Sunday, June 14, 2020

वर्दीतला देव


           


      गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या पंधरवड्यात अतिवृष्टी व महापूराने थैमान घातले .याच महाप्रलयात  कर्तव्यनिष्ठा बजावत असताना दीड किलोमीटर पूराच्या पाण्यातूनही दोन मुलींना खांद्यावर घेऊन  खाकी वर्दीतील पोलीस कॉन्स्टेबलने त्याना जीवदान दिले आणि त्यांच्यासाठी ते देवदूत ठरले.  अपघात, दंगल, भूकंप, महापूर या परिस्थितीत कर्तव्यापासून कधीच दूर नसणारा वर्दीतला माणूस अर्थात पोलीसच.'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद उराशी बाळगून सामान्य जनतेला सुरक्षित  ठेवण्यासाठीच  असते ही पोलीस सेवा .पोलिसयंत्रणेच्या सेवा अनेकाविध आहेत. झाडावर अडकलेल्या मांजरीला सोडवण्यापासून अतिरेक्यांनी ओलीस ठेवलेल्यांना सोडवणे आणि बँक लुटणाऱ्‍यांचा सामना करण्यासारखी बहादुरी त्यांना करावी लागते. पण एक गोष्ट मात्र खरी, की आधुनिक काळातील पोलिसयंत्रणेचा जन्म झाल्यापासूनच या सेवेबद्दल लोकांच्या मनात अनेक आशा आणि आशंका देखीलआहेत.
      लहानपणी मला पोलिसांचे खूपच अप्रूप वाटायचे कारण ते लोकांना धोकादायक परिस्थितीतून सोडवतात. पोलिस खात्यात माझ्या एका  मित्राची उपनिरीक्षकपदी निवड  झाली.  सुरूवातीला  गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त  भागात   त्याची नेमणूक  झाली.  दररोज तिथे नक्षली लोकांच्या कुरापती चालूचअसायच्या.परिस्थितीने हिंसक वळण घेऊ नये म्हणून काळजी घेण्याचे त्याचे काम होते.  नक्षलींचे क्रूर मनसुबे उध्वस्त करण्यासाठी त्यांचे पोलिसपथक सदैव तयार असायचे.  यामध्ये आलेले यश पाहून  मनाला समाधान वाटते असे ते सांगत.
 या कामात तोचतोपणा नाही,दररोज नवी आव्हाने . बऱ्‍याच लोकांना कल्पना नाही, पण गुन्हेगारीला आळा घालणे हे पोलिसांच्या कामांत केवळ २० किंवा ३० टक्के मोडते. ही मुळात एक समाजसेवा आहे. सर्वसामान्यपणे दररोज आम्ही काय काय करतो याचा आढावा घेतल्यास, आकस्मिक मृत्यू, रस्त्यावरील दुर्घटना, एखादा गुन्हा हाताळणे आणि एखाद्या वाट चुकलेल्या वयस्क व्यक्‍तीला मदत करणे यांसारखी कामे करावी लागतात. खासकरून एखाद्या हरवलेल्या मुलाला सुखरूप घरी पोचवण्यात किंवा गुन्ह्याला बळी पडलेल्या व्यक्‍तीला सांत्वन देण्यात आगळेच समाधान मिळते.
     जगातल्या कोणत्याही भागात आपण रहात असलो तरीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती सर्वत्र आढळते, केवळ सुसंस्कृतपणाच्या पडद्याखाली ती लपलेली आहे इतकेच. पोलिसांच्या संरक्षणाची समाजाला नितांत गरज आहे. अर्थात काही पोलिस अधिकारी स्वतःच निर्दयी, भ्रष्टाचारी, बेपर्वा वृत्तीचे असतात आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करतात. प्रत्येक ठिकाणी हे कमी जास्त प्रमाणात आढळते पण, पोलिस खाते अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या लोकांकडूनच  बदनाम होते.ही खाकी वर्दी समाजासाठी आहे.लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी नाही हे आता जाणले  पाहीजे. वर्दीची शान जपलीच पाहिजे.

      दिवाळी ,गणेशोत्सव ,ईद ,मोहरम असो वा रक्षाबंधन असा कोणताही सण  पोलिसांच्या नशिबी क्वचीतच येतो.तुटपुंज्या पगारात सदैव काम करायचं  आणि लोकाना आनंदात सण साजरा करु द्यायच हेच कर्तव्य पोलिस बजावतात . बऱ्‍याचदा अतिशय आवश्‍यक असणाऱ्‍या सेवाही पुरवतात.तरीही पोलीस म्हणजे  एक उपेक्षित आणि गृहीत धरलेला माणूसच राहतो .कधी संप,मोर्चे तर कधी दंगल आणि उरुस यातून तर  त्याची सुटकाच नसते.यांचे सगळे आयुष्य  बंदोबस्त करण्यातच जाते.तरीही कर्तव्य बजावल्यावर  जनतेच्या चेह-यावर जेव्हा आनंद दिसतो तेंव्हा या पोलिस सेवेचा आपणास  सदैव अभिमानच वाटतो.सलाम या वर्दीतल्या माणसाला.
 
- श्रीकृपा
     

No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...