Sunday, December 29, 2024

गुरुजींचं स्वागत

 गुरुजींचं स्वागत🎉🌷🌹


      २०२४ सालचा शेवटचा आठवडा. नव्या वर्षाची चाहूल सर्वांना लागली आहेच! माझ्या मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी, (ता.चंदगड, जि. कोल्हापूर) शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनाही हा शेवटचा आठवडा उत्सुकतेचा होता, कारण याच आठवड्याच्या सुरुवातीला त्यांना चाहूल लागली होती शाळेत नवे गुरुजी येण्याची! आणि शेवटी तो पवित्र दिवस उजाडला. २४ डिसेंबर. सव्वाशे वर्षापूर्वी याच दिवशी आपल्या महाराष्ट्रात सानेगुरुजींचा जन्म झाला . अशा मंगल दिवशी नव्या शाळेत रुजू होणं व मुलांना गुरुजी मिळणं हे दोघांचंही भाग्यंच!


       पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक , ग्रामस्थ, शिक्षकमित्रपरिवार यांनी माझं स्वागत केलंच .पण मुलांना उत्सुकता होती नवे गुरुजी कोणत्या वर्गानां शिकवणार? म्हणजेच ते कोणाचे वर्गशिक्षक होणारं? दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी होती तसेच आठवडाभरात वार्षिक शाळातपासणीही तोंडावर आलेली. त्यामुळं वर्गनियोजन करणं आवश्यक होतं. त्याच दिवशी सायंकाळच्या सत्रात आम्ही वर्गनियोजन पारं पडलं. मुख्याध्यापिका सुतार मॅडमनी मला सहविचारने इ. तिसरी व चौथीचा वर्ग दिला. शाळा सुटली . पण मुलांना त्यांना कोण वर्गशिक्षक मिळणार याची त्यादिवशी कल्पना नव्हती.


              नाताळच्या सुट्टीनंतर २६ डिसेंबरला मुले शाळेत आली . ठरल्या वेळेप्रमाणे परिपाठ झाला. एका वर्गखोलीत पहिली -दुसरीचे वर्ग बसायचे व दुसऱ्या वर्गखोलीत तिसरी -चौथीचे. दोन्हीही वर्गखोल्या स्वतंत्र इमारतीत. मी हजर होण्यापूर्वी महिनाभरासाठी याच वर्गावर एक शिक्षिका होत्या. त्याही पाटील बाईच! पण आज मुलांना कायमस्वरुपी गुरुजी मिळणार होते अन् तेही पाटील गुरुजीच! त्यामुळे सर्वच खूश.


      मी वर्गावर जाण्यास निघालो. वर्गाचा दरवाजा काही अंशीच उघडलेला. आत प्रवेश करताना दरवाजाच्या आडोशाला कोणीतरी विद्यार्थी ऊभे असल्याचे मला दिसले. मला वाटले वर्गाच्या कोपऱ्यातील कचराटोपलीत कागदाचे कपटे टाकण्यास कोणीतरी उभा असेल. मी वर्गाचा उंबरठा ओलांडला. आत पाय टाकताच सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आवाजात " वेलकम सर ! " म्हणत माझ्या अंगावर गुलाब पाकळ्यांची वृष्टी केली. आनंदाने नाचत टाळ्या वाजवल्या. मी केवळ त्या गुलाबांच्या पाकळ्यात न्हाऊन गेलो नाही तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने न्हाऊन निघालो. असं स्वागत मी आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो. मला सर्व मुलांनी खुर्चीजवळ नेलं. टेबलावर कांही पांढरे व कांही लाल गुलाब होते . ते माझ्या हातात देत माझं स्वागत व अभिनंदन केलं. मी मुलांच्या प्रेममय स्वागताने भारावून गेलो.


      मी मुलांना विचारलं, "मुलांनो , माझं अशाप्रकारे स्वागत करायला तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्हाला हे कसं सूचलं? कोणी पालक वा शिक्षकांने सांगितलं की काय?"

मुले म्हणाली, " असं काहीच नाही. हे वर्गातील सर्वांनीच अगोदर ठरवलं होतं. पायल, स्वरा, आरुशी यांनी फुलं आणली, कांही फुलांच्या पाकळ्या काढल्या व आम्ही तुमचं स्वागत केलं. खरंच, मुलं म्हणजे देवाघरची फुलंच! त्यांचं भावविश्व वेगळं असतं. ते आपण शिक्षक व पालक म्हणून जपायला हवं!


 सर्व मुलांना मी मनःपूर्वक धन्यवाद दिले व दैनंदिन कामकाजास सुरुवात झाली.


