वाडीवरची दुकानं
कोकणातील वाडीवरची दुकानं म्हणजे वैशिष्ट्यपूर्णच! वाडी- वस्तीवर एखादेचं दुकान. रस्त्याच्या बाजूला कौलारू घराच्या समोर चिरेबंदी किंवा मातीच्या भिंतीची उतरत्या छपराची ही दुकानं! दुकानासमोर दोन चिऱ्यांवर आडवी केलेली एखादी लाकडी फळी. त्या फळीवर बसून दुकानदारांशी गप्पा मारत बसणारी लहान मुलं व गावकरी मंडळी हे चित्र पाहताना आजही होणारा आनंद न्याराच!
लांजा तालुक्यातील केळवली वरच्यावाडीत पूर्वी तीन दुकानं. विठ्ठल मंदिराजवळील पुलाजवळचं दुकान म्हणजे काशीनाथ तावडे यांचं दुकान . हे वाडीतलं पहिलंवहिलं दुकान. आता हे त्यांचाच नातेवाईक प्रकाश तावडे चालवितो . दुसरे बाकैजी मंदिराकडे जाताना लागतं ते 'म्हादांचं दुकान'. आता हे दुकान वाडीतील आत्माराम तात्या चालवत असतो. ह्या दुकांनाना बोर्डचा पत्ताच नाही. दुकानदाराच्या नावावरूनच ह्या दुकानांची ओळख. तिसरं दुकान कोटकरवाडीतल्या प्रभाकर कोटकरचं होतं. ते बऱ्याच वर्षांपूर्वी बंद झालं.
वाडीतल्या जि. प. च्या चार नंबर मराठी शाळेत शिक्षक असताना माझी गावच्या मंदिराकडे कधीतरी संध्याकाळी फेरी असायची. वाटेत म्हांदाचं दुकान. म्हादां दुकानात बसलेला असायचा. महादेव सुर्वे दुकानदारांचे खरे नाव. पण बारक्या पोरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत महादेव दादा असं न म्हणता 'म्हांदाच" म्हणायची. सर्वांचा म्हादा! ह्या सर्व दुकानाचा माल आणण्यासाठी साखरपा हेच जवळचं ठिकाण. म्हांदा तिथूनच माल आणायचा. तालुक्याचं बाजाराचं ठिकाण जरा लांबच! बाजारातून एसटीनं दुकानात लागणारा आठवडी माल खालच्या पेठंपर्यंत आणायचा. तेथून माल डोक्यावर घेऊन तीन किमीचा दुकानापर्यंत प्रवास बहुतेकदा चालतच! आणलेला माल दुकानात प्लास्टिक वा काचेच्या बरणीत भरलेला. किराणा माल, चॉकलेट, गोळ्या, बिस्किट हे सर्व मांडून ठेवलेलं. आता रस्ता झाल्यापासून अंडी, बेकरी फूड्स , भाजीपालाच्या गाड्या गावोगावी फिरू लागले आहेत. कधीतरी चणे -शेंगदाणे घेऊन मी घरी निघताना तिथं म्हांदा बरोबर गप्पा व्हायच्या. भेटीनंतर म्हांदा हसत हसत , " हे घ्या तोंड गोड करा गुरुजी... म्हणत प्रेमाने हातात बर्फी द्यायचा. तुम्ही काय सारखं येताय व्हयं." असं म्हणायचा.
खरं तरं ही दुकानं म्हणजे गाव गप्पांची ठिकाणंच. घरात कंटाळलेली लहान मुलं असू द्या वा मोठी माणसं. सर्वांना दुकानाचं आकर्षण असतंच. इथं पुडी बांधण्यासाठी येणाऱ्या रद्दीतल्या वर्तमानपत्रातल्या जुन्या बातम्या कळायच्या तशाच गावातल्या बहुतेक बातम्या एकमेकांच्या गप्पांमधून समजायच्या. कोणाची गाय व्याली, कुणाचं बारसं झालं, रानात काय झालं पासून ते सध्याच्या राजकीय परिस्थितीवरसुदधा गप्पा चालतात. आजही प्रकाश तावडेच्या दुकानात चार्जिंग बल्बच्या प्रकाशात ज्येष्ठ माणसं गप्पा मारताना दिसतात. पण टिव्ही, मोबाईलमुळे तरुणाई घरीच व्यस्त. संवाद हरवत चाललेला असताना ही दुकानं म्हणजे माणसातला संवाद जपणारी ठिकाणं आहेत. ऑनलाईन खरेदीच्या युगातही यांचं महत्व विसरून चालणार नाही.
✍️श्रीकांत पाटील