परवा आमच्या सौ.नी मोबाईल वरील संदेश चाळता चाळता मला आश्चर्याने विचारलं, "अहो, जागतिक वडापाव दिनही साजरा करतात व्हयं!"
मीही तिच्या त्या प्रश्नाला लगेच 'हो'कार दिला व वर्तमानपत्र वाचताना मला या खास दिवसाची सापडलेली माहिती तिच्या पुढे करत म्हणालो, "अगं, हा बघ आज जागतिक वडापाव दिनाबाबत एक लेख प्रकाशित झालाय.आजच्याच दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट 1966 रोजी मुंबई येथे अशोक वैद्य यांनी प्रथमतः वडापाव तयार केला. हाच वडापाव आज विदेशातही पोहचला . 'बॉम्बे बर्गर' म्हणून आज जगभर प्रसिद्धही झाला. "
खरंतर, वडापावची आठवण झाल्याने कोणाच्या तोंडाला पाणी सुटणार नाही ? तसंच जागतिक वडापाव दिन साजरा होत असल्याचे आमचे बोलणे ऐकून आमच्या घरातील बच्चेकंपनीच्याही तोंडाला पाणी सुटले व शेवटी त्या दिवशी वडापाव खाण्याचा बेत आखलाच!
वडापाव म्हणजे सामान्यांचा नाश्ताच. कधी कधी पोटाची खळगी भरण्यासाठी हेच त्यांचं जेवणही! गरिबांसाठी, मजुरांसाठी, कष्टकरणा-यांसाठी असणारा हा वडापाव म्हणजे जगण्याचा आधारच! सुरुवातीला मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हा वाढलेला. खायला ना प्लेटची गरज, ना चमच्याची! बस्स, हातात घेतला की पोटात गेलाच म्हणून समजा. जितक्या लवकर बनवला जातो ,तितक्याच लवकर खाल्लाही जातो.
सुरुवातीला मुंबईशहरापुरता असणारा हा वडापाव आज गावोगावी पोहचला आहे. शाळां महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये,ऑफिसच्या कॅन्टिनात, बस स्टॉपवर, गल्लोगल्ली, वडापावची गाडी तुम्हाला नक्कीच दिसणारच बरं का! प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सोडणारा हा वडापाव, तो बनवण्याच्या कौशल्यावरून आज प्रसिद्ध झाला आहे. कधी बनवणा-याचे नाव त्याला चिकटले .जसे- दीपक वडापाव, अशोक वडापाव, श्यामचा वडा.. तर.. कधी आडनावावरून - बोरकर वडापाव, परब वडापाव, कोटकरांचा वडापाव. तसेच, तो ठिकाणावरूनही ओळखू लागला.' झाडाखालचा वडापाव ' 'कुंजविहार वडापाव' अशा विविध नावाने आज तो सर्वांपर्यंत पोहचला सुद्धा आहे.
मला आठवतं ,बालपणी आमच्या आहारात पहिल्यांदा वडापाव आला तो आठवडा बाजाराच्या दिवशी. बसस्थानकाच्या शेजारी असणाऱ्या गाड्यावरच्या भज्यांसोबत वडापावचं पार्सल बाजाराच्या पिशवीतनं हमखास घर गाठायचं. बाजाराची पिशवी घरात येताच वडापावचा खमंग वास घरभर पसरायचा. मग आम्ही भावंडं त्यावर तुटून पडायचो. कधीतरी पाव संपल्यावर अर्धा राहिलेला तो वडा भाकरीबरोबरही अगदी चवीनं संपायचा.
सुरूवातीला दहा पैशामध्ये असणा-या वडापावने आज शंभरीही पार केली आहे ,पण तो ज्या ठिकाणी मिळतो त्यावरून त्याचा भाव ठरत असतो. एखाद्या शाळेशेजारी असणाऱ्या कॅन्टीनमध्ये तो पाच रुपयातही मिळतो. अन् शहरातल्या मॉल संस्कृतीत तो शंभरनेही खपतो. वडापाव जसा गरीबांच्या पोटाची भूक भागवतो ,तसा वडापाव एखाद्याचा रोजगार बनतो. घरातील मंडळीही जर एखाद्याला नोकरी मिळाली नाही तर "एखाद्या वडापावची गाडी टाक." असे सहज सांगतात आणि मग तेच सा-या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनते.
वडा आणि पाव यांचं नातं किती घट्ट असतं ना! ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत. अगदी एक शब्द उच्चारला की दुसरा तोंडातून हजरंच! अनेक कष्टक-यांना उपाशी न ठेवता जगवणारा हा वडापाव . कांही माणसांना तो एवढा आवडतो की पैज लावून ते संपवले जातात. मग अशा माणसाविषयी विनोदाने म्हणतात , "तू मेलास तर कावळाही वडापावलाच शिवणार बघ!" असा हा अत्यंत आवडीचा वडापाव कधी वाढदिवसाच्या छोट्या पार्टीचा मेनू म्हणून आनंद देतो तर , कधी रिमझिम पावसाळ्यात गरमागरम खमंग चवीचा आनंद प्रत्येकाला देतो.
आम्ही गारगोटीत शिकायला असतानाची गोष्ट. मित्रांच्या वाढदिवसाची पार्टी असो वा एखाद्याच्या आनंदाची वा पैजेची गोष्ट, बसस्थानक शेजारी असणारा 'क्रांती वडा' आम्हाला नेहमीच साद घालायचा. सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी आमची पावलं तिथं जाऊन थांबायचीच! गणितात ऐंशी गुण पार करण्याची पैज जिंकल्याने वर्गमित्राकडून वडापाव खाल्याची आजही आवर्जून आठवण येते.
अशा वडापावचे अनुभव वाचून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार ! मग विचार कसला करताय, तुमच्या जवळच असणारे वडापावचे ठिकाण नक्की गाठा व चवीचा आस्वाद घ्या बरं का!
-✍श्रीकांत पाटील
No comments:
Post a Comment