✍️श्रीकांत पाटील



शाळेचा पहिला दिवस

 शाळेचा पहिला दिवस



       वाचक मित्रहो लेखाचे शीर्षक वाचून तुम्हाला शाळेतले दिवस आठवले असतील. हायस्कूलमध्ये असताना मराठीच्या पेपरमध्ये निबंध लेखनासाठी असणारा हा विषय. प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेचा पहिला दिवस अगदी आठवणीतला. विद्यार्थ्यांच्या भूमिकेतून तुम्ही तो परीक्षेतील गुणांसाठी कागदावर मांडलाही असेल वा संवादातून सांगितलाही असेल. पण आज मी शिक्षकाच्या भूमिकेतून लिखाणास घेतला आहे. होय..... शिक्षक म्हणून माझा 'शाळेचा पहिला दिवस'


      खरं तर नोकरी म्हणून 'नोकरीचा पहिला दिवस' हा विषय यापूर्वी मी एका  लेखातून  मांडला आहेच. पण रत्नागिरीतील सुमारे तेवीस वर्षे नोकरीचा कालावधी संपवून मी यंदा तेवीस सप्टेंबरला जिल्हा परिषद कोल्हापूर येथे हजर झालो. शासन निर्णयानुसार आठवडाभरात एखाद्या शाळेवर हजर होईन असे वाटले होते. पण तब्बल तीन महिने झाल्यावर हे वर्ष संपता संपता तेवीस डिसेंबर हा दिवस उजाडला आणि जिल्हा परिषद कोल्हापूर येथे समूपदेशनाने मला जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील तालुका चंदगड मिळाला. या तालुक्यातील शाळा होती "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी".  


       २४ डिसेंबर २०२४. शाळेत हजर होण्यासाठीचा दिवस. गडहिंग्लज बसस्थानकाहून सकाळीच चंदगड बसमधून प्रवास सुरु झाला. गुगलवरुन गावचे लोकेशन शोधले होतेच. पण तिथे जाण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिकाकडून माहिती घेतली. नागणवाडी स्टॉपला उतरून तिथून तालुक्यातून बेळगाव जाणार्‍या कोणत्याही बसने गुडेवाडी फाट्यावर यायचे. तिथून साधारण दोन किलोमीटरवर शाळा असल्याची त्यांनी माहिती दिली. कोकणातील शाळेत जाण्यासाठी चार-पाच किमीची सुरुवातीच्या वर्षांची पायपीट अनुभवाला होतीच. त्यामुळे दोन किमी सहज चालत जाऊ असा मनात विचार केला. प्रवास सुरु असतानाच माझ्या कांही शिक्षक मित्रांनी मला शाळेवर नेण्यासाठी तेथील शिक्षकांना फोनाफोनी केली होती. दरम्यान त्यांचे फोन प्रवासात मला आले. त्यापैकी एक काॅल होता दाटे केंद्रमुख्याध्यापकांचा. ते म्हणाले, " मी नागनवाडीत येतो .तुम्ही तिथेच थांबा." कांही वेळेनंतर बस नागणवाडी गावात आली. शालेय विद्यार्थी व प्रवासी उतरू लागले. मीही बसमधून उतरलो. बस चंदगडकडे निघून गेली. सरांची वाट पाहत मी सांवतवाडी-बेळगाव रस्त्यावरील जाणारी वाहने पाहत स्टाॅपवरील उंबराच्या झाडाखाली बसलो. 


 इतक्यात एक कारगाडी माझ्याजवळ थांबली. माझी पाठीवर घेतलेली सॅक व पेहराव पाहून चालकांकडून मला विचारणा झाली. 

" तुम्ही पाटील सर ना?" 

मी त्यांना नमस्कार करत "होय "म्हणालो.  

" मी गावडे सर , तुमचे चंदगड तालुक्यात हार्दिक स्वागत!" असे म्हणत त्यांनी माझ्या हातात हात देत गाडीत बसायला सांगितले आणि गाडी शाळेकडे जाण्यास मार्गस्थ झाली. प्रवास दरम्यान सरांनी आपली ओळख सांगितली. गावडे सरांबरोबर केंद्राविषयी संवाद झाला. आज शाळा तपासणीची सुट्टी असल्यानेच तुम्हाला वेळ देता येत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी गाडी गुडेवाडी फाट्यातून आत वळवली . गावच्या लालमातीचा गंध येत होता. गावच्या गल्लीतून जाताना लोकांचे चंदगडी बोलीतील शब्द कानावर पडत होते. बोलीतील शब्दांचे सूर कानाला सुखावून सोडत होते. कोणतीही बोली ही हृदयाची भाषा असते. तिला प्रमाणबद्धतेची चौकट नसते. म्हणून ती ओसंडून वाहते. आपल्या मराठी भाषेचे अशा बोलींमुळेच अभिजातपण दिसून येते.  


