Saturday, September 7, 2024

तीन शाळांतील तेवीस वर्षे

 तीन शाळांतील तेवीस वर्षे 


(येत्या सोमवारी23 सप्टेंबरला रत्नागिरी जिल्ह्यातून कार्यमुक्त होऊन कोल्हापूर जिल्ह्यात बदलीने हजर होत आहे. त्यानिमित्ताने रत्नागिरीतील माझ्या एकूण कारकीर्दीवर टाकलेला दृष्टीक्षेप.)


           प्रत्येक सरकारी नोकरदाराच्या आयुष्यात बदली हा शब्द ठरलेलाच! सरकारी नोकरीतील आयुष्य म्हणजे विंचवांचं बिऱ्हाडच! बदली झाली की संसाराचं बोचकं बांधून जाणं ठरलेलंच! कधी बदली ही प्रशासनाच्या सोयीसाठी होते तर कधी आपल्या विनंतीने. मग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे आलेच! बदली होते तेव्हा आपण फक्त ते ठिकाण सोडत नाही तर माणूस म्हणून जोडलेल्या माणसांच्या सहवासापासून दूर जातो. मग होणारा विरह सहन करण्याची मनाला तयारी करावीच लागते. 


     माझ्या नोकरीत आजपर्यंतच्या तेवीस वर्षांत तीन शाळा झाल्या. यामध्ये केवळ दोनवेळाच बदली झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा मोसम.नं.१.ही माझी पहिली शाळा. या शाळेत २१डिसेंबर २००१रोजी मी शिक्षणसेवक पदी हजर झालो. या शाळेतून पहिली बदली साडेतीन वर्षे सेवा झाल्यावर जुलै२००५ मध्ये लांजा तालुक्यातील सालपे नं ४ शाळेत झाली. दुसऱ्यांदा बदली झाली ऑगस्ट २०१४ मध्ये पदोन्नतीने सालपे गावातीलच एक नंबर शाळेत. या बदलींने मनाला काहीच वाटलं नव्हतं. कारण तो कोकण परिसर सोडावा लागला नाही. पण नुकतीच माझी आंतरजिल्हा बदली झाली अन् झालेली बदली स्वीकारताना अंतःकरण जड झाले. या दोन दशकात केवळ शाळेशी एकरुप न राहता इथल्या समाजाशी, निसर्गाशी कधी एकरूप झालो हे कळलेच नाही! आता माझ्या जिल्ह्यात येताना जवळ जवळ गेल्या तेवीस वर्षातील ते दिवस आठवतात. अन् ओठी एकच वाक्य येते..."गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी.!"


          नोकरीची सुरुवात माझ्या वयाच्या एकविसाव्या वर्षी झाली. तेव्हा शिक्षक नोकरी मिळाल्याचा आनंद वेगळाच होता. मेरीटनुसार कंत्राटी पद्धतीने भरती झालेली. तीन वर्षे मासिक तीन हजार मानधन ठरलेले! पण ...तेव्हा ते मानधनही आम्हांस पुरेसे होते! मोसम गावात असताना गावातील सरवणकरवाडीतच बहुतेक काळ राहिलो. त्यावेळचा जसा पगार तशा गरजाही मर्यादित! तिथे मुलांच्यात रमलो. माळावरच्या त्या ज्ञानमंदिरात शिकवता शिकवता माझेही पुढील शिक्षण चालू ठेवले. शिक्षक म्हणून समाजात मिसळलो. आजही समाजमाध्यमाद्वारे तेथील बरेच विद्यार्थी संपर्कात असतात याचा मनस्वी आनंद वाटतो. 


        माझी पहिली बदली मोसम शाळेतून झाली तीही एका शिक्षकमित्रासाठी. केरकर गुरुजी हे माझ्याच केळवली केंद्रातील. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी लांजा तालुक्यातील शिरवली येथे शिक्षिका होत्या. त्यांना बदलीने केंद्रात आणायचं होतं. त्यांच्या पत्नीसाठी सोयीची शाळा म्हणजे माझी शाळा. पण शाळेत एकही रिक्त पद नव्हते. त्यांनी माझे सहकारी चव्हाण गुरुजींना कबुलीजबाब बदलीसाठी विचारले. पण ते शिक्षणसेवक असल्याने त्यांची बदली अशक्य!. मी त्यांचे बोलणे ऐकले. त्यांना बदलीसाठी कबुली दिली. लांजा तालुक्यातील शिरवली गावी त्यांनी बदलीपूर्वी शाळा दाखवली. राहण्याची सोय केली. मी तिथे रहायलाही गेलो. पण लांजा पंचायत समितीतून आदेश मिळाला नव्हता. आदेश आणण्यास कार्यालयात गेलो अन् तिथे पवार आडनावाचे शिक्षक भेटले. त्यांना शिरवली शाळा पाहिजे होती. ते त्यासाठी साहेबांच्या भेटी घेत होते. जवळपासच्या शाळेतही रिक्त पद नव्हते. अखेर त्यानी मला विनंती केली. मीही त्यांना संमतीपत्र दिलं व त्यांची सोय केली. माझे एकच मागणे होते "शाळेच्या जवळ राहता येईल अशी शाळा द्या." कारण मी त्यावेळी स्पर्धापरीक्षेचा अभ्यास चालू केला होता. आणि माझा शाळेला येण्या-जाण्यात वेळ जाऊ नये हा एक उद्देश होता. तत्कालीन सभापती श्री. दत्ताजी कदम साहेबांना विनंती केली व त्यांनी त्यांच्या सालपे गावातील चार नंबर शाळेचा आदेश दिला व हजर झालो. 


