माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या? असा प्रश्न माझ्या शाळेतले गुरुजीं जेव्हा विचारायचे तेव्हा आम्ही मुलं पटकन एका सूरात " अन्न, वस्त्र, निवारा.." असे म्हणायचो. लगेच गुरूजी प्रत्येक गरजेचे विस्तृत सांगायचे. त्यांचं बोलणं आठवलं की आजही बालपणीच्या गोष्टी रुंजी घालायला लागतात.
बालपणी पोटापुरतं अन्न मिळायचं पण असमतोलच! सणावाराला गोडधोड व्हायचं. वर्षात कधीतरी एक दोनदा गावात मटणाचे वाटे घालायचे.त्यावेळीच मांसाहार भेटायचा. पावसाळ्यात ओढ्यावरचे मासे. उन्हाळा सुरु झाला की आठलेल्या तळ्यातले ... शेतातल्या विहिरीतले ...आईच्या जुन्या साडीचे जाळे करून मासे पकडायला मजा तर न्यारीच! मग कधीतरी खेकडयाचा रस्साही व्हायचा.
वस्त्र म्हटलं की आठवतात ते नातेवाईकांचे मला मिळालेले कपडे. अगदी नोकरीला लागेपर्यंत त्यानी दिलेली जुनी- नवी कपडेच अंगावर तिन्ही ॠतूत असायची.मावशी ,मामांच्या मुलांची कपडे घातली की आपसुकच त्यांच्या अंगातली ताकत संचारायची. वर्षातून एकदा शाळेचा नवीन गणवेश मिळायचा तोही नोकरी करणा-या मामा.. दादाकडूनच! त्यावेळी आतासारख्या सरकारी योजनांची वाणवाच!
तिसरी मूलभूत गरज म्हणजे निवारा. प्रत्येक जीवाला आवश्यक असतो तो निवारा. निवारा करणं ही माणसाची मूलभूत वृत्ती आहे. टोळी करून भटकणारा माणूस शेती करू लागला; घर बांधून एका ठिकाणी राहू लागला आणि माणसाच्या जीवनाला स्थैर्य आलं.
हा माणसाचा निवारा म्हणजे त्याचं घर. मलाही तो माझ्या जन्मापासून मिळाला माझ्या मामाच्या गावी. मामाचं घर म्हणजे माझ्या कुटुंबासाठी आसराच! ते गावच्या लक्ष्मी मंदिराच्या गल्लीतलं काळ्या कौलाचं, जाडजूड मातीच्या भिंतीचं घर म्हणजे माझे जन्मघर. माझं बालपण त्याच घरात खेळत ,बागडत गेलं. ते घराचं सारवलेलं रस्तावजा अंगण...म्हणजे रात्री चांदोबाकडं बघत...गोष्टी ऐकत.. खेळायचं आम्हा भावंडांचं मैदानच!
घरात तीन खोल्या. घराची पहिली खोली दहा बाय दहाची. तिथं आमची चूल पेटायची. आजी ,आई व आम्ही दोन्ही भावंडं तिथं रहायचो. ....शाडूच्या मातीने लिपलेली,ज्वारीच्या धाटाची कुडाची भिंत असणारी खोली म्हणजे आमचं सर्वकाही. उन्हाळ्यात त्या कुडाच्या भिंतीवर ढेकणाच्या रक्ताची तांबूस नक्षी उठायची. कुडाच्या बाजूला एका कोप-यात एक-दोन शेरडं व दुस-या कोप-यात कोंबडीचं खुराडं. हे सर्व कांही खटाटोप चारजणांचं पोट भरण्यासाठीच!
मधली खोली म्हणजे आम्हा सर्व मामेभावंडासोबतची अभ्यासाची खोली. मोठा दरवाजा, देव्हारा, बांबूच्या काटयांचा माळा, भाताचा भरलेला तट्ट्या असणारी खोली. तिसरी खोली म्हणजे आमची भावंडासोबत जेवायला बसायची जेवणखोली . त्यात एका बाजूला कोप-यात अंघोळीला गेल्यावर मध्येच पाणी जाण्यासाठी काठीने पाणी काढायला लागणारं सर्वांचं न्हाणीघर! बहुतेक पाणी मुरायचं ते तिथेच..म्हणून नेहमी ओलसर असणारी ही खोली. पावसाळ्यात भिंती पाझरलेल्याच! माणसाचं घराशी भावनिक नातं असतं. घर म्हणजे माणसाचं शारीरिक, मानसिक रक्षण करणारं सुरक्षाकवचच! माणसं घरांना घडवतात, आणि घरंही माणसांना घडवतात. असं सर्व असणारं ते मामाचं घर माझ्या जीवनातलं पहिलं संस्कारकेंद्रच !
