Monday, July 6, 2020

थोडं थांबणं शिकायला हवं



थोडं थांबणं  शिकायला हवं 

       सध्याचं युग हे प्रचंड स्पर्धेचं आणि तंत्रज्ञानाचं युग आहे . गतीची भयंकर सक्ती असलेला काळ म्हणूनही हा काळ ओळखला जातो. ‘थांबला तो संपला’ हा नियम बनवून प्रत्येकजण  अगदी  सुसाट धावत सुटलाय. कुणाला कुणाशी बोलायलासुद्धा वेळ नाही. कोण कुणासाठी  थांबत नाही. प्रत्येकालाच वेळ किमती आहे, पण दुसऱ्यासाठी थोडं थांबलं पाहिजे.  कधी कधी  ते आपल्यासाठीही  फायदेशीर असतं.  पण, आज ही परिस्थिती दिसत नाही . कोणालाच  दुसऱ्यासाठी थांबायला  वेळ नाही  आणि स्वतःसाठीही  थोडं  थांबणं  जमत नाही. वाहतुकीचे नियम न पाळता,  थोडा वेळही न थांबता ,बेफाट वेगाने वाहने चालवून  रस्त्यावरती अपघात होताना आपण पाहतो. कानाला इअरफोन आणि हातात मोबाईल घेतलेला आजचा माणूस जगाशी कनेक्ट असेलही, मात्र आपल्या माणसांपासून तो दुरावला आहे. भ्रमणध्वनीचे उंच मनोरे सभोवताली उभे राहत आहेत .तरीही या हृदयाची त्या हृदयाला रेंज मिळेनाशी झाली आहे.  संवादाच्या रेंज पासून माणसं आऊट ऑफ कव्हरेज होत आहेत म्हणूनच   थोडं थांबणं शिकायला हवं.

    आज प्रत्येक जण आपले काम लवकरात लवकर झाले पाहिजे .याच्यासाठी धडपडत असतो. बसस्थानक, रेल्वेस्थानक , बँक ,सरकारी कार्यालय अशा ठिकाणी आज आपण रांग पाहिली तर प्रत्येक जण आपले काम लवकर होण्यासाठी ढकलाढकली  करत असतो. प्रत्येकालाच काम ही महत्त्वाचे असते आणि वेळही नसतो. पण आपण शिस्तीमध्ये सर्व कामं केली पाहिजेत .काळ कितीही धावत सुटला तरी जीवनातील शिस्त आपण जपली पाहीजे. विकसित देशांमध्ये असणारी शिस्त पाहता आपण फारच मागे आहोत.
      
      जीवनाचे मार्गक्रमण करत असताना कधी कधी कळत नकळत वाईट सवयी लागत असतात. कधी कधी आपण त्यांच्या पूर्ण आहारी जातो. पण कुठे थांबायचं हे आपल्याला समजले पाहिजे . सुरुवातीला गंमत म्हणून  सुरू केलेली मजा जीवनामध्ये  कधी सजा देऊन जाते हे कळणार सुद्धा नाही . आपल्या ध्येयपूर्तीसाठी जीवननौका कुठे थांबवायची  आणि  यशाचा किनारा कसा गाठायचा हे ज्याला  समजतं  तोच जीवनात यशस्वी  होतो .आज काल आपण वर्तमानपत्रांमध्ये नापास होण्याच्या भीतीने किंवा  कमी गुण प्राप्त झाल्याने निराशेपोटी विद्यार्थी आत्महत्या होत असलेल्या बातम्या वाचतो. आपण स्वतःपासून आणि इतरांकडून इतक्या अपेक्षा ठेवतो कि, वेळोवेळी आपला मनोभंग होतो. त्यामुळे वास्तवाचं भान ठेवून अवास्तव अपेक्षा ठेवणं थांबवलं पाहिजे.ते अपेक्षांचं ओझं मुलांच्यावर लादणं थांबलं पाहिजे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी लॉटरी, जुगार यांच्या मोहात अडकून अनेक जण कर्जबाजारी झाले आणि आपलं आयुष्य उध्वस्त केलं. श्रीमंत होण्याचा मोह थांबला पाहिजे हे त्यांना कळलच नाही.

    आपण आपलं आयुष्य मार्गक्रमण करताना थोडं थांबून तपासले पाहिजे.'जे जीवन किंवा आयुष्य तपासून पाहिले जात नाही, ते जगण्याच्या लायकीचे नाही, 'असं सॉक्रेटिसचे एक वचन आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्याची चिकित्सा केली पाहिजे. आपली क्षमता, आपल्यातले प्लस पॉईंट, मायनस पॉईंट जाणून घेतले पाहिजे .आपल्या आयुष्याचा मार्ग  चालला पाहिजे.  योग्य वेळी योग्य ठिकाणी थोडं थांबायला हवं हे मात्र शिकलं पाहिजेच!

 -श्रीकांत पाटील
skplanj@gmail.com

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...