        केळवली वरच्यावाडीत असलेली पूर्ण प्राथमिक शाळा सालपे नं.४. तीन शिक्षकी शाळा. दोन शिक्षक हजर व एक रिक्त. बंडगर गुरुजी मुख्याध्यापक व दुसरे मोरे गुरुजी. मोरे गुरुजी माझी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. मी हजर होताच जिल्हाबदलीने ते कार्यमुक्त होणार होते ना!. तसं त्यांच्या बदलीआदेशावरही नमूद केलं भमहोते. मी हजर होताच ते कार्यमुक्त झाले. दुसऱ्या दिवशी प्रशासकीय बदलीने गावातील दोन नंबर शाळेतून मुख्याध्यापकांच्या पत्नी बंडगर बाईही हजर झाल्या. २३जुलै २००५पासून सुरु झालेला या शाळेतील प्रवास प्रगतीशील होता. 


        शाळेजवळच बँकवाले कोटकर यांच्या घरी राहण्याची सोय झाली. घरमालक बॅंकेत काम करायचे म्हणून तशी ओळख . राहण्याचे ठिकाण शाळेजवळच शंभर पावलावर असल्याने शाळेतच मुलांसोबत अधिक वेळ जायचा. विविध खेळ, स्पर्धापरीक्षेचे ज्यादा तास, सांस्कृतिक कार्यक्रम , सामाजिक उपक्रमात मी रममाण झालो. तीन- चार वर्षात जवळच असणाऱ्या चिंचुर्टी धावडेवाडीत जाणारा रस्ता तयार झाला. वाडीतील मुलं चौथीनंतर माझ्या शाळेत येऊ लागली. चाळीशीतला पट साठावर पोहोचला. शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्णांचे प्रमाण वाढले. जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेत ग्रामीण भागातील मुलींनी कबड्डीत सुयश प्राप्त केलं. शाळेची प्रगतीपाहून माघी गणेशोत्सव मंडळ, युवक मंडळ, वाडीतील सामाजिक मंडळांनी , दानशूर व्यक्तींनी देणगी दिली. संगणक, बेंचसुविधा, शैक्षणिक साहित्य यासाठी भरभरून सहकार्य लाभले. 


      दरम्यान २०१० सालात तीनावरची शिक्षक संख्या चारावर पोहचली. गणेश घुले हे नगरहून शिक्षणसेवकपदी हजर झाले. त्यांचंही नव्या उमेदीनं काम सुरु झाले. मुख्याध्यापकांची बदली झाली. अनंत शितोळे २०११च्या जूनमध्ये शिक्षणसेवकपदी हजर झाले. शाळेत विषयवारी सुरु झाली.२०१४ला शाळेचा सुवर्णमहोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. दरम्यान पदोन्नतीने मी ३० ऑगस्ट२०१४ रोजी याच सालपे गावातील एक नंबर शाळेत विषयशिक्षक पदावर रुजू झालो. गेली दहा वर्षे सालपे येथे गेलो तरी सालपे -केळवली गाव म्हणून एकत्र अनेक शैक्षणिक उपक्रम सुरु केले. डाॅ.ए.पी.जे.अब्दुलकलाम फिरता वाचनकट्टा ही याच केळवलीतून सुरु झालेला अभिनव उपक्रम.

       

        सालपे नं. १ शाळेचे सन २०१४-१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष. याच शाळेत अमृतमहोत्सवानिमित्त डिजीटल स्कूल, मिशन स्कॉलरशीप सुरु केले. या वर्षी सातवीतील ओंकार घाग हा विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकला. हर्षे गुरुजी मुख्याध्यापक होते. विषयशिक्षक दुंडाप्पा चौगुले, तसेच संजय सुतार, उमेश कुबडे ह्या सहकारी शिक्षकांचे या ठिकाणी उत्तम सहकार्य लाभले . हर्षे गुरुजी सेवानिवृत्त झाल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार १जानेवारी २०१९ पासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत झालो. ग्रामस्थ, पालक यांच्या उत्तम सहकार्यातून वाचनचळवळ रुजवत गेलो . कोरोना काळात मुलांची पुस्तके हिच सोबती झाली. मुलेच पुस्तकदूत झाली. अबालवृद्धांपर्यंत चळवळ पोहचवली आणि पुढे ही चळवळ वृद्धिंगत झाली. एबीपी माझा , लोकसत्ता, दै. सकाळ, लोकमत, रत्नागिरी टाईम्स अशा माध्यमांनीही नोंद घेतली. यंदाच्या तालुकास्तरीय महावाचन उत्सवात खास बोलावणे आले हे या उपक्रमाचे महत्व अधोरेखित करते. हा उपक्रम सदोदित चालू राहणार आहे. जिथं बदलीने जाईन तिथं पुस्तकांची सोबत नक्कीच राहील. 


         येत्या सोमवारी 23 सप्टेंबर 2024रोजी कार्यमुक्त होऊन मी कोल्हापूर जिल्ह्यातील सेवेसाठी जाईन. पण ही नोकरीच्या निमित्ताने गेल्या तेवीस वर्षांत जुळलेली माणूसकीची नाती कधीच तुटणार नाहीत. ती आभासी नाहीत. ती वास्तव आहेत. गावात शिक्षक म्हणून काम करताना प्रत्येक ग्रामस्थांकडून खूप प्रेम मिळाले. जीवाभावाचं नातं जुळलं. समाजाच्या सुखदुःखात सहभागी होता आलं. या बदलीच्या निमित्ताने कोकणातून दूर जात असलो तरी विद्यार्थ्यांसाठी भेटणे राहीलच! सर्व रत्नागिरीकरांचे असेच शुभाशीर्वाद राहोत हिच मनोकामना!


        -श्रीकांत पाटील

आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...