राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा 2020 - तृतीय क्रमांक
माझे वाचन - एक गुंतवणूक
कुणी पैशांची गुंतवणूक करतो.... कुणी शेतीमध्ये गुंतवणूक करतो.... कुणी प्लॉट मध्ये गुंतवणूक करतो ..तर.. कुणी वेगवेगळ्या शेअर्समध्ये !!! .... गुंतवणूक करण्याचे असे कितीतरी पर्याय आहेत, बहुतेकजण आर्थिक गुंतवणुकीलाच महत्व देतात. आर्थिक नियोजनात उत्तम गुंतवणूक अशी कोणतीच नसते. कालपरत्वे प्रत्येक गुंतवणूक उत्तम अथवा वाईट ठरवली जाते. म्हणून माझी गुंतवणूक पुस्तके वाचण्यामध्येच!
माणसाला आयुष्यात कोणता ना कोणता छंद असतोच ना! कुणाला चित्रपट पाहण्याचा छंद असतो तर कुणाला गायनाचा अथवा वादनाचा! पण, सर्वच छंद आपल्या जीवनाची बाग फुलवण्यास मदत करतील असे नाही. मग आपला छंदच आयुष्याची गुंतवणूक बनली तर? इंग्रजीत प्रचलित एक म्हण आहे- "You can not eat the cake and have it too. " याचा अर्थ केक खायलाही पाहिजे आणि तो समोरही दिसला पाहिजे, ज्यावेळी दोन्ही गोष्टी एकाच वेळी अशक्य असतात तेंव्हा असे म्हणतात. म्हणून अशी कोणती गुंतवणूक आहे जी दोन्ही शक्य करते? याचे उत्तर माझ्या मते, 'वाचन 'हेच आहे. माझा वाचनाचा छंद हीच माझी गुंतवणूक! म्हणजेच, पुस्तक वाचल्याने ज्ञानही मिळते, आनंदही प्राप्त होतो, मनोरंजनही होते व जे वाचत असतो ते समोर शाबूतही राहते. मिळालेले ज्ञान दुस-यास दिल्याने अधिक वाढतच जाते.वाचन हेच आपल्या सर्वांगीण - आर्थिक , सामाजिक , शारीरिक , अध्यात्मिक विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.किंबहुना, सर्व गुंतवणुकीचा पाया म्हणजे वाचनच!
सर्वसाधारण लोकांची धारणा असते की, वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट, पण हे साफ चुकीचे आहे. वाचन खूप महत्वाचे आहे, आणि आत्ताच्या जलद गतीने बदलणाऱ्या जगात, वाचनाला पर्याय राहिलाच नाही. ज्याने आपने ज्ञान वेळेनुसार वाढवले नाही तो मागे राहील यात काही दुमत नाही.म्हणून वाचन म्हणजे आयुष्यासाठी केलेली मोठी गुंतवणूकच आहे .माझ्या दररोजच्या जगण्यात या गुंतवणुकीचे अनुभव रुपी व्याज आजही उपयोगी पडत आहे.
शालेय जीवनाच्या सुरवातीला माझ्या घरी वाचनाचे तसे कोणतेच वातावरण नव्हते. पाठ्यपुस्तक हेच माझ्या वाचनाचे पाहिले साधन! . दुकानातून आणलेल्या बाजार वस्तूच्या पूडीचा मिळालेला कागद हेच आमचे बातमीपत्र! पण, घरच्या अशा प्रतिकूल परिस्थितीतही घरातील मामेभावंडांनी मला वाचनाची गोडी लावली. शाळेत गुरुजनानी सुरु केलेला कथा, कादंबरी अभिवाचनाचा उपक्रम वाचनाची गोडी लावून गेला. गुरुजींच्या माध्यमातून गावात सुरु केलेले महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय आमचे वाचनघर बनले. पुस्तक समजावून घेऊन वाचणे, वाचताना सुवचने लिहून ठेवणे ही खरं तर गुरुजनांची बहूमोल देणगीच! इथेच खरी माझ्या जीवनातील वाचन संस्काराच्या गुंतवणूकीची मुहूर्तमेढ रोवली.
