Thursday, September 4, 2025

तस्मै श्री गुरवे नमः

 शिक्षक दिन ..विशेष लेख. 


।।तस्मै श्री गुरवे नमः।।


              गुरुवारचा दिवस. सकाळी साडेदहाची वेळ. दररोजच्या नियोजनाप्रमाणे सर्व विद्यार्थी शालेय प्रार्थना एका सुरात गात होते.


"गुरू ईश्वर तात माय

गुरुविन जगी थोर काय"


 हे प्रार्थनेतील शब्द गुरूची महीमा सांगत होते.


खरंच, " गुरूबिन ज्ञान नही" म्हणतात ते उगाचच नाही.

अगदी जन्मापासून जीवनाला दिशा देणारे गुरूच.


आयुष्यभरात अनेक गुरु लाभत असतात. जन्मतःच आई गुरु म्हणून लाभते. वडील ही पाठीशी खंबीरपणे उभे राहून जीवनदिशा दर्शवित राहतात. शैक्षणिक जीवनात निरंतर ज्ञान देणारे शिक्षकवृंद. 'गुरु' या शब्दातील ‘गु’ म्हणजे अंधकार आणि ‘रु’ म्हणजे नाहीसा करणे.’ गुरु आपल्या जीवनातील विकारांचे अज्ञान दूर करून आनंदी जीवन कसे जगावे, ते आपल्याला शिकवतात.जन्मापासून आपण आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, माणसांपासून काही ना काही तरी शिकत असतो आणि म्हणूनच तर आपण जगण्यायोग्य बनत जातो. प्रत्येक गोष्ट जी आपल्याला शिकवण देते ती गुरुच असते. उदाहरणार्थ सूर्य, पृथ्वी, वारा, अग्नी, जल, नद्या, झाडे, फुले, पाने, ढग, डोंगर निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्याला काही तरी बोध देत असते. या सर्वांना आपण गुरुस्थानी मानून त्या प्रत्येक पदार्थाविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. त्यांची देण्याची, त्यागाची, परोपकारी वृत्ती आपल्यात आली पाहिजेआणि या गोष्टी शिकवण्यासाठी आपल्याला योग्य गुरूची आवश्यकता असते.


    प्रत्येकाच्या विचार सरणी प्रमाणे प्रत्येकाचे गुरु विषयी मत सुद्धा वेगळेच.विखुरलेल्या जीवनात जर अचानक कुणी आपली मानसिकता समजून, योग्य दिशा दाखवणारा भेटला तर तो आपल्याला गुरु समान असतो. असे आपले अनेक गुरु असतात की त्यांना ही माहीत नसते त्यांना आपण गुरु मानतो.


    आजच्या धावत्या जगात प्रत्येकाच्या जीवनात फक्त प्रश्नचिन्ह उमटलेली दिसतात.या प्रश्नचिन्हाच्या जाळयातून बाहेर काढणाराच खरा गुरू ठरतो. समजून घेणारे शिक्षक विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय असतात.त्या शिक्षकांना आदरही मिळू शकतो.मात्र हा आदर मिळवणं मोठं आवघड काम आहे.हा आदर मिळवण्यात यशस्वी होणाराच खरा गुरू होऊ शकतो. शिक्षक मार्गदर्शन करत असताना शिष्याला समजून घेण्याची पद्धत वा मार्ग वेगळा असू शकतो तो मार्ग गुरुने जाणला पाहिजे.


       आजकाल पूर्वीची गुरूकुल पध्दतच खूप चांगली आणि आदर्श होती असे वाटते.मुलांना ऋषीमुनींकडे अरण्यात पाठवत. मग ते गुरू त्यांना स्वावलंबनापासून तर सर्व प्रकारच्या कलागुणांमधे पारंगत करीत असत. त्यांच्यावर आध्यात्मिक संस्कार करीत असत. स्वत:च्या आचरणाने त्यांच्यात चांगले गुण परोपकार, त्याग, शोर्य, इतरांशी वागण्याची पध्दत, मोठ्यांविषयी आदर, सर्वांसाठी प्रेमाची भावना इत्यादी रुजवत असत. पालक देखील त्या गुरूंच्या ताब्यात आश्रमात सोडून निघून जात आणि त्या शिष्याला शिक्षा करण्याची मुभा गुरूला असे.आता तर शिक्षक शिक्षाही करू शकत नाही. 'छडी लागे छम छम, विद्या येई घम घम 'हे गाण्यातील शब्द आता मागे पडलेत. आज मुलेही फारच संवेदनशील मनाची झाली आहेत. त्यांचं मन जपणं हे फारच कौशल्याचे आहे.


