Friday, October 29, 2021

तामजाई



             दिवाळीची सुट्टी संपली. शाळाही  सुरु झाली होती. त्यामुळे आम्ही शाळेची वाट धरली होती. सकाळची घरातील किरकोळ कामं, अभ्यास करुन मी शाळा गाठायचो. सुगीचे दिवस अजूनही सुरुच होते .त्यामुळे आई दिवसभर मोलमजुरीसाठी शेतं  गाठायची.सोबत दोन-तीन शेरडं  असायची. इकड आमचं शाळेत मन रमत नव्हतं .सुट्टीची सवय झाली होती. कधी एकदा पाच वाजतील अन्ं  घरी धूम ठोकायला मिळेल असं व्हायचं. घरी आल्यावर दफ्तर ठेवायचं  आणि  शेताकडं  धावत सुटायचो.  आईच्या डोक्यावर कोवळ्या झाडपाल्याचा भारा . एका हाताने  अधारलेला.  दुस-या हातात  शेळीचा दोर.त्यांच्यापाठी दोन शेळीची पिल्लं. बें ऽऽबें ऽऽ करत, उड्या मारत असायची.  मी शेळीचा दोरं हातात घ्यायचो.शेळीच्या पिल्लांसोबत मजा वाटायची.वाकड्या तिकड़या उड्या मारत, रस्त्याच्या बाजूला असणा-या गवताच्या पानाला  हुंगत,थोडं -थोडं थांबत. ही गोंडस पिल्लं धाव घ्यायची.


         रविवारची सुट्टी म्हणजे आम्हाला पर्वणीच.  शेरडांना घेऊन  मनसोक्त हुंदडायला मिळायचं ना!  गावच्या दोन्ही बाजूला डोंगर. एका बाजूला भिमा डोंगर व दुस-या बाजूला तात्या डोंगर. हे डोंगर म्हणजे गावाला सांभाळणारी 'आई- बा' चीचं रुपं. खळखळत वाहणा-या  झ-यांना जन्म देणा-या  या  दोन डोंगराच्या कुशीत वसलेल्या माझ्या गावावर मायेची सावली धरलेली.   पूर्वेला सामानगड पासून मावळतीला जात्याचं पेडापर्यंत  भिमा डोंगर पसरलेला. जात्याचं   पेडाखाली  गुरवकी, गोइली, धोंडल , घोल्ह अशी स्थानिक  डोंगराच्या उतारावरची  शेतं पसरलेली. डोंगराच्या वरच्या बाजूला  हिरवंगार पठार.त्यावर बजरंग बली  हनुमानाचं मंदिर, शिवमंदिर . तसेच कुशीत सत् पुरुष भीमशाप्पाचं व पूर्वेला श्री चाळोबाचं  मंदिर. या  श्री भीमशाप्पा या  सत्पुरुषाच्या नावावरुन  डोंगराला 'भिमा'  डोंगर म्हणून ओळखलं जायचं.


     त्यादिवशी सकाळीच  आई   मला म्हणाली, 


"आज ऐतवार हाय, मी हिंग्लजला जाऊन  बाजार  करुन येतो .  शेरडांना घेऊन धोंदलात घेऊन चरवून  आण."  


 " हां, मला  लवकर भाकरी  वाढ"  मी मनोमन आनंदून म्हणालो.


 भाकरी खाल्ली व  दिवाळीतला उरलेला फराळ बांधला.  शेरडं  घेतली व निघालो. 'धोंदल' हा डोंगराचा उताराचा भाग.मोठ मोठे आकाराचे काळसर,तांबूस दगड -धोंडे  असलेला भाग. त्यामुळेच 'धोंडल'  असं म्हटलं जात  असावं. सकाळी सकाळीच बहुतेक गुराखी आपली गाईगुरे घेऊन येत. सुट्टी असल्यानं  मुलांची गर्दी असायची.  गुरं ,शेरडं  चरत असायची. पोरांचे खेळ सुरु व्हायचे.  ऊंच ऊंच दगडावर  चढायचं. दोन्ही बाजूला पसरलेल्या हिरव्यागार करवंदीच्या जाळीत घुसायचं . लपाछपी खेळायची.झाडावर चढायचं.असे खेळ व्हायचे.   जवळच्याच झ-यावर  जायचं. खूप मज्जा होती. मोठी माणसं आपल्या आपल्या कामात असायची. इस्ता-या  (पत्रावळ्या ) तयार करायला पळसाची पाने  गोळा करणे, शेळ्याना पाला  तोडणे, जळाऊ लाकडे गोळा करणे  अशी त्यांची कामे चालू असायची. 


