शाळेचा पहिला दिवस
वाचक मित्रहो लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला शाळेतले दिवस आठवले असतील. हायस्कूलमध्ये असताना मराठीच्या पेपरमध्ये निबंध लेखनासाठी असणारा हा विषय. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचा पहिला दिवस अगदी आठवणीतला. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून तुम्ही तो परीक्षेतील गुणांसाठी कागदावर मांडलाही असेल वा संवादातून सांगितलाही असेल. पण आज मी शिक्षकाच्या भूमिकेतून लिखाणास घेतला आहे. होय..... शिक्षक म्हणून माझा 'शाळेचा पहिला दिवस'
खरं तर नोकरी म्हणून 'नोकरीचा पहिला दिवस' हा विषय यापूर्वी मी एका लेखातून मांडला आहेच. पण रत्नागिरीतील सुमारे तेवीस वर्षे नोकरीचा कालावधी संपवून मी यंदा तेवीस सप्टेंबरला जिल्हा परिषद कोल्हापूर येथे हजर झालो. शासन निर्णयानुसार आठवडाभरात एखाद्या शाळेवर हजर होईन असे वाटले होते. पण तब्बल तीन महिने झाल्यावर हे वर्ष संपता संपता तेवीस डिसेंबर हा दिवस उजाडला आणि जिल्हा परिषद कोल्हापूर येथे समूपदेशनाने मला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील तालुका चंदगड मिळाला. या तालुक्यातील शाळा होती "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी".
२४ डिसेंबर २०२४. शाळेत हजर होण्यासाठीचा दिवस. गडहिंग्लज बसस्थानकाहून सकाळीच चंदगड बसमधून प्रवास सुरु झाला. गुगलवरुन गावचे लोकेशन शोधले होतेच. पण तिथे जाण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाकडून माहिती घेतली. नागणवाडी स्टॉपला उतरून तिथून तालुक्यातून बेळगाव जाणार्या कोणत्याही बसने गुडेवाडी फाट्यावर यायचे. तिथून साधारण दोन किलोमीटरवर शाळा असल्याची त्यांनी माहिती दिली. कोकणातील शाळेत जाण्यासाठी चार-पाच किमीची सुरुवातीच्या वर्षांची पायपीट अनुभवाला होतीच. त्यामुळे दोन किमी सहज चालत जाऊ असा मनात विचार केला. प्रवास सुरु असतानाच माझ्या कांही शिक्षक मित्रांनी मला शाळेवर नेण्यासाठी तेथील शिक्षकांना फोनाफोनी केली होती. दरम्यान त्यांचे फोन प्रवासात मला आले. त्यापैकी एक काॅल होता दाटे केंद्रमुख्याध्यापकांचा. ते म्हणाले, " मी नागनवाडीत येतो .तुम्ही तिथेच थांबा." कांही वेळेनंतर बस नागणवाडी गावात आली. शालेय विद्यार्थी व प्रवासी उतरू लागले. मीही बसमधून उतरलो. बस चंदगडकडे निघून गेली. सरांची वाट पाहत मी सांवतवाडी-बेळगाव रस्त्यावरील जाणारी वाहने पाहत स्टाॅपवरील उंबराच्या झाडाखाली बसलो.
इतक्यात एक कारगाडी माझ्याजवळ थांबली. माझी पाठीवर घेतलेली सॅक व पेहराव पाहून चालकांकडून मला विचारणा झाली.
" तुम्ही पाटील सर ना?"
मी त्यांना नमस्कार करत "होय "म्हणालो.
" मी गावडे सर , तुमचे चंदगड तालुक्यात हार्दिक स्वागत!" असे म्हणत त्यांनी माझ्या हातात हात देत गाडीत बसायला सांगितले आणि गाडी शाळेकडे जाण्यास मार्गस्थ झाली. प्रवास दरम्यान सरांनी आपली ओळख सांगितली. गावडे सरांबरोबर केंद्राविषयी संवाद झाला. आज शाळा तपासणीची सुट्टी असल्यानेच तुम्हाला वेळ देता येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी गाडी गुडेवाडी फाट्यातून आत वळवली . गावच्या लालमातीचा गंध येत होता. गावच्या गल्लीतून जाताना लोकांचे चंदगडी बोलीतील शब्द कानावर पडत होते. बोलीतील शब्दांचे सूर कानाला सुखावून सोडत होते. कोणतीही बोली ही हृदयाची भाषा असते. तिला प्रमाणबद्धतेची चौकट नसते. म्हणून ती ओसंडून वाहते. आपल्या मराठी भाषेचे अशा बोलींमुळेच अभिजातपण दिसून येते.