     आपल्याला प्राचीन इतिहासात पाहायला मिळते,उत्कृष्ट धनुर्धारी एकलव्य गुरुविना दिशाहीन होता,गुरु नसला तरि त्याने मातीत गुरु शोधला.गुरु द्रोणाचार्यांचे अर्जुनाप्रती असलेले प्रेम हे गुरु च्या शिष्य प्रेमाचे मोठे उदाहरण आहे,एकलव्याने गुरुदक्षिणा म्हणून दिलेला अंगठा हे गुरुप्रती गुरुभक्तिचे उदाहरण पहावयास मिळते.गुरुमुळे जीवनाला स्थिरता येते.


        मी सुद्धा एक शिक्षक आहे,ज्ञानदान हे शिक्षकाचे आद्य कर्तव्य असले तरी देशासाठी देशभक्त तयार करण्याचे कार्य खरे शिक्षक करीत असतात.आपल्याला एक चांगला नागरिक बनविण्यात जे जे शिक्षक वाटेत भेटत गेले त्या सर्वांप्रती आज शिक्षक दिना निमित्त कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करायलाच हवी. त्याना माझे सदैव नमन !  


गुरवे नमः। गुरवे नमः । गुरवे नमः॥


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!


- श्रीकांत पाटील 

skplanj@gmail.com 


 #thankyouteachers

पत्रं

 ✉️📧💌 ललितबंध✉️📧💌


*पत्रं*

✍️ श्रीकांत पाटील 



    दुपारचं जेवण आटोपलं. जरा विश्रांतीसाठी चटईवर पाठ टेकवली. मोबाईलवर आकाशवाणीच्या विविधभारती केंद्रावरील गाणी चालू होती. गायक महंमद रफिंच्या आवाजात "कन्यादान 'चित्रपटातील गीताचे बोल कानावर पडत होते.


        " लिखे जो खत तुझे , 

          वो तेरी याद में हजारों रंग के नजारे बन गए."


    या श्रवणीय गीतातील पत्राच्या आशयावरुन मला एक दशकापूर्वीच्या दिवसात नेले . त्यावेळी मी नोकरीच्या गावी होतो. दुपारी पोस्टमन दारात येत असायचा. एका हाताने कपाळावरचा घाम पुसत, दुस-या हातात पत्रं व काखेला खाकी टपालाची पिशवी अडकवलेली घेऊन "गुरूजी, हे घ्या टपाल " म्हणत पडवीतल्या चोपाळ्यावर बसायचा. थोडीफार विचारपूस व्हायची. थंडगार मडक्यातलं पाणी पिऊन वाडीतील कुणाची पत्रं तर कुणाची चाकरमान्यांनी केलेली मनिऑर्डर द्यायला निघायचा. महिन्यातून दोन चार पत्रं हमखास असायची.


      माझ्या बालपणी माझं व पत्राचं घनिष्ट नातं होतं. गल्लीतच देवळाजवळ पोस्टऑफिस होतं. सकाळी सकाळी ऑफीसात कागदपत्रावर पोस्टाचा शिक्का मारताना घरात आवाज ऐकू यायचा. मी पोस्टात पळत सुटायचो. दोन -तीन मुलं पोस्टात घुटमळत असायची.आम्हाला बघून पोस्टमनकाका म्हणायचे, "अरे बाळानो,ही किल्ली घ्या व पेटीत काय पत्रं असतील तर ती घेऊन या." पोस्टाची ती लाल पेटी तिथे जवळच्याच घराजवळ अडकवलेली होती. आम्ही कट्ट्यावर चढून पेटीचं कुलूप उघडून पत्रं हातात घ्यायचो. पेटी हलवून अजून कांही पत्रं अडकली तर नाहीत ना? याची खात्री करायचो. त्यात बहुतेकदा पोस्टकार्ड, आंतर्देशीय पत्रं असायची. जमवलेली पत्रं पोस्टमनकाकाकडे देत असे.पोस्टात नेहमी डिंक लागायचा. कधी कधी आमच्या जवळ डिंक कोणाकडे आहे काय? म्हणत चौकशी करायचे. आम्ही शेरडाबरोबर जाऊन बाभळीचा डिंक गोळा करत असे. तो डिंक बाटलीत भरुन आणून देत असे. त्याबदल्यात खाऊसाठी आम्हाला पैसे द्यायचे. आम्हालाही आनंद व्हायचा.