   डोक्यावर ऊन येत होतं. गुरं ,शेरडं  जवळच्या तळीवर पाणी पिऊन आली  होती. त्यांची पोटं  टुंब  भरली होती.आम्हीही एकत्र बसून आणलेला फराळ खाल्ला होता.घरी निघण्या अगोदर  दररोज येणा-या  गुराखी मन्डळीपैकी ज्येष्ठ मंडळीनी  विषय काढला."अरं, आपली तामजाई कधी करायची? कुठला तरी ऐतवार   पकडून करायला हवी."

इतक्यात सारी पोरं म्हणाली , " अहो,आज आठदिवसान्ंच करुया  की. सारी शाळंची  पोरंबी असत्यात." 

"बरं बरं  , कुणी कुणी काय आणायचं शनवारी बघू." असं सर्वजण म्हणाले. गुरं हाकलत  आम्ही घरी निघालो. जाता जाता जाणत्यानी तामजाई बद्दल माहिती सांगितली.


     ' तामजाई'  ही तर डोंगरातली देवी.जीचा परंपरेने गावातील गुराखी उत्सव करत. आज बदलत्या काळानुसार ही श्रध्देची रुपं लोप पावत गेली. त्या काळात गाई गुरांच्या अंगावर गोचिड, पिसू प्रमाणेच तांबू  हा परजीव  मोठ्या प्रमाणात असायचा. तांबू गुरांच्या  शरीरातलं  रक्त शोषून घेते.त्यामुळं गुरं अंगांंन  खराब  व्हायची.अशी

 "तांबू जा बाई  "असं या अदृश्य देवीला साकडं  घातलं जायचं. "तांबू जा बाई " चा पुढं अपभ्रंश होऊन 'तामजाई  ' असं झालं . 


   उद्या तामजाई  आहे म्हटल्यावर आदल्या रात्री डोक्यात त्याचेच विचार.कधी एकदा आपण जातो असं व्हायचं .ती डोंगरात जेवण बनवून जेवण्याची मजाच वेगळी. जनावरं राखणा-या एका  पिढीकडून दुस-यापिढीकडं  आलेला हा एक उत्सवच होता.ठरल्याप्रमाणे रविवारी  सकाळी सकाळीच सर्वानी जमवलेले  साहित्य घेतलं. धोंदलाच्या वरच्या बाजूला पोहचलो. गुरानी चरायला सुरवात केली. आम्ही आप- आपली कामं  करु लागलो.कुणी तीनं दगडाची चूल  मांडली. कुणी लाकडं   जमवून आणू  लागला. कुणी तळी वरच्या झ-यातल्ंं  पाणी आणलं. कुणी कांदा,मिरची, भाजी चिरायला सुरु केलं.   तर दोघां  -तिघांनी पळसाच्या ताज्या  पानाच्या  इस्ता-या (पत्रावळ्या ) बनवायला सुरुवात केली.अनुभवी गुराखीमंडळी आचारी  झाली .   एकमेकांच्या सूचना सुरुच होत्या. भात तयार झाला.आमटीला फोडणी दिली. फोडणीचा सुगंध दरवळला. तशी दुरवर गुरं परतायला  गेलेली बारकी पोरं धावतच आली.अशा खटपटीतून  एकदासं  जेवण तयार झालं.  ज्येष्ठ   मंडळीनी नारळ फोडला.देवीला निवद  केला.   सर्वानी हात जोडले, "गुरा-ढोरांची....लेकरां बाळांची काळजी घे ग माय."  अशी प्रार्थना  केली. सर्वानी  नमस्कार केला. गाईला निवंद खायला दिला आणि पंगत बसली.

