सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या
स्वरातील हाक ऐकून मी ही धावत बाहेर आलो. मी म्हणालो,"अहो, एवढं का घाबरलात ?झालं तरी काय?" "अहो ,दुपारी बँकवाली साहेब लोकं आली होती. मी घरी न्हवतो.त्यानी हा इंग्रजी भाषेतला कागद देवून गेलेत. आमच्या चौथीत शिकणा-या नातवानं वरचा एक शब्द तेवढा वाचला-'नोटीसं'.त्यामुळंच मी पुरा घाबरलो आहे."ते आपला घाम पुसत माझ्या हातात कागद देत म्हणाले.मी त्याना थोडं पाणी दिलं आणि नोटीसीचा काय विषय आहे हे पाहण्यासाठी कागदावर नजर फिरवली. शेजारच्या एका जवळच्या मित्राला काका एका कर्ज प्रकरणात जामीन झाले होते. मित्राने ते वेळेवर भरले न्हवते.म्हणून त्यासंबंधीतची ते नोटीसपत्र होते. "काका, तुम्ही घाबरु नका आपण तुमच्या मित्राची भेट घेऊ आणि मार्ग काढू." असे म्हणत त्याना मी धीर दिला.
आजकाल 'नोटीस' हा शब्द सर्वच ठिकाणी दिसतो.आमच्या सरकारी कामात तर वारंवार हा शब्द उच्चारला जातो.कधी तो कामाची माहिती देण्यासाठी तर कधी कधी काम वेळेत पूर्ण न झाले तर पुर्ततेसाठी .कधी कामाची आठवण करण्यासाठी तर कधी काम वेळीच पूर्ण करण्यासाठी . सरकारी काम वेळेत पूर्ण करणे हे लोक सेवकाना बंधनकारक असल्याने असे नोटीसीचे प्रसंग येतातच. "माझ्या नोकरीच्या आयुष्यात कधीच नोटीस आली नाही अन्ं आताचं कशी काय नोटीस आली" असे म्हणत घाबरुन जाणारी माणसं भेटतात.खरंतर दिवसेंदिवस बदलणारी नियमावली आपल्याला पाळावी लागते. निसर्गही नकळत अनेकदा माणसाला अलिखित नोटीस देत असतो. आजकाळ घडणा-या नैसर्गिक आपत्ती ही त्याचीच प्रचिती आहे.त्यामूळे निसर्गनियमांप्रमाणे आपण जगलंच पाहिजे.
मला नोकरीच्या काळात पहिले नोटीसपत्र आले याबाबतचा एक मजेदार प्रसंग.माझ्या कार्यालयाकडूनच नोटीस रीतसर माझ्या हातात पोहचली.मी चुकीचे काही केले नसल्याचे मला माहीत होते.तरीही कार्यालयाच्या नियमानुसार त्यानी अमुक तमुक कलमाखाली आपणावर कारवाई का करु नये असा खुलासा मागितला.मी खुलासा घेऊन कार्यालयात गेलो व ज्या कारकुनाकडे ते संबंधीत काम होते त्यांच्याकडे चौकशी केली तर त्या कारकुनाने कामातील बारकाईने माझी कागदपत्र पाहिली न्हवती. आपली चूक त्यांच्या लक्षात आली व नंतर त्यानी आपला माफीनामा माझ्यासमोर सादर केला.
आपण आपल्या गावात सार्वजनिक ठिकाणी चिकटवलेल्या अनेक नोटीस पत्र पाहतो.या जशा लेखी नोटीस असतात तशा काही तोंडी नोटीस देण्याची पध्दतही काही गावात पहायला मिळते. पूर्वी माझ्या गावात सार्वजनिक नोटीस 'आरोळी' देऊन सांगत. गावात एखादा कार्यक्रम असो अथवा पाणी, वीज, स्वच्छता बाबतची खबरदारी. एखादी सार्वजनिक ठिकाणची सभेची माहिती असो अथवा कामबंद पाळावयाचा दिवसाची (पाळक) माहिती. "उद्या मंगळवार गावात पाळक आहे हो ssss ..."अशी भारदस्त आवाजातील ती आरोळी आजही कानात घुमते.आज तीच आरोळी ग्रामपंचायतीच्या इमारतींच्या वर अडकवलेल्या ध्वनीक्षेपकातून ऐकू येते.
माझ्या शालेय जीवनातील नोटीस आठवल्या तर आम्हास खूपच आनंद होतो. मी माध्यमिक विद्यालयात असतानाची गोष्ट. शाळेचे मुख्याध्यापक नोटीस काढत.ती नोटीस वही वाचनासाठी प्रत्येक वर्गात फिरत असे. शिपाई ती नोटीसवही फिरवत.काही वेळा परीक्षा विषयी ती नोटीस फिरत असे ,पण ब-याचअंशी ती शाळेला सार्वजनिक सुट्टी असल्याची असे.त्यामूळे शिपाई वर्गाच्या दारात नोटीस वही घेऊन आले तर आम्ही उद्या सुट्टी मिळणार या आनंदात असायचो. अशी आनंद देणारी नोटीस आयुष्यात कायम असावी असे आपल्याला वाटते.


