Sunday, May 21, 2023

कपभर चहा

 कपभर चहा ☕


       सकाळी सकाळी उठल्यावर प्रत्येक घरात चहाचा वास दरवळतो. अगदीच उशीर झाला तर आईला बाबांची ' कपभर चहा ठेवा' अशी ऑर्डर येतेच! स्वयंपाकघरातील मंडळी लगबगीनं सर्वांना कपभर चहा देतात. दिवसाची सुरुवात उत्साही होण्यासाठीच हा कपभर चहा लागतोच.

      घरी कुणी पाहुणा आला, तर पाच मिनिटातच चहाने भरलेला कप त्यांच्यासमोर हजर होतो. हल्ली अनेक आजारपणामुळे "चहा ठेवू काय?" असे विचारले जाते. पण जुन्या पिढीतील माणसांना "चहा ठेवू काय?" असं विचारल्यास जरा अवघडल्यासारखं वाटतं. पण ,काही असो बहुतेकांचे आवडते पेय चहाच !

     आज कपातील चहाचे स्वरूप बदलले आहे. कोरा 'काळा' चहा, त्यात थोडा लिंबू पिळून तयार होणारा 'लेमन चहा', थोडी तुळशीची पाने, आल्ले, वेलची इत्यादी मसाले टाकून केलेला औषधी 'मसालेदार चहा', आरोग्यासाठी साखरेला फाटा देऊन गुळ वापरून तयार केलेला 'खास गुळाचा चहा', असे अनेक चहाचे प्रकार आज पहायला मिळतात.प्रत्येकाच्या जिभेवर रेंगाळणाऱ्या चवीनुसार लागणारा वेगळा चहा प्रत्येक जण शोधत असतो.


     पूर्वी गावात, शहरात चहा मिळण्याची ठिकाणे ठराविक असायची. पण आज सहज बाजारातून फेरफटका मारलात तर नवनवीन खास चहाची हॉटेल्स, चहाचे गाडे पाहायला मिळतात. दुकानांची नावे ही खासच असतात 'तलफ चहा', 'घोटभर चहा' 'फौजी चहा', तर ब्रँड नुसार सलगर चहा, येवले चहा, करवीरचा अमृततुल्य चहा, कोल्हापुरी चहा अशी काही नावे पाहायला मिळतात.


      प्रत्येकाची चहा घेण्याची ठराविक वेळ ठरलेली. पण बहुतांशी लोकांना सकाळी लवकर उठल्यावर, झोप झाल्यावर किंवा कंटाळा जाण्यासाठी हमखास कपभर चहा घ्यावाच लागतो. कुठल्याही ऑफिस मध्ये सायंकाळी कपभर चहा फिरतोच. दुपारच्या जेवणानंतरची सुस्ती जाण्यासाठी व कामातील कंटाळा जाण्यासाठी तो आवश्यक ही असतो. सरकारी ऑफिस म्हणजे फायली वरची कामे पटापट व्हायला कांही वेळा कपभर चहाच काम करतो बरं का! चहाच्या नावाखाली कार्यालयाच्या शेजारी असणाऱ्या चहाच्या गाड्यावर किंवा हॉटेलमध्ये जाऊन चहा पिता पिता कामाबाबत सेटिंग होते व कामाची फाईल पुढे सरकायला सुरू होते. कुणाचं काम होण्यासाठी हा कपभर चहा माध्यम असतो तर कुणाचं काम झाल्यावर आनंद व्यक्त करण्यासाठी! अगदीच काम झाल्यावर कोणी धन्यवादही मानलं नाही तर "त्याचं काम केलं पण कपभर चहा सुद्धा त्यांनं पाजला नाही" अशी विधाने तोंडातून बाहेर पडतात. अचानक भेटलेले मित्र असो वा नियोजित भेटीसाठी जमलेले मित्र कपभर चहा मित्रातील संवाद वाढवतो.


        एखाद्याच्या घरी पाहुणे आले असता कांदे -पोहे घेता घेता जोडीला कपभर चहा लागतोच! गावच्या चावडी कट्ट्यावर होणाऱ्या गप्पांना कपभर चहा मिळताच अगदी रंग चढतो. बस थांब्यावर बसची वाट पाहता पाहता येणारा कंटाळा एक कपभर चहा घेतल्याने निघून जातो. असा हा उत्साह वाढवणारा एक कपभर चहा बहुतेकांना आवडतोच! आता हा लेख वाचता वाचता चहाची तलफ तुम्हाला नक्की आली असणारच... त्यामुळे एक कपभर चहा तुम्ही घ्या व पुढच्या कामाला लागा बरं का!☕🫖


✍️श्रीकांत पाटील

२१मे२०२३


☕️☕️☕️☕️☕️




No comments:

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...