विनोबाजी म्हटल्याप्रमाणे, एकपट वाचन, दुप्पट चिंतन व चौपट आचरण हेच महत्वाचे आहे.पुस्तकासाठी राजगृह बांधलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पाठ वाचताना अभ्यासाचा दृढनिश्चय करुन शरीर ठाण मांडून बसायचं. मग काय,ग्रंथालयातील आवडती गोष्टीची पुस्तके एका बैठकीत संपायची . अकबर बिरबलच्या चातुर्यकथा , इसापनीतीतील संस्कारकथा, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा वाचन करताना अंगात मावळ्यांसारखा जोश संचारायचा. गुरुजनांनी सुरु केलेली ही वाचनचळवळ आम्हा मुलांसाठी खरी गुंतवणूक होती. पुस्तक हेच एक व्यक्तिमत्व असतं. ते वाचल्याने आपलं व्यक्तिमत्व घडत असते. ज्यानी मला जगण्याच्या बाजारात हात धरुन ऊभं केले.म्हणून अश्या पुस्तकाविषयी सांगावसं वाटतं ,
पुस्तके बळ देतात
धाव आघात सोसण्याचे
आयुष्यातल्या अंधाराला
उंब-यातच रोखण्याचं
माझ्या शालेय जीवनानंतर मी शिक्षकी सेवेत रुजू झालो. विद्यापीठाच्या पुस्तका बरोबरच मी स्पर्धापरीक्षेची पुस्तक घेऊन अभ्यास सुरु केला. चालू घडामोडी वाचल्याने सामान्यज्ञानात भर पडू लागली. समाजसुधारकांचे चरित्र वाचताना समाजासाठी आपण कांही तरी देणं लागतो याचे बीज मनात रुजले. आपणास उद्या फाशी देणार आहेत हे माहीत असतानाही ज्या भगतसिंगांनी अखेरच्या रात्री जेलरकडे पुस्तकाची मागणी केली. किती त्यांचे पुस्तकप्रेम ! अशी गोष्ट वाचून अंगावर रोमांच उभे राहतात व जगातील सर्वात सुंदर वस्तू म्हणजे पुस्तकच हे डोळ्यासमोर दिसते.
नोकरी आयुष्यात महत्वाचा भाग आहे पण नोकरी पलीकडे पण खूप काही शिकावे लागतेच ना! . चार लोकांसमोर आत्मविश्वासाने कसे बोलावे, इंटरनेट वापराने, बिल भरणे, जागा, घर नावावर करणे, योगा, डाएट, बँक, कर व्यवहार अशा प्रकारच्या हजारो गोष्टी शिकाव्या लागतात. आणि या शाळेत शिकवल्या जात नाहीत, त्यासाठी वाचन करावेच लागते. जर वाचन नाही केले तर आपण तज्ज्ञ व्यक्तीकडे जातो. पण असे तज्ज्ञ दरवेळी मिळतीलच असे नाही, जर तज्ज्ञ भेटलेच तर त्यांची वेगळी फीही द्यावी लागते. म्हणून स्वतःच्या फायद्यासाठी वाचन हे करावे लागतेच!
ज्यांचे मस्तक पुस्तकाने घडते त्याला कुठेही नतमस्तक होण्याची गरज नाही. वाचनाने मनुष्य समृद्ध होतो. मी वाचलेले ' मृत्युंजय' जीवनाला आजही दिशा देते. आय डेअर, यू कैन विन, अग्निपंख अशी पुस्तके आजही जिद्दीने जगण्याची प्रेरणा देतात. विनोदी पुस्तके वाचतानाची मजा तर खूपच न्यारी! कोणताही ताण तणाव क्षणात निघून जाण्याचे हे रामबाण औषधच! सध्याच्या धावपळीच्या युगात माणूस संपत्तीची जमवाजमव करत सुटला आहे,पण स्वतःचे स्वास्थ्य हरवून बसला आहे. माझ्या घरी असणारे माझे छोटेसे ग्रंथालय हिच माझी खरी संपत्ती आहे. प्रत्येक घरात चांगल्या पुस्तकांचा ,ग्रंथांचा संग्रह असायला हवाच. कवी इंद्रजित भालेराव एका कवितेत सुंदरपणे म्हणतात,
घरात असावे ग्रंथाचे कपाट
देवा जसा घाट देव्हा-यात
ग्रंथ ज्याचा जीव ,ग्रंथ ज्याचा श्वास
त्याच्या आसपास देव राहे.
माणसाने कमावलेली संपत्ती माणसाला पिढी- दोनपिढी जीवंत ठेवू शकते.पण , वाचनाने चांगले विचार आणि लिहिलेले, वाचलेले शब्द माणसाला अजरामर करतात.
वाचन हे घरबसल्या अप्रत्यक्ष अनुभव देते.मला वाचनाने खरी ओळख झाली ती नानात-हेच्या माणसांची ! विशिष्ट परिस्थितीत कोण कसा वागतो? प्रत्येकाची देहबोली कशी आहे ? एका घटनेवरच वेगवेगळी माणसे कशी वागतात हे ही समजले. निरीक्षणाचा छंद जडला. त्यातूनच मला माझ्या वाचनाने लिखाणाकडे वळवले. माझ्या लेखणीतून अर्धशतकाहून अधिक ललित लेख उमटले. मला लिहिण्यास प्रवृत्त करण्यास माझे वाचन हिच खरी माझ्यासाठी गुंतवणूक ठरली.