        सरांनी एका शाळेजवळ गाडी थांबवली. शाळेच्या षटकोणी आकाराच्या इमारतीचे रंगकाम चालू होते. जुन्या कौलारू इमारतीत मुले बसली होती. आम्हाला पाहून शाळेतील एक तरुण शिक्षक आमच्या गाडीजवळ आले. गावडे सरांनी मला त्यांची ओळख करुन दिली."हे नामदेव पाटील सर. शिक्षणसेवक पदी चारमहिन्यापूर्वी हजर झालेत." मला चेहरा ओळखीचा वाटला. पाटील सरांनी त्यांच्या नाधवडे(ता. भुदरगड)गावात पूर्वी आपली भेट झाल्याची आठवण करून दिली. दरम्यान ही शाळा पाहून आपण मजरे जट्टेवाडीत आल्याचे गावडे सरांना समजले. मजरे व मौजे यामुळे नेमका गोंधळ झाल्याचे म्हणाले. मला माझ्या सासरवाडीतील खुर्द व बुद्रुक यामध्ये अजूनही गोंधळ होत असल्याचे गमतीची आठवण गावडे सरांनी सांगितली व सर्वांना हसू फुटले. पाटील सर म्हणाले, "आता चुकून आलातच तर शाळेत या." आम्हाला शालेय प्रांगणात बोलावले. मुलांच्या टाळ्या घेत आमचे शाब्दिक स्वागत झाले व आम्ही मौजे जट्टेवाडीकडे निघालो. वाटेत कमान दिसली. कमानीवरच्या गावच्या नावाच्या अक्षरांचे रंग उडून गेले होते. त्यामुळेच गाडी मजरे जट्टेवाडीत पोहचली होती. हे लक्षात आले.


     आता गाडी कमानीतून मौजे जट्टेवाडी गावच्या वेशीत पोहचली. आजूबाजूला नुकताच ऊस कारखान्यास गेल्याने शेतातील खोडव्यांला पालवी फुटली होती. रस्त्याच्या एका बाजूला अजूनही तोड न आलेला त्या तांबड्या मातीतील ऊसाच्या तुर्‍यांनी माझे स्वागत केले. वाडीतील गल्लीतून गाडी शाळेजवळ पोहचली. एका टुमदार छोट्याशा कमानीवर शाळेचं नाव दिसलं. "मराठी विद्यामंदिर मौजे जट्टेवाडी". दोन वेगवेगळ्या नवीन वर्गखोल्या दिसल्या. कमानीतून प्रवेश करताना ज्ञानमंदिराला नमस्कार केला. अन् 'शाळेचा पहिला दिवस' सुरु झाला.

 

       शाळेच्या मुख्याध्यापिका सुतार मॅडम व मुलांनी आमचे स्वागत केले. शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ हातात देत स्वागत झाले. दरम्यान मी आजचा दिवस खास असल्याचे सांगत पिशवीतील गोष्टींची पुस्तके काढली. आज सानेगुरुजी यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती. त्यांना अभिवादन मुलांना पुस्तकभेट देऊन केले. या पवित्र दिवशी माझे माझ्या जिल्ह्यात ज्ञानदानाचे काम सुरु होत आहे . हे भाग्य असल्याचे सांगितले. दरम्यान दिवसभरात पालकवर्ग, तालुक्यातील कांही शिक्षकमित्र येऊन स्वागत करत होते. मुले पुस्तके न्याहाळण्यात दंग होती. आपल्या डाॅ.ए.पी.जे.अब्दुलकलाम फिरता वाचनकट्ट्यामार्फत मुख्याध्यापिका मॅडमना 'श्यामची आई' पुस्तक भेट दिले व पुष्पगुच्छ नको, पुस्तक द्यावे असे सर्वांना आवाहन केले. 


दुसऱ्या दिवशी नाताळची सुट्टी असल्याचे मुलांना सांगितले. कांही मुलांच्या हातात पुष्पगुच्छातील फुले दिली. शाळा सुटल्यानंतर मला बसथांब्यावर नेण्यासाठी आम्हा शिक्षकांच्या समुपदेशन प्रक्रियेसाठी धडपडणारे शिक्षकमित्र शाहू पाटील सर आले. त्यांनी माझे स्वागत केले. शाळेचा पहिला दिवस आनंद मनात ठेवून अस्ताकडे जावू लागला अन् मीही गावी जाण्यासाठी मार्गस्थ झालो.


✍️श्रीकांत पाटील


आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...