चार पैसे जमले की माणूस जुनी घरे पाडून नवीन घरं बांधतो.जुनी घरं पाडली जातात तेव्हा स्वत:वरच घाव पडल्यासारखं वाटतं. तो अनुभव प्रिय व्यक्तीच्या मरणासारखा असतो. मी बारावीत असताना ते मामाचं काळ्या कौलाचं छप्पर असणारं घर तांबड्या मंगलोरी कौलाचं झालं. दरम्यान आमची रवानगी कोल्हापूरच्या मामाच्या वाटणीस आलेले परड्यातल्या घरातल्या अर्ध्या हिस्स्यात झाली होती. पण तिथं विजेची सोय नव्हती. त्यामुळं माझा अभ्यासासाठी मुक्काम त्या मंगलोरी छप्पराच्या घरातच असायचा.
आज आम्ही त्याच घरातून लहानाचे मोठे झालो. स्वतःचं घर चांगलं असावं असं मित्रांची घरं बघून वाटायचं. कॉलेज जीवनात माझं मित्रांच्या घरी जाणं व्हायचं. मी मित्रांना कधी माझ्या स्वतःच्या घरी बोलवणार? असं वाटायचं. बापंचं बेघर होऊन बेपत्ता झाल्यानं कोणाकडे हक्काचं घर मागायचं?हा नेहमीचाच प्रश्न. वडीलांच्या गावी पिढीजात घर होते. पण तिकडचा मार्गही लालसेपोटी रक्ताच्या माणसांनी बंद केलेला! उडत्या पाखरांना परतीची काळजी नसते. घरटे कधीही बांधता येईल म्हणून त्यांचा या अफाट जगात प्रवास सुरू होतो. त्याना त्यांच्या पंखावर विश्वास असतो. माझाही प्रवास अगदी तसाच! पहिल्यांदा शिक्षण हवं. हा विचार घेऊन शिक्षण पूर्ण केलं. नोकरीला लागलो. चांगल्या पगाराची, आवडीची शिक्षक नोकरीला रूजूही झालो. पण लग्न करायचं म्हणून मुलगी शोधताना बाप ,घर व शेताची विचारणा सुरू व्हायची. घर म्हणजे नक्की काय असत? असा प्रश्न पडू लागला. शिक्षकांना,त्यांच्या ज्ञानाला सन्मान असणा-या मायभूमीत धनसंपत्तीला एवढे का पुजावे ? हाच विचार मनात येऊ लागला. एकदा माझं ठरलेलं लग्न घर नव्हतं म्हणून मोडलं तेव्हा वाटलं...ज्ञान ही संपत्ती असणा-या शिक्षकी पेशातल्या माणसावर हा किती अविश्वास ! पण समाजमनावरचा पगडा सहसा लवकर बदलत नाही हे मला माहित होतेच.
तसे तर मी नोकरीच्या ठिकाणी पुरेशी सोय असणा-या भाड्याच्या घरात राहत होतोच. तेवढं भाडं भरायची कुवत असते गुरूजींच्या पगारात हेच माहित नसेल लालची लोकांना कदाचित ! मी मनाशी ठरवलं संपत्ती वर प्रेम करणारी माणसं नकोच मुळीच या जीवनात!.मी व माझे ज्ञान यावर श्रद्धा असणारी माणसं हवी. नशीबाने तशी जीवनसाथी मिळालीही! आज तिच्याच साथीनं घर घेतलही अगदी तिच्या नावावरंच! ज्या घरांचा पाया मजबूत विचारनिष्ठेवर आधारित असतो; आधारखांबांचा कणा ताठ असतो, भिंतींपाशी सोसायची ताकद आणि प्रगल्भता असते ती घरं मोडता मोडता सावरू शकतात. नव्यानं स्वत:ला घडवू शकतात. असाच जीवनाचा पाया रचणारं घर मला त्या तीन खोलीच्या मामाच्या घरात मिळाला तो तुम्हा प्रत्येकाच्या मनात माझे नवीन घर बांधण्यासाठीच!!!
- श्रीकांत पाटील
