'प्रशंसा 'ही माणसाला थोड्या कालावधीसाठी सुख देणारी गोष्ट असते. काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची प्रशंसा करतात. मी कॉलेज करत असतानाची गोष्ट. प्राध्यापक महाशयांनी आम्हाला हिंदी मधून एक पाठ शिकवला- 'चाटूकारिता भी एक कला है '. 'चाटूकारिता' म्हणजे प्रशंसा. या पाठातील एक प्रसंग आजही मला आठवतो. एका पानपट्टीच्या टपरीत एक माणूस रोज पान खाण्यासाठी येत असे. टपरीवाला त्याला आपल्या हात चलाखीने पान मसाला बनवून देत असे. तो माणूस पान खाऊन झाल्यावर "वा! काय पान आहे," तुझ्या हातचे पान खाण्यात खूपच मजा वाटते." असे नेहमी टपरीवाल्याची तो प्रशंसा करत असे.
काही दिवसानंतर त्या माणसाला टपरीवाल्या कडून फुकटची पाने मिळू लागली. प्रशंसेची माळ नेहमी गळ्यात पडू लागल्याने टपरीवाला अशा माणसांवर नेहमी खुश असायचा, पण आणखी काही दिवसानंतर त्याचा धंदा कमी होऊ लागला व एके दिवशी ती टपरी
बंद पडली.
एखाद्याने केलेल्या प्रशंसेचा आनंद कोणत्या पातळीपर्यंत घ्यायचा आहे हे ज्याचे त्याने ठरविले पाहिजे. आपल्या समोरील माणूस आपली प्रशंसा का करतो? किती वेळा करतो? याची पारख आपल्याला करता आली पाहिजे . आपल्या मराठी भाषेत याला 'हरभऱ्याच्या झाडावर चढवणे' असे म्हणतात.अशा लोकांची आज कमी नाही. यातून प्रशंसेचे स्वार्थी रूप दिसते.
प्रशंसा आणि कौतुक हे अर्थाच्या दृष्टीने जवळचे शब्द वाटतात. पण, कौतुक आपले तेव्हाच होते जेव्हा आपल्याला यशप्राप्ती मिळते. कोणत्याही कामात यश प्राप्त झाल्यास कौतुकाची थाप आपल्या पाठीवर पडत असते. त्यामुळे आपल्याला पुढील कार्य करण्यास प्रेरणा मिळते. म्हणजेच,' कौतुक' हे नेहमीच प्रगतीकडे नेण्यासाठी मदत करत असते यामध्ये स्वार्थाचा अंश कमी दिसतो. तसेच, कौतुक करणे हे मनाचे मोठेपण दाखवते. दुसऱ्याच्या यशाचा आनंद जर झाल्यास आपल्या विशाल मनाचा मोठेपणा दिसून येतो.
आजच्या या जगात स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याची प्रशंसा करून लुबाडणा-यांची संख्या काही कमी नाही. दुसऱ्यातील चांगल्या गोष्टींचे 'कौतुक ' करून प्रेरणा देणा-यांची आज कमतरता भासते . आपण केलेल्या कौतुकाने दुस-याच्या यशाची पताका कशी फडकत राहील ही अपेक्षा करणाऱ्यांची तर आज वानवाच . कारण ,आजच्या समाजात जसे खुल्या मनाने जगणारी माणसे आहेत तसेच खेकडा प्रवृत्तीची ही माणसे आहेत ही दोन्ही रूपे निस्वार्थी कौतुकाची व स्वार्थी प्रशंसेची दिसून येतात.
श्रीकृपा
No comments:
Post a Comment