबरत तीनं  उशीर झाल्याचं कारण  सांगितलं.


        "बरं ... बरं... तू घाबरु नको. उशीर झाला  तरी शाळेत दररोज यायचं, आता तू वर्गात जाऊन बस  "  मी व माझे सहकारी तीचे डोळे पाण्याने भरलेले पाहून धीर देत म्हणालो. 

  आम्ही सर्व आपल्या आपल्या वर्गावर  शिकवायला गेलो.  पण , माझ्या डोक्यातील त्या निशाबाबतचा विचार जात  नव्हता.  निशा प्रामाणिक व हुशार मुलगी. घरी शिक्षणाचं  वातावरण नाही. तरीही , ती इतरांपेक्षा आवडीने अभ्यास करायची.   पण..तिला उशीर का होत  असेल? नेमकं  तिच्या  घरचं  वातावरण  कसं काय  असेल ? आपण  तिच्या पालकांना भेटायला गेलंच पाहिजे.  असा विचार मनात आला व तिचे वर्गशिक्षक सावंत गुरूजीना घेऊन  दुस-या दिवशी जायचं ठरलं. 


 दुस- या दिवशी सकाळी  शाळेच्या वेळेपूर्वी  तासभर  सावंत गुरुजी  आले. मी त्यांना घेऊन निशाच्या घरी गेलो. वाडीतील बहुतेक मुले शाळेला निघायची तयारी करत  होती.  आम्ही  निशाच्या घरी पोहचलो.  ओटीवर तिची आजी  आजारी असल्याने अंथरुणात पडून होती. निशा घराच्या परसात केळीच्या झाडाजवळ भांडी घासत होती.  आमचा आवाज ऐकून  ती  ओटीजवळ आली.  अंगावर थोडा मळकट  झगा, हात राखेने काळवंड़लेले. डोक्यावरचे केस अजूनही विस्कटलेले अशा  वेशात  ती चौकटीला लाजत उभी होती.


 मी म्हणालो "निशा , बाबा कुठे गेले  ?." 


तशी चेहरा पाडून  ती म्हणाली, "गुरजीनु, ते सकाळीच प्यायला गेले."

तिचं उत्तर ऐकून व एकंदरीत परिस्थिती बघून 

आम्ही तिला म्हणालो,  “निशा, शाळेत जमल तसं वेळोवेळी येत जा. काळजी करू नकोस. “

“बरं गुरजी..” निशा  म्हणाली व आपलं काम आवरू लागली.



     आदल्या रात्री पिऊन  रिकामी टाकलेल्या बाटल्या कोप-यात ठेवलेल्या.   घरात  दारुचा  दुर्गंध   घुमतच होता. पडवीला कोंबड्यांनी शीतून ठेवलेलं.  घरचे वातावरण पाहून आम्हीही विचारात  पडलो. या विळख्यातून कसं  होणार निशाचं पूर्ण  शिक्षण?


आम्ही निशाच्या कुटुंबाची अधिक  माहिती घेण्यासाठी  तिच्या शेजारच्या सरपंच रमेश तावडे यांच्याकडे  गेलो. सरपंच खळ्यात बसले होते. 

आम्ही दोघांनी  सरपंचाना नमस्कार केला.

“नमस्कार,  गुरूजी  सकाळीच  आज काय काम काढलात?” सरपंच म्हणाले. 

“निशाच्या शिक्षणाबद्दल आपल्याकडं आलो होतो. तिचे बाबा घरी नाहीत. काय परिस्थिती आहे त्यांची?”  मी म्हणालो. 


सरपंच काळजीच्या  स्वरात निशाच्या परिवाराबद्दल म्हणाले,   

“ निशाच्या घरी तिचे बाबा, आजी व ती हे तिघेच जण. मोठी  बहीण मुंबईत नातेवाईकांकडे  शिकायला ठेवलेली. चुलत्याने आपल्या बायका पोरांसह मुंबई गाठलेली. निशाची  आई  निशा  दोन वर्षाची असतानाच देवाघरी निघून गेलेली. आज तिचे बाबा दारुच्या पूर्ण व्यसनाधीन झालेले. आजी सतत आजारी असते .त्यामुळे अंथरुणावर पडून असते. आजोबा सैनिक होते त्यामुळे आजीला पेन्शन चालू आहे. त्यावरच तिचा औषधपाणी  व घरखर्च चालतो. महिन्याच्या एक दोन तारखेला चुलता मुंबईहून येतो. आजीची पेन्शन मधील थोडी रक्कम घेऊन घरात बाजार भरतो. थोडे आपल्या भावाला म्हणजे  निशाच्या बाबाला  देतो व उरलेली रक्कम स्वतः घेतो. थोडेफार मुंबईच्या भावाने दिलेले  पैसे  निशाचे बाबा  दारुत घालवतो. कसातरी आठवडाभर खर्च चालतो. तिथून पुढे महिना काढायचा म्हणजे  त्याना  मुश्कीलच!”


