॥श्री॥
प्रिय युवा ,
सप्रेम आशीर्वाद .
ब-याच काळानंतर मी तुझ्याशी पत्राद्वारा संवाद साधतोय. हल्ली या सोशल मेडियामुळे तुला पत्र लिहणं झालचं नाही. एखाद्या छोट्याशा संदेशावर भागतय ना! पण तुझ्याबरोबर खूप बोलावंसं वाटत होतं. तुला सांगावंसं वाटत होतं. म्हणून खास तुझ्यासाठी आजच्या या टपालदिनी हा लेखन प्रपंच!
तुझ्या प्राथमिक शालेय शिक्षणानंतर जेव्हा जेव्हा तू मला भेटत होतास तेव्हा तू मला मितभाषी दिसलास. तू मला बघून लाजतोस व पळ काढतोस. अरे ,तू बाल वयात असताना बिनधास्त बोलायचास. माझ्या सोबत खेळायचास,बागडायचास. माझ्याबरोबर तू शाळेतल्या प्रत्येक उपक्रमांत आनंद घ्यायचास. शाळेतील गुरुजनांची तुला आदराची भिती असायची.कधी तरी तुझ्या बालवयात माझे धम्मक लाडू खालास तर तुला क्षणभर दुःख वाटायचे पण पुढच्या क्षणाला ते विसरून माझ्याबरोबर उत्साहाने खेळायचास अगदी तुझे बाबा समजूनच!
आजकाल तुझ्या मनातलं कोणी समजत नसावं कदाचित! तूझी चलबिचलता पाहता तू दिशा भटकत चालताना दिसतोस.अगदी रस्ता चुकलेल्या गाडीगत! जीवनातल्या गुणांचा विचार न करता तू परीक्षेतल्या गुणांवर भर देतोस! यात सगळं तुझंच चुकतय असं माझं मत नाही बरं का! आजूबाजूची कृत्रीम परिस्थिती त्याला कारणीभूत आहेच. ही अपेक्षांची स्पर्धा जीवघेणी ठरत आहे. आई बाबांच्या जराशा रागावण्याने तू लगेच रूसतोस. मोबाईल दिला नाही म्हणून तुझ्या कांही मित्रानी कालपरवा जीवनयात्रा संपवल्याची बातमी वाचली.इतके शीघ्र मनाला लावून घेणं कसं चालेल? जीवन इतकं मर्यादित नाही रे मित्रा. ऑनलाईन शिक्षणाच्यामागे लागताना कदाचित घरची ऐपत नसल्याने तुझी गरज भागली नसेल.पण केवळ शिक्षणाचा हाच मार्ग नाही. जगण्याच्या प्रत्येक क्षणात शिक्षण आहे. ते अनुभवलं तरचं ते पूर्ण होईल.
मला आठवतंय, तू किशोरवयात असताना एकदा शाळा चूकवून मित्राच्या घरात खेळ खेळत होतास. पत्त्यांचा डाव मांडला होता. तुझ्याजवळ मोठ्या माणसांप्रमाणे पैसे लावायला नव्हते म्हणून तू आजूबाजूच्या शेतातून जांभी (काजूबिया) जमा करून लावायचास. ही बातमी जेव्हा शाळेत कळली तेव्हा तूझ्या गुरूजींनी तुला बेदम बदडले होते.खरं तर तुझ्या जुगाराची हिच सुरूवात होती. मला माहीत आहे आयुष्यात हार- जीत असते पण जुगाराच्या खेळातूनच हे शिकता येत नाही बर का! त्यासाठी शड्डू ठोकून कुस्ती खेळला असतास तरी चाललं असतं. अरे मोठा झालास तेव्हा देशी खेळाचे मैदान सोडून तू अशा अड्डयाला मैदान केलास! तू आज कदाचित हे सगळं विसरला असशील म्हणूनच पुन्हा आठवण करून देतोय. कांही पाऊलं चुकीच्या मार्गे जात आहेत हे तुला कळतंय पण वळत नाय .तोंडात गुटखा खाऊन रस्त्यावर पिचकारी मारणारी तुझ्या मित्रांची टोळी पाहताना तर कीव येते. मनाची नसेना जनाची तरी लाज ठेवायला हवीय!
बरं हे सगळं मी तुला सांगतो आहे पण याला मोठी माणसंही जबाबदार आहेत हे मी विसरत नाही. मैला मैलावर मोठ्या माणसांचे हे जुने अड्डे चालू आहेतच ना! मुलाबरोबर मांडीला मांडी लावून बाप दारू प्यायला बसताना दिसतोय. रिकामा वेळ कसा घालवायचा म्हणून मुलांसमवेत रम्मीचा डाव नातलगांनी मांडलेला मी पाहतोय. घराच्या चार भिंतीत चालणारे चाळे आज बागेत खुलेआमपणे दिसतात.कोणतीच लाज उरली नाही का!
पूर्वी प्रत्येक घरात,गावात ज्येष्ठ माणूस असायचा. त्याचा शब्द प्रमाण असायचा. त्यांचा धाक असायचा. ती माणसं आज विरळ झाली. ती खरी संस्काराची विद्यापीठं होती. त्यांचं वागणं हा आपल्यासमोरचा अलिखित अभ्यासक्रम होता. त्यांच्या तालमीत शिकलेला माणूस कधीच जीवनात वाया गेला नाही. तो धाक व ती रीत आज हरवलीय. अगदी आजच्या पुस्तकी शिक्षणातही त्याचा अंश सापडत नाही. नव्वदीच्या टक्केवारीतील विद्यार्थीही जीवनातल्या प्रत्येक संकटाला सामोरे जाईल की नाही हा शंभर टक्के प्रश्न आजच्या शिक्षणासमोर उभा आहे.
देशाचा भावी आधारस्तंभ तू आहेस . तुझ्याकडून चालू पिढीच्या अपेक्षा अगणित आहेत.पण, याला ओझं न मानता तू नक्कीच पेलशील असा विश्वास आहे. थोर संतांच्या विचाराचा वारसा आपल्याला लाभला आहे. डाॅ. एपीजे अब्दुल कलाम याना अपेक्षित असणारा युवा तयार झालाच तर आपला भारत महान होईल यात मात्र शंका नाही. त्यासाठी तू पात्र होशील हिच सदिच्छा!
तुझेच सदैव लाडके ,
गुरुजी.

.jpeg)