Saturday, February 10, 2024

वनभोजन

 निसर्गानंद देणारे वनभोजन 


          डिसेंबर  महिना सुरु झाला की मुलांना वनभोजन वा सहलीचे वेध लागतात. जवळच्याच   एका शाळेतील वनभोजन झालेलं ऐकून मुलांनी  वर्गात एकच गलका केला होता . 

"गुरुजी, आमचं  वनभोजन कधी हाय?" मुलं  म्हणाली. 

"अरे ,आपण  लवकरच  जानेवारीतली तारीख ठरवू"   मी म्हणालो.  

जानेवारी उजाडला . पण सर्व अशैक्षणिक कामाच्या  बोजामुळे शैक्षणिक उपक्रमांचा बोजवारा उडाला होता . शेवटी जानेवारी महिना सरला. फेब्रुवारीत पहिल्याच आठवड्यात  पालकांची सभा झाली. सात तारखेला जायचं ठरलं. शिपोशीचं धरण, शाळेजवळचं धावबा मंदिर परिसर  अशी नेहमीचं ठिकाण  सोडून  मुलांच्या मागणीनुसार तालुक्यातील मिनीमहाबळेश्वर म्हणजे माचाळ हे ठिकाण  ठरलं. शाळेपासून दहा बारा किलोमीटरचं अंतर.   मग तयारीचं काय ?  लगेच पालकांनीच  स्वतः एकेक जबाबदारी उचलली. मेनू ठरला. चिकन वडे.  गाडी ठरवली.  कोणी  तेल दिलं तर कोणी मसाला. कांहीनी चिकन तर काहीनी  वड्याचं पीठ.  सगळी पूर्व तयारी झाली. 


       आदल्या  दिवशी  शाळेत  मी  मुलांना कांही प्रश्न विचारले." किती जणांनी  माचाळ  ठिकाण पाहिलंय? किती जणांनी मुचकुंदी ऋषीचे मंदिर पाहिलंय ? नदीचा उगम पाहिलाय काय?   "  अशा प्रश्नांनी चाचपणी केली. एका  हातच्या  बोटावर मोजण्याइतक्याच मुलांची बोटं वर झाली होती. एवढ्या  जवळ असूनही बहुतेकांना अधिक माहिती नव्हती.  पूर्वी  रस्ता  नसल्यानं  माचाळला  चालत गेल्याशिवाय पर्याय  नव्हता.  एक दोन वर्षात  रस्ता  झाल्यानं पर्यटन वाढलं आहे.  


      वनभोजनचा दिवस उजाडला. सकाळी मुलांनी खेळाचं साहित्य घेतलं. भांड्यांची  जमवाजमव केली.   सर्व पालक व मुलं जमायला दहा वाजले.  गाडी आली . गाडीने नागमोडी वळणे पार करत  तासाभरात  माचाळ गाठले. मुचकुंदी नदी  जिथं उगम पावते  त्या परिसराकडे मार्गक्रमण सुरु झाले.  गाडी अर्ध्या रस्त्यावर थांबवली. तेथून पुढे पायवाटच होती. दोन्ही बाजूला हिरवीगार झुडूपं, झाडं पाहतं ..डोक्यावर  साहित्य घेऊन आम्ही सर्वजण पोहचलो. काही पालक  आपल्या लहाणपणाच्या आठवणी सांगत होते.  कांहीजण तेथील वनस्पतीची माहिती मुलांना सांगत होते. येथील अनेक वनौषधी गुराख्यांना माहिती असतात. इथल्या जंगलातला  कडीपत्ता तर  सर्वात प्रसिद्ध. छोटी मोठी  कडीपत्त्याची झाडं व त्याच्यासारखीच दुसरी दिसणारी वनस्पती पाहून काहीजण गोंधळत होते. पण पानांचा  वास घेताच  ओळख पटायची. माणसाला नुसतं डोळ्याने पाहून मिळणाऱ्या ज्ञानापेक्षा  स्पर्श,  गंधाने अधिक चिरकाल स्मरणात राहणारं ज्ञान  प्राप्त होतं.  म्हणूनच शिक्षण हे निसर्गाशी  जवळीक साधून घेतलं पाहिजे.  आज मुलांना प्रत्यक्ष  परिसरातील वेली, झाडे -झुडूपं यांचं   विविधांगी आकलन होत होतं.  