सरांनी एका शाळेजवळ गाडी थांबवली. शाळेच्या षटकोणी आकाराच्या इमारतीचे रंगकाम चालू होते. जुन्या कौलारू इमारतीत मुले बसली होती. आम्हाला पाहून शाळेतील एक तरुण शिक्षक आमच्या गाडीजवळ आले. गावडे सरांनी मला त्यांची ओळख करुन दिली."हे नामदेव पाटील सर. शिक्षणसेवक पदी चारमहिन्यापूर्वी हजर झालेत." मला चेहरा ओळखीचा वाटला. पाटील सरांनी त्यांच्या नाधवडे(ता. भुदरगड)गावात पूर्वी आपली भेट झाल्याची आठवण करून दिली. दरम्यान ही शाळा पाहून आपण मजरे जट्टेवाडीत आल्याचे गावडे सरांना समजले. मजरे व मौजे यामुळे नेमका गोंधळ झाल्याचे म्हणाले. मला माझ्या सासरवाडीतील खुर्द व बुद्रुक यामध्ये अजूनही गोंधळ होत असल्याचे गमतीची आठवण गावडे सरांनी सांगितली व सर्वांना हसू फुटले. पाटील सर म्हणाले, "आता चुकून आलातच तर शाळेत या." आम्हाला शालेय प्रांगणात बोलावले. मुलांच्या टाळ्या घेत आमचे शाब्दिक स्वागत झाले व आम्ही मौजे जट्टेवाडीकडे निघालो. वाटेत कमान दिसली. कमानीवरच्या गावच्या नावाच्या अक्षरांचे रंग उडून गेले होते. त्यामुळेच गाडी मजरे जट्टेवाडीत पोहचली होती. हे लक्षात आले.
आता गाडी कमानीतून मौजे जट्टेवाडी गावच्या वेशीत पोहचली. आजूबाजूला नुकताच ऊस कारखान्यास गेल्याने शेतातील खोडव्यांला पालवी फुटली होती. रस्त्याच्या एका बाजूला अजूनही तोड न आलेला त्या तांबड्या मातीतील ऊसाच्या तुर्यांनी माझे स्वागत केले. वाडीतील गल्लीतून गाडी शाळेजवळ पोहचली. एका टुमदार छोट्याशा कमानीवर शाळेचं नाव दिसलं. "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी". दोन वेगवेगळ्या नवीन वर्गखोल्या दिसल्या. कमानीतून प्रवेश करताना ज्ञानमंदिराला नमस्कार केला. अन् 'शाळेचा पहिला दिवस' सुरु झाला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार मॅडम व मुलांनी आमचे स्वागत केले. शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ हातात देत स्वागत झाले. दरम्यान मी आजचा दिवस खास असल्याचे सांगत पिशवीतील गोष्टींची पुस्तके काढली. आज सानेगुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. त्यांना अभिवादन मुलांना पुस्तकभेट देऊन केले. या पवित्र दिवशी माझे माझ्या जिल्ह्यात ज्ञानदानाचे काम सुरु होत आहे . हे भाग्य असल्याचे सांगितले. दरम्यान दिवसभरात पालकवर्ग, तालुक्यातील कांही शिक्षकमित्र येऊन स्वागत करत होते. मुले पुस्तके न्याहाळण्यात दंग होती. आपल्या डाॅ.ए.पी.जे.अब्दुलकलाम फिरता वाचनकट्ट्यामार्फत मुख्याध्यापिका मॅडमना 'श्यामची आई' पुस्तक भेट दिले व पुष्पगुच्छ नको, पुस्तक द्यावे असे सर्वांना आवाहन केले.
दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याचे मुलांना सांगितले. कांही मुलांच्या हातात पुष्पगुच्छातील फुले दिली. शाळा सुटल्यानंतर मला बसथांब्यावर नेण्यासाठी आम्हा शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेसाठी धडपडणारे शिक्षकमित्र शाहू पाटील सर आले. त्यांनी माझे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस आनंद मनात ठेवून अस्ताकडे जावू लागला अन् मीही गावी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.
✍️श्रीकांत पाटील

No comments:
Post a Comment