     

        पत्रलेखन ही एक कला आहे. पत्र लेखन हा एक साहित्यप्रकार आहे. माझ्या लेखनाची सुरुवात ख-या अर्थाने पत्रलेखनाने झाली. माझे अक्षर सुंदर होते. त्यामूळे बहुतेकदा मला लेखनिक म्हणून गल्लीत मागणी असायची. प्राथमिक शाळेत पत्रलेखनाची ओळख झाली होतीच. त्यामुळे कोणासाठी कोणता मायना वापरायचा याचे पक्के ज्ञान होते. मजकूर ज्याचा- त्याचा विषय असायचा. बहुतेकदा मुंबईत असणा-या त्या नोकरदार मंडळीना पत्र लिहायचो. मुंबईहून आलेली पत्रं वाचून उत्तर द्यायला सुरवात व्हायची. मजकूराची सुरुवात ब-याचदा "तुझे पत्र मिळाले. वाचून आनंद झाला. (आठवणीचे दुःख असले तरीही)अशीच असायची.

 त्या काळात बी .डी . डी . चाळ, ना.म.जोशी मार्ग ,मुंबई या पत्त्यावर बरीचशी पत्रं असायची. याच चाळीत गाववाल्यांची खोली. मुंबईत गेल्यावर बहुतेकजणांची सुरुवात त्याच खोलीत व्हायची. गावाकडची खबर पत्रातून मांडायचो. ती लिहिलेली पत्रे त्या काळातील सामाजिक व वैयक्तिक भावविश्वाचे दर्शन घडवत होती. घरातील मुलं बाळ,म्हातारी माणसं, पाहुणेमंडळी ,अगदी गुरं ढ़ोरं यांचे सुद्धा बरं -वाईट पत्रातून लिहलं जायचं. पैसा- अडका, शेतातली पिकं , पाऊसपाणी सर्व काही त्यात उतरायचं. आपल्या भावना व विचाराना पत्रातून मोकळं केलं जायचं. शब्दां शब्दांचे भाव सोबत असायचे. पत्राच्या शेवटी "लिहताना चूक झाली असल्यास क्षमा असावी" ही मी विशेष नोंद नेहमी करायचो. गावी आल्यावर या मुंबईकर मंडळीकडून मला शाबासकीची थाप मिठाई सह जरुर मिळायची.


      आजच्या या दिवसांत दूरसंचारक्रांतीमुळे वॉट्सअप, फेसबुक, इन्स्टा , ट्वीटर या सोशल मेडियाचा वापर जास्त सुरु झाला. अंतर कमी झाले. संदेश क्षणार्धात पोहचू लागले. तरीही पत्राचे महत्व कमी झाले नाही. सरकारी व व्यावसायिक पत्रं चालूच असतात ,पण हरवली ती कौटुंबिक पत्र. ज्यामध्ये प्रेम, भय, आदर ओथंबून वाहत असायचा. पत्र डोळ्यासमोर घेताच पत्रातून चेहरे दिसायचे.हव्या तितक्यावेळा अक्षरे डोळ्यासमोर पुन्हापुन्हा घेता यायची.अनौपचारिक पत्रांचा मायना, मजकूर आज फक्त शालेय अभ्यासक्रमपुरता. पाच-सहा मार्कांशी संबंधीत. खरं तर पत्रलेखनामुळे भाषिक विकास होतो. स्वतःला व्यक्त होण्याचा व परस्पर संवादाचे ते माध्यम आहे. सध्या सोशल मिडीया वापर करुन अफवांचा धुमाकूळ चालू आहे. विश्वासार्हता लोप पावत चालली आहे. सानेगुरुजी, पंडीत नेहरु यानी लिहिलेली पत्रे उत्तम साहित्य म्हणून वाचकांसमोर आली. अगदी अलिकडची अरविंद जगताप यांची पत्रे वाचकांच्या मनात जागा करतात. म्हणून शेवटी 'खुद्दार ' चित्रपटातील , सोनू निगमजींच्या आवाजातील गीताचे शब्द अलगद ओठावर येतात.

  "खत लिखना हमें खत लिखना

   खत लिखना बाबा ,खत लिखना

       दिल से हो जाओ मजबूर,  

        तो हमको खत लिखना"

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...