       आम्ही मुचकुंदी नदीच्या उगम परिसरात पोहचलो. तिथं  पाण्यासाठी  चिरेबंदी कुंडं बांधली  होती. एवढ्या उंचीवर  पाणी पाहून मुलांना आश्चर्य वाटत होतं.  या नदीचे गावाजवळील  पावसाळ्यातील खळाळणारे ओढे कोरडे पडले होते. पण इथलं थंडगार पाणी   सदैव  सर्व प्राणिमात्रांना  सुखावणारेच! प्रथमतः  परिसरातील स्वच्छता केली. पर्यटकांनी  केलेली अस्वच्छता  पाहून कीव वाटली. प्लास्टिक,  काचेच्या  बाटल्या  इतरत्र पडल्या  होत्या. गाववाल्यांनी सूचना  दिल्याचे काही पालक म्हणाले.  तरीही लोकांना स्वच्छतेचे नियम का शिकवावे लागतात? हा नेहमीचाच प्रश्न! 


         सर्वांनी जेवण सुरु करण्यापूर्वी मुचकुंद ऋषींचं दर्शन घ्यायचं ठरवलं.   सर्वजण मंदिराकडे निघालो. मंदिर परिसरात पोहचताचं.थंडगार वारा... मंदिराच्या  परिसरातील झाडांची  गार सावली आम्हा सर्वांचा चालून आलेला थकवा घालवून गेली. छोट्या  गुहारुपी मंदिराच्या प्रवेशाच्या  पायऱ्या  सावधानतेने उतरत गाभाऱ्यात  पोहचलो.  तिथं गेल्यावर  अधिकच गार वाटू लागलं.  देवदर्शन घेऊन  उंचीवरून दूर दिसणारी  कोचरी,  दाभोळे,   साखरपा अशी गावं मुलं न्याहाळू लागली. दुरुन दिसणारा  पूर्वेकडील  विशाळगड,  खोऱ्यात  वसलेली देवडे  - भोवडे अशी गावं.याबाबत   जाणकार पालक  मुलांना माहिती सांगू लागली. 


      थोड्यावेळाने पालक मंडळी जेवणाच्या तयारीला निघून गेली.  मी मुलांना मंदिर परिसरात थोडावेळ थांबवलं. मग काय? मुलांनी आजूबाजूच्या झाडावर चढणं, वाकड्या  फांदीवर झोपणं, पक्ष्यांचे आवाज काढणं अशा करामती सुरु केल्या. मुलं झाडांशी अगदी खूप दिवसानंतर भेटलेल्या  मित्राला मिठी मारावी तशी एकरूप झाली होती. आज निसर्गाचा भरभरून आनंद ती घेत होती. थोड्या वेळानंतर आम्ही सर्वजण  मंदिराच्या एका झाडाखाली बसून वाचनाचा आनंद घेतला. काही मुलांनी  दासू वैद्य यांच्या  निसर्गाशी जवळीक  साधणाऱ्या कविता वाचल्या .  कवी एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद ' या काव्यसंग्रहातील कवितांचा आनंद तर मुलांना सदैव  हवाहवासाच!  


            तासाभराने मुलांनी जेवणाच्या ठिकाणी धाव घेतली.  जेवण बनवण्यास सुरु होते . खमंग रस्याचा वास येत होता. गरमागरम वडे तयार होत होते. जेवण तयार होईपर्यंत अर्धा तास मुलांनी  गायनाचा अस्वाद घेतला.   अन् जेवण तयार होताच पंगत बसली. जंगलात  जेवणाची  मजा काय निराळीच! हेच खरे वनभोजन! बर्‍याच दिवसाची मुलांची प्रतिक्षा संपली. सर्वांनी  यथेच्छ ताव मारला. इतक्यात जांगल्यांची (गुराखी) पाण्यावर गुरं  आली. आम्ही  त्या जांगल्यांना  जेवणास आग्रह केला.   त्यांनी डबे आणले होते.  डब्यासोबत थोडा रस्सा वडे त्यांना खाण्यास  दिले. त्यानी झाडाखाली बसून जेवण केलं.  त्यांचं तर  दररोजचं  वनभोजन .म्हणूनच तर वयाची साठी पार करूनही ते जांगली जंगलात धडधाकटपणे वावरत होते.  माणसांनं निसर्गासोबत गेलं तर त्याचं आयुष्य  निश्चितंच वाढतं. म्हणूनच आजच्या  पिढीला अशा उपक्रमाची शिकवण गरजेची आहे.  जेवून झाल्यानंतरची आवराआवर  करेपर्यंत मुलं खेळू लागली.  मुलांनी चिखलात डुंबणारी गुरं पाहिली. कांही मुलांनी बैठे खेळ चालू केले  तर कांहीनी  गायन केले  . काही मुलं चित्रं रेखाटू लागली.  शेवटी आम्ही  सर्व कामे आटोपताच परतीचा मार्ग  धरला तो अविस्मरणीय निसर्गानंद घेऊनच!


- श्रीकांत पाटील



आठवणीतील लेख

नोटीशीची गोष्ट

     सायंकाळची वेळ. मी नुकताच शाळेतून घरी आलो होतो.माझ्या शेजारच्या काकानी हाक मारली."गुरूजी घरात आहेत काय?" त्यांची घाब-या  स्वर...