"अण्णा,आज फिरायला जायचे ना?"
"हो जाऊ ,थोडा फ्रेश होतो मग लगेच निघू."
"अण्णा , मी ही थोडा चहा घेतो आणि मग जाऊ"
अंतू अण्णा आणि माझ्यातला हा नेहमीचा संवाद. शाळा सुटली की घरी येऊन थोडया वेळाने सायंकाळी आम्ही फिरायला निघायचो. फिरत फिरत आम्ही नेहमीप्रमाणे बंधा-या पर्यंत पाय मोकळे करून येतअसे..कधी कधी जवळच असणा-या मंदीरात थोडावेळ बसुनही गप्पा व्हायच्या.अंधार व्हायच्या आत आम्ही पुलाजवळ्च्या दुकानापर्यंत पोहचत असू.
दुकानाच्या कट्ट्यावर सन्ध्याकाळी फिरत फिरत नेहमी येणारी ज्येष्ठ मंडळी बसलेली असायची. दुकानाशेजारीच रहाणारे पांडू तात्या, काठी टेकत टेकत विडीसुपारी आणायला येणारे जाबर - राजाराम तावडे ,तसेच आपले दिवसभराचे रोजनदारीचे कांमआटोपून मारुती अण्णा, श्री तावडे व विलास अशी मंडळी गप्पा मारत बसायची.
आम्हा दोघाना पाहून "या गुरूजी. जरा थोडा वेळ बसा."अशी नेहमी हाक असायची.
अन्तू आण्णा दुकानातील थोडे चणे घेऊन सर्वांच्या हातात थोडे थोडे देत.चणे खात खात थोड्या गप्पा रंगात येत असत. कधी पाऊस पिकांच्या,तर कधी वाडीवस्तीतील सुख -दुखाच्या गप्पा होत.शेजारचे शिवराम अण्णा आपल्या गायगुरांची कांम आटोपून कधितरी वेळ काढायचे.
त्या दिवशी मी एकटाच फिरून आलो होतो.अंतू अण्णा गावी गेले होते. मावळतवाडीतीलही काही मंडळी दुकानावर आली होती.शिवराम अण्णा आपले शेतीचे कांम आटोपून घराकडे चालले होते.
मी आण्णा ना हाक दिली."नमस्कारअण्णा ,"
आण्णाही नेहमीप्रमाणे दोन्ही हात कोपरापर्यंत जोडून मला म्हणाले, "नमस्कार गुरूजी,काय कस काय चाललय?"
त्यांच्या या नेहमीच्याच प्रश्नाला मी म्हटले,"आण्णा मस्त चाललय, आज काय तुम्ही निवांत आहे?"
"निवांत कुठला,आत्ताच वासराला चार घेऊन आलो."
अण्णांच्या गप्पा सुरु झाल्या.कधीकाळी मुंबईत घडलेले गमतीशीर प्रसंग सांगायला आण्णानी सुरुवात केली.सर्वजण तो प्रसंग ऐकण्यात दंग झाले. मावळतवाडीतील काशा तात्या, मारुती अण्णा, डॉक्टर नाना ,मुंबईहून आलेले विजुभाऊ अशी सर्व मंडळी शिवराम अण्णांच्या हावभावाकडे टक लावून बघत होती. सर्वांचेच मनोरजंन त्यातून व्हायचं आणि हास्यकल्लोळ माजायचा. कधी कधी हे जीवनांबद्दल अनुभव खूप काही शिकवण देऊन जायचे.
आज गावाकड माणसांची खुपच कमीआहे. नोकरीधंद्याच्या निमित्ताने तरुण मुलानी मुंबई,पुण्यातच संसार मांडलेले.गावात म्हातारे आईबाप आणि एखादा शेती कसणा-या भावाचेच कुटुंब. आयुष्यभर कष्ट करून ही ज्येष्ठ मंडळी आयुष्याच्या सन्ध्याकाळी मन रमवायचा प्रयत्न करतात. कोणाचे शरीर शेती धंद्यात काबाडकष्ट करुन आज थकलेले तर कोणाचे ओझी उचलून मणका झिजलेले.उतारवयात मुले विभक्त राहून संसार थाटल्याने काही जणांची तर फारच परवड होते. आयुष्यात प्रत्येक माणसाची ही
कातरवेळ आनंदी, आरोग्यादायी गेली पाहिजे असे वाटत असेल तर या ज्येष्ठा पासून कधीच दुर होऊ नये. त्यांचा आयुष्यभर सांभाळ करावा.तरच आपली येणारी पिढी आपला विचार करेल.
न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा।
वृद्धा न ते ये न वदान्ति धर्मम्।।
ज्या सभेत वृद्ध, अनुभवी लोक नसतील ती सभा नव्हे. जे धर्म सांगत नाहीत ते वृद्धच नव्हेत.अशा प्रकारे महाभारतात वृद्धांचा गौरव केलेला आहे. तोच वारसा आपण पुढे चालवला पाहिजे.
श्रीकृपा

No comments:
Post a Comment