Saturday, August 17, 2024

आठवणीतील झेंडावंदन

 आठवणीतील झेंडावंदन 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


         पंधरा ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यदिन. सध्या हरघर तिरंगा अभियानामुळे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा फडकत आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त सर्वत्र तिरंगा ध्वज फडकू लागला आहे. आमच्या बालपणी आम्हाला तिरंगा पहायला मिळायचा तो सरकारी कार्यालयात. गावची शाळा, तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत या ठिकाणी. मलाही तो पहिल्यांदा माझ्या जीवन शिक्षण विद्यामंदिरात पहायला मिळाला. १५ऑगस्ट आला की, शाळेत या राष्ट्रीय उत्सवाची तयारी करायला जोशात सुरुवात व्हायची. गुरुजींच्या मार्गदर्शनाने राष्ट्रगीत , ध्वजगीत, देशभक्तीपर गीतांचा सराव व्हायचे. घोषणांचा आवाज घुमायचा. सर्वत्र उत्साहाचे वातावरण . "आपली घरेदारे स्वच्छ ठेवा" ही घोषणा घरोघरी पोहचायची. पावसामुळे घराच्या दारात वाढलेले गवत काढायला , खड्डे मुजवायला सुरुवात व्हायची. जशी परिसर स्वच्छता तशी वैयक्तिक तयारीही सुरु व्हायची. गणवेश धुवून स्वच्छ करायचा. त्यावर पितळी तांब्यात विस्तव घेऊन इस्त्री व्हायची. पांढरी शुभ्र गांधी टोपी घ्यायची. हीच आमची तयारी . 


       स्वातंत्र्यदिनी गावच्या शाळेत झेंडावंदन कार्यक्रम पहिल्यांदा व्हायचा. सकाळी गावातील ज्येष्ठ मंडळी कार्यक्रमास उपस्थित रहायची. शाळेच्या मुख्य प्रवेशाच्या स्थळी काळ्या दगडांनी तयार केलेला ध्वजकट्टा. त्यावर ध्वजस्तंभ उभा. गुरुजींच्या सूचनेनुसार त्याच्या वरच्या टोकाला दोरी अडकवायला एखादा बारीक शरीरयष्टीचा मुलगा चढायचा. त्याच्यात दोर अडकवल्यावर गुरुजी ध्वज बांधायचे व वर चढवायचे. ध्वजकट्ट्याच्या बाजूला सुंदर रांगोळी पसरायची . जास्वंदीची फुलांनं आरतीचं ताट सजायचं. ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्रतिष्ठीत ग्रामस्थांच्या हस्ते व्हायचा. राष्ट्रगीत, ध्वजगीत व्हायचं, भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होण्याच्या घोषणा व्हायच्या. प्रतिष्ठीत ग्रामस्थांच्या हस्ते श्रीफळ वाढवायचं. सोबत अगरबत्तीचा सुगंध दरवळायचा. अन् गुरुजींच्या सूचनेनुसार गावात रांगेतून शिस्तबद्ध पद्धतीने संचलन सुरु व्हायचं. 


    संचलनात पुढे ढोल, बिगुल, झांज, ट्रँगल वाजवणारी मुले असायची. "कदम कदम बढाये जा, खुशी के गीत गाये जा" अशी देशभक्तीपर गीते गात , भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या घोषणा देत मुलं गावच्या पाण्याच्या टाकीजवळील तलाठी कार्यालयासमोर पोहचायची. राष्ट्रगीत , ध्वजगीत गायन करणारी निवडक मुलं तिथं जायची. इतर मुलं रस्त्यावरुनच तिरंग्याला सलामी द्यायची. तेथील ध्वजारोहण आटोपून फेरी पुढे निघायची. गावची चौकोनी रस्त्याची रचना असल्याने मार्ग ठरलेला असायचा. तेथून फेरी ग्रामपंचायतीजवळ पोहचायची. तिथं ध्वजारोहण कार्यक्रम सरपंचांच्या हस्ते व्हायचा. ग्रामपंचायत गोड खाऊ वाटप करायची. अन् तेथून मुलं रांगेत शाळेतील बालसभेला निघायची. 


    बालसभेत मुलांची भाषणं सुरु व्हायची. "अध्यक्ष, महाशय ,पूज्य गुरुजनवर्ग व माझ्या बालमित्रांनो आज स्वातंत्र्यदिन, यानिमित्ताने मी काही चार शब्द तुमांना सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकाल. अशी आशा बाळगतो व माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो." असे म्हणत बहुतेक मुलांच्या भाषणाची सुरुवात व्हायची. प्रत्येक मुलाच्या आयुष्यातील पहिलं भाषण इथंच सुरु व्हायचं. जीवनातील हेच पहिलं व्यासपीठ. काही सभाधीटपणा नसणाऱ्या मुलांचे पाय लटपटायचे. काहीच्या अंगाची थरथर सुरु असायची. तर काही हातबांधून.. समोरच्या भिंतीवरील नजर न हटवता पाठांतर केलेलं आठवत म्हणायची. काही मुलं तर "एवढे बोलून मी माझे चार शब्द संपवतो" म्हणून भाषण अर्धवट सोडून जाग्यावर निघून जायची. पण शाळेतील भाषण कलेतील हुशार मुलांचं भाषण ऐकताच सर्वांच्या टाळ्या पडायच्या. साऱ्या गुरुजींकडून व ग्रामस्थांकडून त्यांचं कौतुक व्हायचं आणि गुरुजींच्या मार्गदर्शनपर भाषणांनंतर आभार मानून कार्यक्रमाची सांगता व्हायची. 

  मुख्याध्यापक म्हणून शाळेतील ध्वजारोहण करताना आज या दिवसांची प्रकर्षाने आठवण येते. तुम्हा सर्वांना ७८व्या भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित हार्दिक शुभेच्छा!


✍️श्रीकांत पाटील


No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...