आज हिच गुंतवणूक माझ्या कुटुंबासाठी उपयुक्त ठरली आहे. जेंव्हा पालक वाचतात तेंव्हा आपसुकच मुलेही वाचनाकडे वळतात. मुलांच्यावर नकळत हे संस्कार घडून जातात. मग त्यासाठी वेगळ्या क्लासला मुलाना पाठवायची काय गरज? ज्या मुलांसाठी आपण माया जमवतो , त्या मुलाना मायेने घडवण्यास वाचन हेच उपयुक्त ठरते. संत साहित्य पठनाने घरी प्रसन्न वातावरण निर्माण होते. विविध वनौषधीची पुस्तके वाचताना घरच्या घरी वैद्य भेटतो. गृहिणीला विविध पाककलेच्या पुस्तक वाचनातून रेसिपींची माहिती मिळते. मग काय मेजवानीचा सुगंध दररोज दरवळतो. आपले आरोग्य आपल्या हातात असते. योगासनाची पुस्तके वाचताना ती शरीराला व मनाला गप्प बसू देत नाहीत. ती व्यायाम करण्यास प्रवृत्त करतात. शास्त्रीय माहिती देतात. त्यामुळे नवीन ऊर्जा मिळते.
माझे वाचन फक्त माझ्यासाठीच उपयुक्त ठरले नाही. तर मला समाजात ताठ मानेने ऊभे करते. बालपणी वाचनाची सुरुवात झाली तेंव्हा माझ्याही पेक्षा शेजा-याना खरा आनंद झाला. त्यावेळी आत्तासारखी फोन सुविधा नव्हती. पत्र व्यवहारच संवादाचे माध्यम. मुंबईत असणा-या आपल्या मुलाचे गावी पत्र कोण वाचणार? शेतकरी आई -वडील अशिक्षीत व वृद्ध . डोळ्याने दिसत नसायचे.अशावेळी माझ्या सारख्या मुलांकडून पत्राचे अभिवाचन होत असे. त्या वृध्द मातापित्यांच्या चेह-यावरील आनंद व त्यांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी अनमोल पुरस्कार होते.
माणसे श्रीमंतीने समाजात स्थान मिळवण्याचा प्रयत्न करतात.पण माझे वाचन हेच समाजात मानाचे स्थान उभे करण्यास उपयुक्त ठरले. वाचनाने वक्तृत्व सुधारले व कर्तृत्व उभे राहिले. 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते ' या सुवचनाप्रमाणे मी माझ्या जवळील अमूल्य ठेवा अर्थात पुस्तके लोकांसाठी उपलब्ध केली- ती ए पी जे अब्दुल कलाम वाचन कट्ट्याच्या माध्यमातून! केळवली-सालपे ( ता.लांजा, जि.रत्नागिरी ) सारख्या खेडेगावातील वाडीवस्तीवर घरपोच पुस्तके जाऊ लागली. आपण समाजाला जवळ केले की समाज आपल्यास नक्कीच परतफेड करतो. यामध्ये अनेक समाजातील मंडळे सहभागी झाली. एक अखंड वाचन चळवळ सुरु झाली. वॉट्स अप गृपच्या माध्यमातून वाचनकट्टयाने जागतिक पातळी गाठली. देश विदेशातले मराठी वाचक वाचन कट्ट्यास जुळले. वाचनाने माणसं जोडण्यात आली. ही माझ्यासाठी मोठी गुंतवणूक आहे. ही माणसे मला माझ्या वाचनवेडामुळेच मिळाली.
आज माझे वाचन ही केवळ एक गुंतवणूक नाही. ती माझा श्वास आहे.एक वेळ माझे घर, माझी संपत्ती सोडून जाताना दु:ख होणार नाही .पण पुस्तके सोडून जाताना हा वाचनवेडा जीव गलबलून जातो.म्हणून परमेश्वराकडे एकच प्रार्थना!- " माझ्या शरीरातील दुसरे कोणतेही अवयव मुळासह उपटून गेले तरी चालतील, पण माझे डोळे मात्र माझ्या जिवंतपणी हिसकावून घेऊ नकोस. जरी या शरीरातील प्राण निघून गेला तरी माझे हे दोन्ही नेत्र दानातून अबाधित राहतील, कारण ....मला माझ्या डोळ्यांनी अजून खूप वाचायचे आहे!... वाचायचे आहे..!!"
- श्री .श्रीकांत पाटील.