    ताज्या हिरव्या  इस्ता-यावर भात. त्यात हाताने आळं  केलेलं . गरमागरम आमटीं त्याच्यात ओतलेली.   तामजाईच नावं घेतलं अन्ं  जेवायला  सुरुवात झाली.  जुन्या आठवणीच्या गप्पा  मारत.एकमेकांची चेष्टामस्करी  करत  मनसोक्त जेवण झाले.   तृप्तीचा ढेकर देत  सर्व गुराख्यानी तांबू  नष्ट करणा-या   या देवीची कृपा सर्वांवर  अशीच राहू दे असे  म्हणत  देवीचे आभार मानले. खरकट पाणी जवळ आलेल्या गुराना पाजले. देवीच्या प्रसादाच पाणी पिल्यावर , त्यांच्यावर शिंपडल्यावर  गुरांची रोगराई  पळून  जाते असा समज होता.    मुलांचे दगड गोट्यांचे खेळ सुरु झाले. नेहमीप्रमाणे दगडावरची चढाओढ सुरु झाली आणि आम्ही तामजाईच्या नव्या आठवणी सोबत गुरं -ढ़ोरं , शेरडांना घेऊन  घरी परतलो.


 ✍श्रीकांत पाटील.

    

वडा-पाव




     परवा  आमच्या सौ.नी मोबाईल वरील संदेश चाळता चाळता मला आश्चर्याने विचारलं, "अहो, जागतिक वडापाव दिनही साजरा करतात व्हयं!"


   मीही तिच्या त्या प्रश्नाला लगेच 'हो'कार दिला व  वर्तमानपत्र वाचताना मला या खास दिवसाची  सापडलेली माहिती  तिच्या पुढे  करत म्हणालो, "अगं,  हा बघ आज जागतिक वडापाव दिनाबाबत एक लेख प्रकाशित  झालाय.आजच्याच दिवशी म्हणजेच 23 ऑगस्ट 1966 रोजी मुंबई येथे अशोक वैद्य यांनी प्रथमतः  वडापाव तयार केला. हाच वडापाव आज विदेशातही पोहचला . 'बॉम्बे बर्गर' म्हणून  आज जगभर प्रसिद्धही झाला. "


     खरंतर, वडापावची आठवण झाल्याने कोणाच्या तोंडाला पाणी  सुटणार नाही ?  तसंच जागतिक वडापाव दिन साजरा होत असल्याचे आमचे बोलणे  ऐकून आमच्या घरातील बच्चेकंपनीच्याही तोंडाला पाणी सुटले  व  शेवटी त्या दिवशी वडापाव खाण्याचा बेत  आखलाच!


     वडापाव म्हणजे  सामान्यांचा नाश्ताच.  कधी कधी पोटाची खळगी भरण्यासाठी हेच त्यांचं जेवणही! गरिबांसाठी, मजुरांसाठी, कष्टकरणा-यांसाठी असणारा हा वडापाव म्हणजे जगण्याचा आधारच! सुरुवातीला मुंबईमध्ये गिरणी कामगारांच्या संस्कृतीत हा वाढलेला. खायला ना प्लेटची गरज, ना चमच्याची! बस्स, हातात घेतला की पोटात गेलाच  म्हणून समजा. जितक्या लवकर बनवला जातो ,तितक्याच लवकर खाल्लाही जातो.