        निशाच्या शेजारी  राहणा-या सरपंच रमेशरावांनी   दिलेली   सविस्तर माहिती ऐकून आम्ही  विचारात पडलो. पण, तिच्या शिक्षणासाठी  सरपंच साहेबांना म्हणालो,  “ सरपंचसाहेब,    निशा एक हुशार मुलगी आहे . तिला अभ्यासात  खूपच रस आहे. तिच्या शिक्षणासाठी आपण प्रयत्न करुया .” 

सरपंचानी तिच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा शब्द दिला.  

  निशाला दरवर्षी शाळेचा गणवेश दिला . कांही जुने वापरायला कपडे शेजारचे लोक देत. शाळेतून  वह्या पुस्तके यांची मदत व्हायची. दरवर्षी सावित्रीबाई दत्तक पालक योजनेतून  तिला शिक्षणासाठी मदत द्यायला सुरुवात केली. कांही मंडळे  शाळेत दरवर्षी शालेय साहित्य देत   त्यातील तिला प्राधान्याने साहित्य देऊ लागलो.   


     सर्वांच्या मदतीने तिचं शिक्षण  सुरु होतं. पण..पोटाचं  काय?  घरी निशाच स्वयंपाक करायची. भात, आमटी आणि  अगदी भाकरी सुद्धा.!  


पण  हे सर्व घरात शिधा भरली असेल तरच ना! 


शुद्धीत असलेला बाप कधीतरी मदत करायचा नाहीतर... नशेत असला तर नेहमी खाटेवर पडूनच!  बापाच्या नशेने निशाचं जीवन अमावस्येच्या काळ्याकुट्ट निशेगत झालं होतं. तिच्या जीवनात भाकरीचा चंद्र केवळ शिक्षणानेच  प्राप्त होणार होता.  शिक्षणाच्या ओढीने ती पोटची भूक ठेऊन शाळा  गाठायची. दुपारचा शालेय पोषण आहार हाच तीचा  अर्ध्या दिवसाचा आधार! 


   कधी कधी सकाळी शाळेत येताना तीला  शाळेत पोषण आहार शिजवणारी चंपा काकी भाकरी द्यायची. कधी शेजारी द्यायचे.कोणीतरी दिलेले पैसे साठवायची. शाळेसाठी खर्च करायची.


आम्ही म्हणायचो,"अगं शाळेचं साहित्याची तू काळजी करु नकोस, उपाशी राहू नको.एखादा बिस्किट पुडा घे खा. "  


आम्ही गुरुजन मंडळी  तिच्या खाण्याची दररोज चौकशी करत असे. शिजवलेला   शिल्लक पोषण आहार डब्यातून तिला घरी दिला जाऊ लागला. शाळेतील तिच्या वर्गातील मुले तिला मदत करायची. 


आज निशा पाचवीत शिकते. तिची मुंबईत नातेवाईंकाकडे  राहणारी एक मोठी बहीण गीताही गावी आली  आहे. तीही आठवीत शिकते. जवळच्याच हायस्कूलमध्ये ती जाते.


   निशाच्या  बाबाना आम्ही  गुरुजन वेळच्या वेळी  भेट घेऊन  सांगू लागलो.


"मुली मोठया झाल्या  आहेत. आता त्यांच्याकडे लक्ष द्या.  त्या नक्की तुमचा  सांभाळ करतील. व्यसन सोडा. मुली तुमचं भविष्य आहेत. तुमची आईच्या नंतर तुम्हाला कोठून पैसे मिळणार? कष्टाशिवाय पर्याय नाही."


आमच्या  वारंवार बोलण्याने त्याना शरमल्यासारखे वाटू  लागले. 

      आजकाल  त्यानी दारु  पिण्याचं प्रमाण कमी केलं आहे. शेतीच्या कामासाठी मजुरीला जायला सुरुवात केली आहे.  स्वतःची भातशेतीही कसायला सुरु केली आहे.


    निशाची  मोठी बहीण गीता  आता तिला सावलीसारखी साथ देत आहे.  तिच्या अभ्यासात ती मदत करते .निशाची अभ्यासातील प्रगती, तिला लहानपणीच आलेले व्यवहारज्ञान पाहून आमची साहेब मंडळीही  तिला वेळोवेळी शाबासकीची थाप देतात व निशाबद्दल आम्हा सर्वांच्या  तोंडून एकच वाक्य येते-  “ एक दिवस  नक्कीच नाव कमावेल ही मुलगी  ! ”






No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...