    सुरुवातीला मुंबईशहरापुरता असणारा हा वडापाव आज गावोगावी पोहचला आहे. शाळां महाविद्यालयीन कॅन्टीनमध्ये,ऑफिसच्या कॅन्टिनात, बस स्टॉपवर, गल्लोगल्ली, वडापावची गाडी तुम्हाला  नक्कीच दिसणारच  बरं का! प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सोडणारा हा वडापाव, तो  बनवण्याच्या कौशल्यावरून  आज प्रसिद्ध झाला आहे.  कधी बनवणा-याचे नाव त्याला चिकटले .जसे-  दीपक वडापाव,  अशोक वडापाव, श्यामचा वडा.. तर.. कधी आडनावावरून - बोरकर वडापाव, परब वडापाव,  कोटकरांचा वडापाव. तसेच, तो ठिकाणावरूनही ओळखू लागला.' झाडाखालचा वडापाव ' 'कुंजविहार वडापाव' अशा विविध नावाने आज तो सर्वांपर्यंत  पोहचला सुद्धा आहे.


         मला आठवतं ,बालपणी आमच्या आहारात पहिल्यांदा वडापाव आला  तो  आठवडा बाजाराच्या दिवशी.  बसस्थानकाच्या शेजारी असणाऱ्या गाड्यावरच्या भज्यांसोबत  वडापावचं पार्सल बाजाराच्या पिशवीतनं हमखास  घर गाठायचं.  बाजाराची पिशवी  घरात येताच  वडापावचा खमंग वास घरभर  पसरायचा. मग आम्ही भावंडं त्यावर तुटून  पडायचो.  कधीतरी पाव संपल्यावर  अर्धा  राहिलेला  तो वडा भाकरीबरोबरही अगदी चवीनं संपायचा.


   सुरूवातीला दहा पैशामध्ये असणा-या वडापावने आज शंभरीही पार केली आहे ,पण तो ज्या ठिकाणी मिळतो त्यावरून त्याचा भाव ठरत असतो. एखाद्या शाळेशेजारी असणाऱ्या कॅन्टीनमध्ये तो पाच रुपयातही मिळतो. अन् शहरातल्या मॉल संस्कृतीत तो शंभरनेही खपतो.  वडापाव जसा गरीबांच्या  पोटाची भूक भागवतो ,तसा वडापाव एखाद्याचा रोजगार बनतो.  घरातील मंडळीही जर एखाद्याला नोकरी मिळाली  नाही  तर "एखाद्या वडापावची गाडी टाक." असे सहज सांगतात आणि मग तेच  सा-या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे  साधन बनते.


      वडा आणि पाव यांचं नातं किती घट्ट  असतं ना!  ते एकमेकांशिवाय राहूच शकत नाहीत.  अगदी  एक शब्द उच्चारला की दुसरा तोंडातून हजरंच!   अनेक कष्टक-यांना उपाशी न ठेवता जगवणारा हा वडापाव . कांही माणसांना तो एवढा आवडतो  की पैज लावून ते संपवले जातात. मग  अशा माणसाविषयी विनोदाने म्हणतात , "तू मेलास तर कावळाही वडापावलाच शिवणार बघ!"   असा हा अत्यंत आवडीचा वडापाव कधी वाढदिवसाच्या छोट्या पार्टीचा मेनू म्हणून आनंद देतो तर , कधी  रिमझिम  पावसाळ्यात  गरमागरम खमंग चवीचा आनंद प्रत्येकाला देतो.  


           आम्ही   गारगोटीत शिकायला  असतानाची गोष्ट.  मित्रांच्या  वाढदिवसाची पार्टी असो वा एखाद्याच्या  आनंदाची वा पैजेची गोष्ट,  बसस्थानक शेजारी असणारा 'क्रांती वडा' आम्हाला  नेहमीच साद घालायचा.   सुट्टीच्या  दिवशी संध्याकाळी आमची पावलं तिथं जाऊन थांबायचीच!  गणितात ऐंशी गुण पार करण्याची पैज जिंकल्याने वर्गमित्राकडून वडापाव खाल्याची आजही  आवर्जून आठवण येते.


   अशा वडापावचे अनुभव वाचून  तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असणार ! मग विचार  कसला करताय, तुमच्या जवळच असणारे वडापावचे ठिकाण नक्की गाठा व चवीचा आस्वाद घ्या बरं का!


-✍श्रीकांत पाटील



आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...